आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०४ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा
निवडणुकांसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाच्या
युतीनं लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे, तर गोव्यातही संरक्षणमंत्री
मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आम आदमी पक्ष पहिल्यांदाच या
राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. गोव्यामध्ये ४० जागांसाठी एकूण २५१ उमेदवार
रिंगणात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा
मंच, शिवसेना आणि मगोपने महायुती केली आहे. तर पंजाबमध्ये ११७ जागांसाठी एक हजार १४५
उमेदवार रिंगणात आहेत. गोवा आणि पंजाबनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये
विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
****
जनतेकडून
मोठ्या प्रमाणात पैसे उकळून आधारसंबंधी सेवा पुरवणाऱ्या अनधिकृत संकेतस्थळं आणि मोबाईल
ॲप्लिकेशन्सविरुद्ध कडक कारवाई करत भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणानं १२ संकेतस्थळं
आणि १२ मोबाईल ॲप्लिकेशन्स बंद केली आहेत. प्राधिकरणानं कोणत्याही मोबाईल
ॲप्लिकेशन्सच्या मालकांना आधारसंबंधी सेवा देण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं प्राधिकरणाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी म्हटलं आहे. अनधिकृत आधारसंबंधी सेवा
पुरवणाऱ्या संस्थांविरुद्ध सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
****
राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१३ ते २०१६ या काळात एकूण दोन
कोटी ३३ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. उद्दिष्टीत सार्वजनिक वितरण प्रणाली
- टी पी डी एसच्या तरतुदींचं उल्लंघन रोखण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं
संगणकीकरण योजना सुरू केली असून यामुळे बोगस शिधापत्रिकांना आळा बसून योग्य लाभार्थ्यांना
अन्नधान्य मिळू शकेल. २४ जानेवारी २०१७ पर्यंत शिधापत्रिकांचं १०० टक्के डिजिटायझेशन
झालं असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री सी आर चौधरी यांनी
राज्यसभेत सांगितलं.
****
नदीजोड प्रकल्पामुळे देशात कायदेशीर अडचणी निर्माण होतील, असं जलतज्ज्ञ राजेंद्र
सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नद्यांचं प्रदुषण
रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणी सोबतच सामाजिक जाणीव निर्माण होणं आवश्यक असल्याचं ते
म्हणाले.
****
No comments:
Post a Comment