Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 3 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लोकसभेचं
कामकाज आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे वारंवार बाधित झालं. काँग्रेस
पक्षाच्या खासदारांनी माजी मंत्री तसंच सदनाचे दिवंगत सदस्य ई अहमद यांच्या कुटुंबीयांना
योग्य वागणूक न दिल्याबद्दल तर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या
राजकीय गैरवापराचा आरोप करत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी दोन वेळा आणि
नंतर सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
देशात
आतापर्यंत ११ लाख ८६ हजार गिरणी कामगारांची बँक खाती उघडण्यात आल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग
मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. वस्त्रोद्योग क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था
वाढवण्यासाठी मंत्रालयानं विशेष मोहिम सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या
पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बाळगण्यास प्रतिबंध करणारं विधेयक लोकसभेत आज सादर झालं.
या विधेयकातल्या तरतुदींनुसार रद्द झालेल्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगल्यास, तो
दंडनीय अपराध असेल. सापडलेल्या नोटांच्या एकूण मूल्याच्या दहापट रक्कम किंवा दहा हजार
रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, तेवढा दंड दोषी व्यक्तीला ठोठावला जाईल.
****
बँकेच्या बचत खात्यातून पैसे
काढण्याची मर्यादा रद्द करण्याचे संकेत गृहसचिव शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. सध्या
बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी साप्ताहिक २४ हजार रुपये मर्यादा आहे. चालू खात्यातून
पैसे काढण्याची मर्यादा गेल्या आठवड्यात रिजर्व्ह बँकेनं रद्द केली आहे. पुनर्मुद्रीकरणाची
प्रक्रिया जवळपास पूर्ण होत असल्याचं, दास यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
****
एअरसेल मॅक्सिस प्रकरणी नवी दिल्लीतल्या
विशेष न्यायालयानं माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन
यांना दोषमुक्त ठरवल्याच्या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयानं सर्वोच्च न्यायालयात
आव्हान दिलं आहे. मारन बंधुंच्या जप्त केलेल्या मालमत्ता त्यांना परत करु नये, अशी
मागणी संचालनालयानं केली आहे. यासंदर्भात न्यायालयानं विशेष सरकारी वकील आनंद ग्रोवर
यांना योग्य पद्धतीनं याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीनं
आज भारतीय वन विभागाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. पात्र उमेदवारांची मुलाखत
२७ फेब्रुवारीला होणार आहे. आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात
आली.
****
महानगरपालिका महापौर पदासाठीची
सोडत आज जाहीर करण्यात आली. २७ पैकी १४ महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात
आलं आहे. औरंगाबाद महापालिका ओबीसी, परभणी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव, नांदेड वाघाळा
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव तर लातूर महापालिका महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी
राखीव ठेवण्यात आलं आहे.
सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु
असलेल्या महापालिकासाठी हे आरक्षण लागू असून उर्वरित महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत
संपल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे.
****
९०व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज डोंबिवली इथं सकाळी ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली.
डोंबिवलीतली कलापथकं, १५ हजार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आणि भारतीय
राज्यघटनेची प्रत ही दिंडीची वैशिष्ट्यं ठरली. संमेलाध्यक्ष
डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक या दिंडीत सहभागी झाले होते. संमेलनाचे मावळते
अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाध्यक्षाची
आत्मकथा या पुस्तकाचं प्रकाशनही सबनीस यांच्या हस्ते करण्यात
आलं. आज संध्याकाळी संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन, नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळाच्या वतीनं भाव स्थिरता
निधी योजनेअंतर्गत हमीभावाने चार शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या
खरेदी केंद्रांवर शासनानं ठरवून दिलेल्या निकषानुसार एफएक्यू प्रतीची तूर खरेदी करण्यात
येत आहे. औरंगाबादम लासूर स्टेशन, वैजापूर आणि पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात
ही केंद्रं सुरु करण्यात आली आहेत.
****
राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक
आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी आज मतदान झालं. यात औरंगाबाद, नागपूर
आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा, तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. परभणी इथं सायंकाळी
चार वाजेपर्यंत ९० टक्के, तर लातूर इथं दोन वाजेपर्यंत ६३ पूर्णांक ८६ टक्के मतदान
झालं. मतमोजणी येत्या सोमवारी
सहा फेब्रुवारीला
होणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबाद शहरातील
मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
****
1 comment:
छान
Post a Comment