Sunday, 5 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 4 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान आज पार पडलं. गोव्यामध्ये ४० जागांसाठी एकूण २५१ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंजाबमध्ये ११७ जागांसाठी एक हजार १४५ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमध्ये दुपारी एकपर्यंत ३५ ते ४० टक्के मतदान झालं. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खासदार पदाचा राजीनामा दिल्यामुळं अमृतसर लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान झालं. पंजाबमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत ६६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर गोव्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८३ टक्के मतदान झालं.

****

जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज दुपारी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या पाहणीवेळी सैन्यानं एका वाहनाला अडवल्यानंतर ही चकमक झाल्याचं सैन्यानं सांगितलं. सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांना पळून जात असताना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवान आणि या दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. यावेळी या दहशतवाद्यांच्या ताब्यातून काही दारूगोळाही हस्तगत करण्यात आला.

****

पुढील आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर हा सात टक्क्यांपेक्षा जास्त असेल असं अर्थव्यवहार सचिव शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये फिक्कीच्या कार्यकारणी बैठकीमध्ये बोलत होते. विमुद्रीकरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तात्पुरता परिणाम होणार असून पुढील आर्थिक वर्षापर्यंत सर्वकाही सुरळीत होईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात डिजीटल व्यवहारांकडे जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मरगळ असताना भारताची आर्थिक गती मात्र व्यवस्थित असून येणाऱ्या काळामध्येही भारताला खुल्या धोरणाचाच पुरस्कार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

अल्पसंख्यांकांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. खूप वर्षानंतर सरकारनं अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० टक्के जास्त आर्थिक तरतूद केल्याचं ते म्हणाले. अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या ‘नई मंजिल, नई रोशनी’, ‘सीखो और कमाओ’ यासारख्या विविध योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं नक्वी यांनी सांगितलं. भारतीय हज यात्रेकरुंच्या कोट्यात वाढ झाली असून, यावर्षी ३५ हजार अधिक यात्रेकरु हज यात्रेसाठी जाणार असल्याचं ते म्हणाले. 

****

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिले आहेत. बीड इथं औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड इथं होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सहारिया यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, तसंच नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी असंही सहारिया यांनी सांगितलं. 

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी काल झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी होणार आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघातल्या आठही जिल्ह्यात मतदान शांततेत झालं. विभागात सरासरी ८७ पूर्णांक २३ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद इथं सुमारे ७५ टक्के, जालना ८५, नांदेड ८८, बीड ८९, परभणी ९०, लातूर ९२, उस्मानाबाद ९३, तर हिंगोली इथं ९३ पूर्णांक ६९ टक्के मतदान झालं.

****

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी १२ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज, औरंगाबाद इथं १७ पूर्णांक पाच तर बीड इथं १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. 

****

भारत न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरी प्रकारात लिएंडर पेस आणि विष्णु वर्धन यांचा सामना होणार आहे. या दोघांसमोर मायकेल व्हिनस आणि आर्टेम सिटॅक यांचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेत भारतानं एकेरीचे दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडवर २-० अशी आघाडी घेतली आहे. म्हाळुंगे- बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही स्पर्धा सुरू आहे.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या नागापूर इथं उद्या पाचव्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेचे आयोजक दत्ता व्यवहारे यांनी ही माहिती दिली. परिषदेत गाथा पठण, धम्मदेसना, प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

****

No comments: