Friday, 3 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 01 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      २०१७- १८ वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार

·      काळ्या पैशाविरोधातल्या लढाईत विमुद्रीकरण हे महत्त्वाचं पाऊल - राष्ट्रपती

·      आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन; मराठा आरक्षण याचिकांवर २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी

आणि

·      जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; निवडणूक खर्च मर्यादेत वाढ

****

२०१७- १८ या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अर्थमंत्री अरूण जेटली आज संसदेत सादर करणार आहेत. या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च पूर्वी आगामी वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश यामागे आहे.

      नोटाबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याचं तसंच अर्थव्यवस्थेला गतीमान करण्याचं आव्हान केंद्र सरकारपुढे असणार आहे. कृषी, शेतकरी, ग्रामीण भाग, तरुण यांच्यासाठी काही विशेष योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. लघु आणि मध्यम उद्योगांनाही अर्थसंकल्पातून काही अपेक्षा आहेत. अपघातांच्या संकटातून रेल्वेची सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांकरता मोठा राखीव निधी उभारला जाण्याची तसंच  संरक्षण क्षेत्रासाठीही मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक कर रचनेतही बदलाच्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, २०१७ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल लोकसभेत सादर करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर पूर्णांक एक दशांश राहण्याचा अंदाज या अहवाला वर्तवण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात विकास दर पावणे सात ते साडे सात टक्क्यांच्या दरम्यान असेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

अर्थसंकल्पाच्या सादर करण्याच्या वेळापत्रकात बदल तसंच रेल्वे अर्थसंकल्पाचं सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलिनीकरण यामुळे संसदेच हे अधिवेशन ऐतिहासिक असल्याचं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल पहिल्या दिवशी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ते काल बोलत होते. काळ्या पैशाविरोधातल्या लढाईत विमुद्रीकरण हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. जनतेच्या सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचं सांगत, राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सामाजिक सुरक्षा योजना, मुद्रा योजना, जनधन योजना, यासह विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला.

****

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं काल राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या प्रमुख महामार्गावर हे आंदोलन करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. औरंगाबाद, हिंगोली, नांदेड सह अन्य ठिकाणी घडलेल्या किरकोळ घटना वगळता हे आंदोलन शांततेत पार पडलं. या आंदोलनात  महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलकांनी अनेक रस्त्यांवर वाहतूक रोखून धरली होती. यामुळे राज्यभरातल्या प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ जाळपोळीच्या घटना घडल्या तसंच काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकून वाहतूक रोखण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १६८ जणांवर कारवाई केली आहे.

मराठवाड्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आठ जिल्ह्यातले मुख्य रस्ते आंदोलकांनी काही काळ रोखून धरले होते. औरंगाबाद, नांदेड इथं आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तर हिंगोली इथं आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौक, पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रम चौक, वाळूज आणि हर्सुल भागात आक्रमक आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला. नांदेड शहरात कलामंदिर भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यामुळे इथंही आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला गेला, याच भागात किरकोळ दगडफेकीचीही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं राज्य परीवहन महामंडळाच्या बसवर दगडफेकीची घटना घडली. या घटना वगळता मराठवाड्यातल्या अन्य भागात हे आंदोलन शांततेत पार पडलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात आणि समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर येत्या २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. याचबरोबर याचिकाकर्त्यांनी  किंवा प्रतिवाद्यांनी यापुढे कोणतेही अनावश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराबाबतचा ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामपंचायतीच्या प्रमाणपत्राची आता आवश्यकता असणार नाही. याऐवजी स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. राज्य मंत्रीमंडळानं काल या संबंधिच्या नियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास मान्यता दिली. निवडणुकीपासून उमेदवार वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

वैद्यकीय आणि दंतवैद्यक शाखेत प्रवेश घेण्यासाठी देश पातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट येत्या सात मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसई ही परीक्षा घेणार असून देशातल्या ८० शहरात ती होणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून  अंतिम तारीख एक मार्च आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आजपासून आकाशवाणी विशेष एफ एम रेडिओ वाहिनी सुरू करत आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चंद्र पांडा यांच्या हस्ते या वाहिनीच्या प्रसारण सेवेस सुरूवात होईल. ही सेवा १०३ पूर्णाक सात मेगा हर्टझवर उपलब्ध असेल.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल औरंगाबाद जिल्ह्यातून जिल्हा परिषद गटांसाठी ९५ तर पंचायत समिती गणांसाठी १४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. मुंबई महापालिकेसह १५१ ते १७५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेसाठी ही मर्यादा दहा लाख रूपये करण्यात आली आहे. ११६ ते १५० सदस्य संख़्या असलेल्या पालिकेसाठी आठ लाख रूपये, ८६ ते ११५ सदस्य संख्यांसांठी सात लाख रूपये तर ६५ ते ८५ सदस्यांसाठी ही मर्यादा पाच लाख करण्यात आली आहे. तर ७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यांतल्या जिल्हा परिषदांसाठी सहा लाख रूपये आणि पंचायत समित्यांसाठी चार लाख रूपये, ६१ ते ७० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषंदासांठी पाच लाख रूपये तर पंचायत समित्यांसाठी साडेतीन लाख रूपये आणि ५० ते ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदांसाठी चार लाख आणि पंचायत समित्यांसाठी ही मर्यादा तीन लाख रूपये अशी करण्यात आली आहे.

****

केंद्र सरकारनं वाहनाशी संबंधित केलेली शुल्क वाढ मागं घ्यावी या मागणीसाठी काल रिक्षा चालकांनी  एक दिवसाचं आंदोलन केलं. औरंगाबाद शहरात पैठणगेटपासून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांनीही  या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

****

औरंगाबादच्या अंकित बावणेची क्रिकेटच्या भारत अ संघात निवड झाली आहे. हार्दिक पटेलकडे या संघाचं नेतृत्व आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रेबार्न इथं येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यात तो खेळणार आहे.

****

लातूर इथल्या कीर्ती तेल कंपनीमध्ये नऊ कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरून झालेल्या मृत्यू प्रकरणी कंपनी मालकासह चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कंपनीचे मालक कीर्ती भुतडा, संचालक एस. पी. गायकवाड, व्यवस्थापक एकनाथ केसरे, प्रकल्प प्रमुख मनोज क्षीरसागर यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं, पोली उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

****

नांदेडहून हिंगोली, अकोला मार्गे अमृतसरला जाणारी नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेस आज दुपारी एक वाजता सुटणार आहे. दुसरी औरंगाबाद - मनमाड मार्गे धावणारी सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडला येणारी गाडी नियमित वेळेपेक्षा खूप उशीरा धावत असल्यामुळे आज ही गाडी नांदेडहून सुटणार नाही.

दरम्यान, परळीमार्गे जाणारी नांदेड ते पुणे त्रिसाप्ताहिक रेल्वे आजपासून पनवेलपर्यंत धावणार आहे. ही गाडी आता शनिवार वगळता दररोज पनवेलपर्यंत जाईल.

औरंगाबाद, मनमाडमार्गे धावणाऱ्या नांदेड पुणे नांदेड या द्वी साप्ताहिक गाडीच्या वेळेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

लातूर इथं राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेला लागलेल्या आगीत खराब झालेले ऑईल फिल्टर आणि भंगार साहित्य जळून खाक झाले. काल दुपारी लागलेली ही आग अग्नीशामक दलाच्या सहा बंबांनी आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//********//

No comments: