Friday, 3 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०३ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

९०वं अखिल भारतीय साहित्य संमेलन आजपासून डोंबिवली इथं सुरु झालं असून, ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली आहे. मोठया संख्येनं नागरिक दिंडीत उपस्थित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. डॉक्टर अक्षयकुमार काळे संमेलनाचं अध्यक्षपद भषवणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात कथा-कथन, काव्य-संमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखतींसह स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

अणु पुरवठादार गट - एन एस जीच्या कोणत्याही सदस्यानं भारताला एन एस जीचं सदस्यत्व देण्याचा विरोध केला नसल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी सांगितलं. राज्यसभेत ते बोलत होते. काही सदस्यांनी फक्त प्रक्रियेसंबंधी मुद्दे उपस्थित केले असल्याचं ते म्हणाले. एन एस जी सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून, चीन आणि अन्य काही देश प्रश्न उपस्थित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संपला असून, उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा राज्यातले मतदार असलेले परंतु महाराष्ट्रात काम करणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय यांनी ही माहिती दिली.

****

केंद्र आणि राज्य सरकारांच्या संघटनांनी केलेल्या असामान्य आणि नावीन्यपूर्ण कामांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं ‘सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधानांचे पुरस्कार’ सुरू करण्यात आले आहेत. प्राधान्य कार्यक्रम गटाअंतर्गत जास्तीत जास्त १५ पुरस्कार आणि नावीन्यपूर्ण गटाअंतर्गत दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नागरी सेवा दिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  

****

लोकमत वृत्तपत्र समुहाचे सहयोगी समुह संपादक हेमंत कुलकर्णी यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. कुलकर्णी यांनी आकाशवाणीचे बातमीदार म्हणून काही काळ काम केलं होतं. आज सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

//*******//

No comments: