Tuesday, 5 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      राज्यशासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कारयुनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा तसंच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर

·      हर घर तिरंगा अभियानात स्वातंत्रदिनापर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन

आणि

·      मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांना राज्यशासनाची नोटीस

****

एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रति रुग्ण दोन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****

राज्यशासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कारयुनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, समानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात विशाल शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यशासन यासंदर्भात पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नांदणी मठानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. या हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्यसरकार एक वैद्यकीय पथक तयार करेल तसंच या प्रकरणात नागरिकांच्या विरोधात दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भातही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. कबूतरखान्याबाबतच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात तसंच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासंदर्भातही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या स्मारकाशी निगडित विविध मुद्यांवर या बैठकीच चर्चा झाली.

****

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी ७० कोटीचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -NPCI च्या अहवालानुसार, गेल्या शनिवारी दोन ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे ७० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांत UPI व्यवहारांची दैनंदिन संख्या दुपटीनं वाढली आहे. केंद्र सरकारनं UPI च्या माध्यमातून दररोज १०० कोटी व्यवहारांचं लक्ष्य ठेवलं असून ते पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

****

बिहार मधल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण मुद्यावरून विरोधी पक्षाने गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

लोकसभेचं कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळात प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी सदनात दिवंगत माजी संसद सदस्य तिलकधारी प्रसाद सिंह, रामरति बिंद आणि शिबू सोरेन यांना आदरांजली वाहण्यात आली.

राज्यसभेतही याच मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. उपाध्यक्ष हरिवंश यांनी सदनाच्या कामकाजात सतत अडथळे येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळामुळे या अधिवेशन सत्रात आतापर्यंत ४१ तास ११ मिनिटांचा वेळ वाया गेल्याचं हरिवंश यांनी सांगितलं.

****

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज दिल्लीत प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते एकोणऐंशी वर्षांचे होते. नवी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. संविधानाचं ३७०वं कलम रद्द करुन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आला, तेव्हा मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य म्हणून काम केलेले मलिक यांनी बिहार, ओदिशा, गोवा तसंच मेघालयचं राज्यपालपदही भूषवलं होतं.

****

माजी केंद्रीय मंत्री तसंच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिव देहावर आज झारखंडमध्ये रांची इथं अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी आज सोरेन यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

दिल्लीत उभारलेल्या कर्तव्य भवन या शासकीय कार्यालय संकुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन होणार आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली मंत्रालयांची कार्यालयं एका ठिकाणी आणून कार्यक्षमता, नवोन्मेष वाढवण्यासाठी कर्तव्य भवन उभारण्यात आल्याचं, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविभाग मंत्री मनोहर लाल यांनी सांगितलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुमारे दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या सहा मजली संकुलात गृह, परराष्ट्र, ग्रामविकास, आदी मंत्रालयांसह विविध कार्यालयं असणार आहेत.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएच्या संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक झाली. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सशस्त्र दलांचं कौतुक करणारा ठराव सर्व खासदारांनी मंजूर केला.

****

दरवर्षीप्रमाणेच यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा, त्यासोबतचा आपला सेल्फी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा, असं आवाहन सरकारनं केलं आहे. या मोहिमेसाठी कार्यकर्ता म्हणून नोंदणी गेल्या शनिवारपासून सुरु झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हर घर तिरंगा अभियान शाळांमध्ये राबवलं जाणार आहे. यामध्ये दोन ते आठ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात शाळेच्या भिंती आणि फलक तिरंगा प्रेरित चित्रांनी सजवणं, तिरंगा रांगोळी तसंच तिरंगा राखी स्पर्धा, सैनिक तसंच पोलिस कर्मचाऱ्यांना राखी पाठवणं, नऊ ते १२ ऑगस्ट दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात तिरंगा यात्रा तर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिसऱ्या टप्प्यात ध्वजारोहण तसंच तिरंग्यासह सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करणं, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यभरात १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. या सर्व १४ हजार पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं बजावली आहे. महिनाभरात पैसे परत न केल्यास, गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे साडे २१ कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत.

****

तेंडुलकर-अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सोडवल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी सदर गुणतालिकेत इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणतालिकेत आघाडीवर आहे.

****

चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारं यात्री छावा राईड ॲपएसटी महामंडळ लवकरच सुरू करणार आहे. परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देशाने बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस या वाहन सेवासाठी हे ॲप सुरू करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ- म्हाडाच्या एक हजार ३४१ निवासी सदनिका आणि नाशिक मंडळातील ६७ सदनिका अशा एकूण एक हजार ४०८ सदनिकांच्या सोडतीसाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची येत्या २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती दिली.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून जनता दरबार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या समस्या आणि तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या मानवत आणि परभणी तालुक्यातील ५४ गावांना पाणी कसे देता येईल यासाठी सर्वेक्षण अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी याबाबत मंत्री विखे पाटील यांच्याकडे या कामातल्या दिरंगाई बद्दल तक्रार केली होती, त्यावरुन आज मंत्री विखे पाटील गोदावरी पाटबंधारे महामंडळाला निर्देश दिले आहेत.

****

हवामान

दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 December 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी...