Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
हज यात्रा धोरणात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारची
सहा सदस्यांची
समिती
· आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे राज्य निवडणूक आयुक्त
जे एस सहारिया यांचे निर्देश
· स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराला प्रारंभ
आणि
· साहित्य
विश्वात सुरु असलेल्या गैरव्यवहारांकडे माध्यमांचं लक्ष नाही - ज्येष्ठ
साहित्यिक रा.रं.बोराडे
****
हज यात्रा धोरणात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं सहा सदस्यांची
एक समिती नेमली आहे. या समितीला हज धोरणासंबंधीचा अहवाल सादर करण्याचं सरकारनं सांगितलं
आहे. त्याचप्रमाणे हज यात्रेकरुंना दिल्या जाणाऱ्या अनुदानासंबंधीची चौकशी करण्यासही
सरकारनं या समितीला सांगितलं आहे. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या अनुदानात हळूहळू कपात करुन २०२२ सालापर्यंत ते रद्द करावं, असं म्हटलं
होतं.
या अनुदानावर दरवर्षी जवळपास साडे सहाशे कोटी रुपये खर्च होतो,
या रकमेचा उपयोग मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा असं
न्यायालयानं म्हटलं होतं.
****
भारतीय हज यात्रेकरुंच्या कोट्यात वाढ
झाली असून, यावर्षी ३५ हजार अधिक यात्रेकरु हज यात्रेसाठी जाणार असल्याचं
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. अल्पसंख्याकांचा सामाजिक, शैक्षणिक
आणि आर्थिक विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठीच्या
तरतुदीत १०टक्के वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १०० रूपयांची
नवी नोट चलनात आणणार आहे. महात्मा गांधी -२००५
या मालिकेतल्या नोटेसारखीच ही नोट असणार आहे. रिझर्व्ह
बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणाऱ्या या नोटेवर दोन्ही नंबर पॅनलमधल्या
इन्सेटमध्ये आर हे इंग्रजी अक्षर असेल. नवी
नोट येणार असली तरी पूर्वीच्या १०० च्या सर्व नोटा चलनात राहणार असल्याचं बँकेकडून
स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकांसाठी काल
भरघोस मतदान झालं. पंजाबमध्ये सुमारे ७५टक्के तर गोव्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८३ टक्के
मतदानाची नोंद झाली. पंजाबमध्ये
विधानसभेच्या ११७ तर गोव्यात ४० जागा आहेत. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत
मतदान पार पडलं. येत्या ११ मार्च रोजी या मतदानाची गणना केली जाणार आहे.
****
राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष
राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिले आहेत. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद
जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बीड इथं बोलत होते. सहारिया
यांनी परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी
परभणी इथंही आढावा बैठक घेतली. नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई
करावी असे निर्देश सहारिया यांनी दिले.
दरम्यान, राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक
पद्धतीनं पार पडावी या उद्देशानं राज्य निवडणूक आयोगानं 'ट्रू वोटर ॲप' आणि 'सिटीझन ऑन पेट्रोल' हे दोन मोबाईल ॲप तयार केले आहेत. मतदारांसाठी मतदार
यादीत नावं तसंच मतदान केंद्राचा पत्ता शोधणं, आदी सुविधा या ॲपवर उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत.
****
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार फेऱ्या तसंच सभांना प्रारंभ
झाला आहे. शेतमालाला योग्य भाव, शेती तसंच इतर समस्यांसह यंदाच्या निवडणुकीत नोटाबंदीचा
निर्णय आणि त्याचे सर्वंकष परिणाम हा विषय प्रचार सभांमधून
गाजत असल्याचं दिसत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या प्रचाराचा
प्रारंभ काल मानखुर्द इथं करतांना राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेना युतीवर जोरदार
टीका केली. या दोन्ही पक्षांनी मुंबईचे वाटोळं केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत परिवर्तन घडवण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं.
काँग्रेस पक्षाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात येणेगूर इथं आयोजित प्रचार सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र
तसंच राज्यातल्या भाजप प्रणीत सरकारवर जोरदार टीका केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर तसंच
सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.
****
भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती करणार नसल्याचे संकेत शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत गिरगाव इथं जाहीर सभेत बोलत
होते. एकदा युतीच्या जोखडातून बाहेर पडल्यावर पुन्हा युती करायची नाही, असं ठाकरे यांनी
स्पष्ट केलं.
****
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर
डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे
****
साहित्य विश्वात सुरु असलेल्या गैरव्यवहारांकडे माध्यमांचं लक्ष
नाही, अशी खंत ज्येष्ठ
साहित्यिक रा.रं.बोराडे यांनी व्यक्त केली आहे. डोंबिवली इथं सुरु असलेल्या ९०व्या
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त कालच्या दुसऱ्या दिवशी ‘साहित्य व्यवहार आणि
माध्यमांचं उत्तरदायित्व’ या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. आजचा लेखक पूर्णपणे
दुर्लक्षित असल्याची खंतही बोराडे यांनी यावेळी व्यक्त केली. संमेलना’त काल दिवसभरात
इतरही विविध विषयावर परिसंवाद झाले. कवी संमेलन, गझलकट्टा, बालमेळावा, तसंच मान्यवरांच्या
मुलाखतींना रसिकांनी पसंती दर्शवली.
****
परभणीच्या जिल्हा
व्यापारी महासंघानं स्थानिक संस्था कर - एलबीटीच्या
विरोधात गेल्या नऊ दिवसांपासून पुकारलेला बंद काल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला. परभणी महानगरपालिकेत एजन्सीमार्फत होणाऱ्या एलबीटीच्या
वसुलीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. एलबीटी संदर्भात परभणीच्या
व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळानं मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली होती.
****
परभणीहून औरंगाबादला येत असलेल्या मोटारीनं बदनापूरजवळ असलेल्या एका पुलाला धडक दिल्यामुळं झालेल्या
अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. काल पहाटे
दोनच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाला झोप लागल्यानं त्याचं
मोटारीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
****
स्त्रियांवरील लैंगिक छळाचा प्रतिकार करण्यासंबंधीच्या राज्य महिला
आयोगाच्या पुश अभियानाची काल औरंगाबाद इथं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या
हस्ते सुरुवात करण्यात आली. शहरातील विवेकानंद महाविद्यालयात हे अभियान सुरु झालं आहे. राज्यभरातल्या महाविद्यालयांमध्ये पुश अभियानाची अंमलबजावणी केली जाणार असून
सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी
मंच तयार केले जाणार असल्याचं रहाटकर यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर
तालुक्यातल्या नागापूर इथं आज
पाचव्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन
करण्यात आलं आहे. परिषदेचे आयोजक दत्ता व्यवहारे यांनी ही माहिती दिली. परिषदेत
गाथा पठण, धम्मदेसना, प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
****
सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाचा अवमान करुन रस्त्यावर
अतिक्रमणास मदत केल्या प्रकरणी लातूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांवर
गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक सुधीर धुत्तेकर यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या सर्व सदस्यांना अपात्र घोषीत करावं असंही
धुत्तेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
पूर्णा शहर पाणी पुरवठा योजनेसाठी निम्न दुधना
प्रकल्पातून आज सकाळी ९ वाजेपासून १२०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होणार
आहे. पुढच्या शंभर तासात हे पाणी पूर्णा नदीवरच्या कोल्हापूरी बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल
या पार्श्वभूमीवर नदीकाठावरच्या गावातल्या नागरिकांना दक्षता बाळगण्याचं आवाहन परभणी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालय
आणि रूग्णालया तर्फे आजपासून १२ फेब्रुवारीपर्यंत मौखिक आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात
आलं आहे. त्यानिमित्त
अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी या
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मौखिक
आरोग्य शिक्षणाची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर एस.पी डांगे यांनी
केलं आहे.
****
मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या
शतकपूर्ती कार्यक्रमाचा गौरव सोहळा आज औरंगाबाद इथं होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून संस्थेच्या
नागेश्वरवाडी इथल्या सभागृहात दुपारी तीन वाजता हा सोहळा होणार आहे.
****
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एका मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचं आढळल्यांन, या केंद्रावर
उद्या पुर्नमतदान घेण्याचे आदेश निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्त
अनुपकुमार यांनी दिले आहेत. मतदानाच्या वेळी केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई न वापरता मार्कर पेनचा वापर केला
आणि १४३ मतदारांनी जांभळ्या पेनाचा वापर करण्याऐवजी निळ्या पेनाचा वापर केल्याचं आढळून
आलं. या प्रकरणी दोन जणांना निलंबित करण्यात आल्यांच त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment