Sunday, 5 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर, १४ महापालिकांची महापौरपदं महिलांसाठी राखीव

·      औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सरासरी ८७ टक्के मतदान

·      सरकार आणि साहित्यिक यांच्यातील संवाद वाढवून साहित्यिकांच्या मागे खंबीरपणे उभं राहू - मुख्यमंत्र्यांची ग्वाही; ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

आणि

·      डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताची न्यूझीलंडवर २-० अशी आघाडी

****

राज्यातल्या महापालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. २७ पैकी १४ महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव झालं आहे. औरंगाबादचं महापौरपद मागास प्रवर्गासाठी राखीव, परभणी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव, नांदेड वाघाळा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव तर लातूर महापालिका महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या महापालिकांसाठी हे आरक्षण लागू असून उर्वरित महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत संपल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे.

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी काल मतदान झालं. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातल्या आठही जिल्ह्यात मतदान शांततेत झालं. विभागात सरासरी ८७ पूर्णांक २३ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद इथं सुमारे ७५ टक्के, जालना ८५ टक्के, नांदेड ८८, बीड ८९, परभणी ९०, लातूर ९२,  उस्मानाबाद ९३, तर हिंगोली इथं ९३ पूर्णांक ६९ टक्के मतदान झालं. मतमोजणी परवा सोमवारी सहा फेब्रुवारीला होणार आहे.

****

संसदेत नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील अनेक रेल्वेमार्गांच्या कामांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून त्यासाठी जवळपास ५ हजार ९५८ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. राज्यातल्या १३ नवीन मार्गांचं सर्वेक्षण, सहा नवीन प्रकल्पांना मंजूरी आणि  चार मार्गांवरील विद्युतीकरणाचा यात समावेश आहे.

यामध्ये बीड नगर परळी या लोहमार्गासाठी २७० कोटी तर मुदखेड ते परभणी लोहमार्ग दुपदरीकरणासाठी ७१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असून औरंगाबाद आणि नांदेड रेल्वेस्थानकाच्या विकास कामांसाठीही निधी मंजूर झाला आहे.

****

कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी येत्या चार आठवड्यात एक व्यापक आराखडा तयार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीय जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठानं हे निर्देश देतानाच संबंधित क्षेत्रातील रिक्त जागा कशा प्रकारे भरणार याचादेखील आराखड्यात उल्लेख करावा असं म्हटलं आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटी साठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित करण्यात आली असून, एका उमेदवाराला कमाल तीन वेळा ही परीक्षा देता येणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतीय वैद्यक परिषदेशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय जारी केला. या निर्णयानुसार येत्या ७ मे २०१७ रोजी होणारी परीक्षा ही उमेदवारांचा पहिला प्रयत्न मानली जाईल, असं युएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांसोबतच महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांनाही ४० टक्के स्थान द्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या अभ्यासक्रमांसाठीच्या खासगी शिकवणी चालकांसाठी नियम तयार करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिवार्य केले जाणार नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात इंग्रजीसह तीन भाषा अनिवार्य केल्या जाव्यात असा प्रस्ताव मंडळानं मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केला होता, मात्र २०१९-२० या शैक्षणिक वर्षाआधी या भाषा अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यास मंत्रालयानं नकार दिला असल्याचं सूत्रानं सांगितलं.

दरम्यान, मंडळानं परीक्षेची ओपन बुक पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रद्द करण्याचे संकेत वित्तसचिव शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. सध्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी साप्ताहिक २४ हजार रुपये मर्यादा आहे. चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा गेल्या आठवड्यात रिजर्व्ह बँकेनं रद्द केली आहे. पुनर्मुद्रीकरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आल्याचं, दास यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

****

विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बाळगण्यास प्रतिबंध करणारं विधेयक लोकसभेत काल सादर झालं. या विधेयकातल्या तरतुदींनुसार रद्द झालेल्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगल्यास, तो दंडनीय अपराध असेल. सापडलेल्या नोटांच्या एकूण मूल्याच्या ५ पट रक्कम किंवा दहा हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, तेवढा दंड दोषी व्यक्तीला ठोठावला जाईल.

****



केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीनं वन विभागाच्या मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर  केला. पात्र उमेदवारांची मुलाखत २७ फेब्रुवारीला होणार आहे. आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

या प्रादेशिक बातम्या, आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्युज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

सरकार आणि साहित्यिक यांच्यातील संवाद वाढवून साहित्यिकांच्या मागे खंबीरपणे उभं राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डोंबिवली इथं ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाल, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा ज्ञानभाषा करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. अध्यक्षीय भाषणात काळे यांनी इंग्रजीच्या वाढत्या अतिक्रमणामुळे बोलीभाषांकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगत, बोलीभाषा संवर्धनाची गरज नमूद केली.

त्यापूर्वी काल सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीनं या संमेलनाला प्रारंभ झाला. स्थानिक कलापथकांसह, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या ग्रंथदिंडीत लक्षणीय सहभाग होता. त्यानंतर मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाध्यक्षाची आत्मकथा या पुस्तकाचं प्रकाशनही सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

लातूर इथं आजपासून तिसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. लहुजी शक्ती सेना आणि मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं आज सकाळी साडे दहा वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

****

पुण्यात कालपासून सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारतानं एकेरीचे दोन्ही  सामने जिंकून न्यूझीलंडवर २-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात युकी भांब्री यानं फिन टिअर्नी याचा ६-४, ६-४, ६-३ असा सरळ तीन सेट मध्ये पराभव केला. दुसऱ्या सामन्यात रामकुमार रामनाथननं जोस स्टॅथम याच्यावर ६-३, ६-४, ६-३ असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. या स्पर्धेत आज लिएंडर पेस आणि विष्णू वर्धन ही जोडी, मायकेल व्हिनस-आर्टेम सिटॅक विरुद्ध दुहेरीचा सामना खेळेल. म्हाळुंगे- बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही स्पर्धा सुरू आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन, नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळाच्या वतीनं भाव स्थिरता निधी योजनेअंतर्गत चार शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनानं ठरवून दिलेल्या निकषानुसार एफएक्यू प्रतीची तूर खरेदी करण्यात येत आहे. औरंगाबादसह लासूर स्टेशन, वैजापूर आणि पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.

****

चित्रपट महोत्सवातून उत्तम प्रेक्षक निर्माण व्हावा असं मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध २९ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

//*******//

No comments: