Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 03 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
****
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या दोन खासदारांच्या अटकेच्या निषेधार्थ
आज लोकसभेत कामकाज सुरु होताच गदारोळ केला. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं चीटफंड
घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय आणि तापस पाल यांना अटक
केलेली आहे. याचा निषेध करत पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत गदारोळ केल्यानं अध्यक्षांनी
कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब केलं होतं.
त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेसाठी
शून्यकाळ स्थगित केला. मात्र सदस्यांनी पुन्हा गदारोळ सुरू केल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं
कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब केलं.
राज्यसभेत काँग्रेस पक्षानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना
दिवस म्हणून पाळला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद
यांनी या संदर्भात बोलताना, नेत्यांच्या जयंतीच्या दिवशी विशेष दिवस पाळण्याची प्रथा
बदलू नये अशी मागणी केली.
****
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मिळालेल्या
गुणांसोबतच महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांनाही ४० टक्के स्थान द्यावं, असे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या अभ्यासक्रमांसाठीच्या खासगी शिकवणी चालकांसाठी
नियम तयार करण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. खासगी शिकवण्यांवर
बंदी घालता येणार नाही, मात्र शिक्षणाचं व्यावसायिकीकरण थांबवण्यासाठी काही नियम तयार
करण्याची गरज न्यायालयानं व्यक्त केली.
****
बँकांनी आर्थिक फसवणूक प्रकरणांची तक्रार करण्यासाठी सक्रिय
राहण्याचं आवाहन भारतीय रिजर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी केलं
आहे. मुंबई इथं आर्थिक गुन्हे व्यवस्थापन विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. रिजर्व्ह
बँकेनं सुरक्षासंबंधी काही योजना तयार केल्या असून, याअंतर्गत या आर्थिक वर्षात तीस
प्रमुख बँकांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुंद्रा यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच
जागांसाठी आज मतदान होत आहे.
यात औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा आणि अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार
संघाचा समावेश आहे. लातूर इथं सकाळी १० वाजेपर्यंत १२ टक्के तर परभणी इथं बारा वाजेपर्यंत
३३ टक्के मतदान झालं. ठाणे इथं १७ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मतमोजणी येत्या सोमवारी
सहा फेब्रुवारीला होणार आहे.
****
भारत पाकिस्तान सीमेवर कुंपण घालण्याचं काम लवकरच सुरु करणार असल्याचं केंद्रीय
गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत
होते. या कुंपणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
डिसेंबर २०१८ पर्यंत तीन हजार ३२३ किलोमीटरची सीमा पूर्णपणे बंद करण्याचं सरकारचं उद्दीष्ट
आहे.
****
शिर्डीतल्या
साईबाबा मंदिर परिसरात सुरु करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या एफ एम केंद्रावरून औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येणार आहेत. साईबाबा मंदिरात होणारी भजनं
आणि आरत्या सकाळी तसंच रात्री प्रसारित होणार आहेत. सध्या मंदिरापासून १५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हे कार्यक्रम
ऐकता येतात.
****
विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये
जुन्या नोटांच्या स्वरूपात जी रक्कम जमा झाली त्यापैकी ४ लाख ७० हजार कोटी रूपयांची
रक्कम बेहिशोबी असल्याचं आढळून आलं आहे. ही रक्कम जमा करणाऱ्या १८ लाख लोकांकडून खुलासा
मागवण्यात आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांनी काल दिल्लीत वार्ताहरांना
सांगितलं.
****
पुणे इथं आजपासून
टेनिसचे डेव्हिस करंडक सामने सुरु होत आहेत. भारत न्यूझीलंड दरम्यान पाच फेब्रुवारीपर्यंत
हे सामने होणार आहेत. या स्पर्धेत दुहेरी सामन्यात लिएंडर पेसचा समावेश
करण्यात आला असून, तो विष्णुवर्धनच्या जोडीनं या स्पर्धेत खेळणार आहे. पेस विष्णुवर्धन
जोडीचा उद्या पहिला सामना आर्टेक सिटाक - मायकेल व्हीनस जोडीसोबत होणार आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट
कोहली ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना - आयसीसीच्या मानांकनात
अव्वल स्थानी कायम आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराहनं आपलं दुसरं स्थान कायम
ठेवलं आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ट्वेंटी ट्वेंटी मालिका जिंकून आयसीसी मानांकनात
दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
//********//
No comments:
Post a Comment