Friday, 3 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

अर्थमंत्री अरुण जेटली आतापासून काही वेळात वर्ष २०१७-१८ चा  सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन अर्थमंत्री काही वेळापूर्वीच संसदेत पोहोचले आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री यासंदर्भातल्या प्रश्नांना ट्विटरवर उत्तरं देणार आहेत. माय क्वेश्चन टू एफएम ह्या हॅशटॅगचा वापर करून अर्थमंत्र्यांना ट्विटरवर प्रश्न करता येतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं काम सुरळितपणे चालू देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं असून, सर्व मुद्द्यांवर रचनात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

****

आकाशवाणीचा वृत्तविभाग आज सकाळी साडे दहा वाजता हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विशेष अर्थसंकल्पपूर्व चर्चा प्रसारित करणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या, अर्थसंकल्पीय भाषणाचं प्रसारण होणार असून, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजीमधून अर्थसंकल्पासंदर्भात प्रत्येकी पंधरा मिनिटांची दोन विशेष बातमीपत्रं प्रसारित होतील. यानंतर पुन्हा विशेष चर्चा प्रसारित केली जाणार आहे. या विशेष कार्यक्रमांमुळे दिवसा प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषांमधल्या बातमीपत्रांच्या वेळेत आज बदल होणार आहे.

****

आयकर विभागानं कालपासून ‘ऑपरेशन क्लीन मनीया मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमांची ई-पडताळणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात करविवरणपत्रातल्या माहितीशी विसंगत रोख व्यवहार करणारे सुमारे १८ लाख नागरिक आढळून आले आहेत.

****

आज देशभरात, विशेषत: उत्तर भारतात वसंत पंचमी साजरी केली जात आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करणारा हा सण दरवर्षी माघ पंचमीला साजरा केला जातो. शैक्षणिक संस्थांमधून सरस्वती पूजन कार्यक्रमांसह, ठिकठिकाणी होणाऱ्या पतंगबाजीच्या स्पर्धा याद्वारे हा सण साजरा होत आहे.

****

काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना दिल्ली इथं मानवंदना दिल्यानंतर राज्यातल्या शहीद जवानांचे पार्थिव देह काल रात्री पुण्यात आणण्यात आले असून, पुढे ते त्या त्या जवानांच्या जन्मगावी पोहचवण्यात येत आहेत बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातल्या गांजपूरच्या विकास समुद्रे या शहीद जवानाचा पार्थिव देह धारूरच्या शिवाजी चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर गांजपूर इथं  शासकीय इतमामात पार्थिव देहावर अंत्यसंस्क्‍ार करण्यात येतील, असं आमच्या वाताहरानं कळवलं आहे.

//*******//

No comments: