Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 1 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर केला. वार्षिक
तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता आयकर भरावा लागणार नसून, साडे तीन लाख रुपये
उत्पन्नावर फक्त अडीच हजार रुपये आयकर आकारण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात
मांडला आहे.
या व्यतिरिक्त
वार्षिक अडीच लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावरच्या आयकरात
कपात करण्यात आली असून, आता पूर्वीच्या १० टक्क्यांऐवजी ५ टक्के कर प्रस्तावित आहे.
५० लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकरावर १० टक्के
अधिभार आकारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. पाच लाख रुपयांपासून
पन्नास लाख रुपये इतक्या वार्षिक उत्पन्नावर आयकरात साडेबारा हजार रुपये सूट या अर्थसंकल्पात
प्रस्तावित आहे.
५० लाख
रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगांच्या करात ५टक्के कपात, तसंच द्रवीभूत नैसर्गिक
वायूच्या आयातीवरच्या सीमा शुल्कातही अडीच टक्के, इतकी कपात करण्याची तरतूद अर्थमंत्र्यांनी
सुचवली आहे.
महात्मा
गांधी रोजगार हमी योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत
वर्षभरात १० लाख तलाव बांधण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.
२०१७-१८
या आर्थिक वर्षात कृषीकर्ज वाटपाचं उद्दीष्ट १० लाख कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं
असून, पीक विमा योजनेसाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
ग्रामीण
तसंच कृषी संबंधित क्षेत्रासाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तेवीस कोटी तर महिला
बालकल्याण विभागासाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे. संरक्षण विभागासाठी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एक्केचाळीस हजार कोटी,
तर परिवहन क्षेत्रासाठी दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद
प्रस्तावित आहे.
दुग्ध
प्रकिया विकास निधीसाठी आठ हजार कोटी रुपये, सूक्ष्म सिंचन निधीसाठी पाच हजार कोटी
रुपये तर अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपये तरतूद
प्रस्तावित आहे. महिलांना स्वयंरोजगार शिक्षणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची
तरतूद करण्यात आली आहे. युवकांसाठी ‘स्वयम् मंच’ स्थापन करून याअंतर्गत सुमारे साडे
तीनशे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रधानमंत्री
ग्रामीण आवास योजनेसाठी तेवीस हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, २०१९ पर्यंत
बेघरांसाठी एक कोटी घरं बांधण्याचं, तसंच एक कोटी कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्यावर
आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी चौसष्ट
हजार नऊशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, रस्ते बांधण्याची गती प्रतिदिन एकशे
तेहतीस किलोमीटरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. द्वितीय श्रेणीतील
शहरांसाठी खासगी सार्वजनिक सहभागातून विमानतळं उभारण्याचा प्रस्ताव आहे.
एक मे
२०१८ पर्यंत १०० टक्के ग्रामीण क्षेत्रात विद्युतीकरण केलं जाणार असून, सहाशे पेक्षा
अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचं
अर्थमंत्री म्हणाले.
क्षयरोग,
कुष्ठरोग आणि कांजण्या या तीन रोगांचं समूळ उच्चाटनाचा निर्धारही जेटली यांनी व्यक्त
केला आहे.
या वर्षीपासून
रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर न करता, सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वेसाठीच्या
तरतुदी आज अर्थमंत्री जेटली यांनी सादर केल्या.
रेल्वे
प्रवास भाड्यात कोणताही बदल प्रस्तावित नसून, रेल्वेच्या ई तिकिटावरील सेवा कर रद्द
करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला. येत्या वर्षात साडे तीन हजार किलोमीटरचे
नवे रेल्वेमार्ग विकसित केले जाणार आहेत. विनाचौकीदार रेल्वे क्रॉसिंग बंद होणार असून,
सर्व रेल्वेगाड्यांमध्ये जैव शौचालयं बसवली जाणार आहेत. रेल्वेच्या विकासासाठी एक लाख
एकतीस हजार कोटी रुपयांची तर रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे. पाचशे रेल्वे स्थानकं दिव्यांगांसाठी अनुकूल बनवली जाणार असून, सात हजार स्थानकं
सौर ऊर्जेवर कार्यान्वीत केली जाणार आहेत.
तीन
लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार आता रोख स्वरूपात करता येणार नसून, राजकीय पक्षांना
कोणत्याही व्यक्तीकडून रोख स्वरुपात दोन हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी घेता येणार नाही,
यापेक्षा अधिक रकमेच्या देणग्या धनादेश किंवा डिजिटल स्वरूपातच स्वीकारता येईल, असं
अर्थसंकल्पात म्हटलं आहे.
****
उत्तम
अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन
केलं असून, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी बळकटी मिळून देश विकासाच्या
दिशेनं वाटचाल करेल, असं म्हटलं आहे.
****
काँग्रेस
उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मात्र हा अर्थसंकल्प फुसका बार ठरल्याचं म्हटलं
असून, शेतकरी, युवक आणि रोजगार निर्मितीसाठी यात काहीही तरतूद नसल्याचं आणि दूरदृष्टीचा
अभाव असल्याची टीका केली आहे.
तृणमूल
काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी हा अर्थसंकल्प पोकळ घोषणांचा पाऊस असल्याचं
म्हटलं आहे.
*****
No comments:
Post a Comment