Sunday, 5 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 04 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

****

करदात्यांना देशाप्रती अधिक जबाबदार बनवणं हा पुढच्या अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं उद्योग संघांच्या प्रतिनिधिंसोबत चर्चा करताना ते बोलत होते. देशात पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले केवळ २० लाख लोक स्वत:हून उत्पन्न घोषित करत असल्याचं जेटली यांनी सांगितलं. ९० टक्के विदेशी गुंतवणूक स्वयंचलित मार्गानं प्राप्त होत असल्यामुळे विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले.

****

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १०० रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. महात्मा गांधी -२००५ या मालिकेतल्या नोटेसारखीच ही नोट असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणाऱ्या या नोटेवर दोन्ही नंबर पॅनलमधल्या इन्सेटमध्ये आर हे इंग्रजी अक्षर असेल. नवी नोट येणार असली तरी पूर्वीच्या १०० च्या सर्व नोटा चलनात राहणार असल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. या दोन्ही राज्यातल्या युवकांनी निवडणुकीत अधिक उत्साहानं आणि जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

****

यावर्षी होणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट, ही वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेशासाठीच्या तीन प्रयत्नांपैकी पहिला प्रयत्न मानण्यात येणार असल्याचं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस सी नं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या नीट आणि ए आय पी एम टी परीक्षांच्या प्रयत्नांची या तीन प्रयत्नांमध्ये गणना होणार नसल्याचंही मंडळानं म्हटलं आहे. ज्यांचे यापूर्वी तीन प्रयत्न झालेले आहेत त्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही, अशी एक अधिसूचना मंडळानं जारी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आताच्या या नव्या घोषणेमुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी नीटच्या माध्यमातून वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाचे प्रवेश होणार आहेत.

                                    ****

नागालँडमध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. आंदोलकांनी काल दिमापूर आणि कोहिमामध्ये अनेक ठिकाणी महामार्ग बंद पाडले आहेत. आंदोलकांनी दिमापूरमधून इतर राज्यांमध्ये होणारी सर्व वाहतूक, मोबाईल सेवा, एस एम एस आणि इंटरनेट सेवादेखील बंद पाडली आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी सरकारी कार्यालयांची आणि वाहनांची तोडफोड केल्यामुळे अशा ठिकाणी सैन्यदलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिमापूर कोहिमामध्ये बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असून त्याअगोदरपासून हे आंदोलन सुरू आहे.  

****

देशातून कुष्ठरोगाचं निर्मूलन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चार आठवड्यात एक सर्वंकष योजना आखण्यास सांगितलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधिशांच्या खंडपिठानं यासाठी कनिष्ठ स्तरावरील भरती कशाप्रकारे करणार असल्याची विचारणाही सरकारला केली आहे. योजनेच्या सर्वंकष अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचं सरकारला सांगितलं आहे. याबाबत न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये १९८१ पासून कुष्ठरोगावर उपचार उपलब्ध असूनही सरकार कुष्ठरोगाचं निर्मूलन करण्यात अपयशी ठरले असल्याचं म्हटलं आहे.

                                    ****

केंद्रीय अण्वेषण विभाग - सी बी आय चे माजी संचालक जोगिंदर सिंग यांचं नवी दिल्ली इथं प्रदिर्घ आजारानं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. सिंग यांची १९९६ मध्ये सी बी आयचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात बोफोर्स, चारा घोटाळा, सुरक्षा रोखे घोटाळा, झारखंडमुक्ती मोर्चा, खासदारांचं लाच प्रकरण, सुखराम यांचा दूरसंचार घोटाळा यासारख्या प्रकरणांचा तपास करण्यात आला होता.

****

९०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली इथं सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध उद्योजक जयंत म्हैसकर आणि उद्योजिका अनुया म्हैसकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर आज दिवसभर बालकुमार मेळावा, नवोदित लेखिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसंच बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन, ग्रामीण स्त्री : वास्तवातील आणि साहित्यातील, या विषयावर परिसंवाद तर साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व या विषयावर चर्चासत्र होणार आहे.

//******//

No comments: