आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 31 October 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
विकसित
भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं-पंतप्रधानांचं
आवाहन
·
सरदार
पटेल यांची जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
देशभरातून अभिवादन; एकता दिनानिमित्तच्या विविध उपक्रमांना नागरिकांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद
·
राज्यात
१४ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजनेची अंमलबजावणी
·
‘मिशन मौसम’अंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार
बसवण्याला केंद्राची मंजुरी
आणि
·
दुसऱ्या
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर चार गडी राखून विजय
****
विकसित भारताचं स्वप्न साकार
करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं,
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर
सुवर्ण जयंतीनिमित्त गुजरातमध्ये एकता नगर इथं राष्ट्रीय एकता दिवस समारंभाला
पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या
एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तत्पूर्वी,
एकता नगर इथं आज भव्य एकता दिवस
संचलन करण्यात आलं. यामध्ये सीमा सुरक्षा दल,
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विविध
राज्यांतील पोलीस दलांच्या तुकड्यांचा समावेश होता. हवाई दलाच्या ‘सूर्य किरण’ पथकानं तिरंग्याची आकर्षक
शौर्यगाथा प्रदर्शित केली. ‘विविधतेून एकता’ या संकल्पनेवर
दहा चित्ररथ या संचलनात सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश
होता. यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना,
पंतप्रधानांनी, सरकारनं २०१४ पासून नक्षलवाद आणि
दहशतवादाच्या उच्चाटनासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचं सांगितलं. सर्व भारतीय
भाषांचं संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला, ते म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
सरदार पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण
जयंती देशभरात आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला
पुष्पांजली वाहिली आणि देशवासियांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरदार पटेल यांचा दृढ निर्धार आणि
दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं उपराष्ट्रपती सी. पी.
राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं.
****
देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान दिवंगत
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र त्यांच्या स्मृतींना अभिवादन
करण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ साली दिल्लीत शासकीय निवासस्थानी अंगरक्षकाने
केलेल्या गोळीबारात इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता. लोकसभेचे विरोधी
पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन इंदिरा गांधी यांना
आदरांजली अर्पण केली.
****
मुंबईत राजभवनात तसंच मंत्रालयात
सरदार पटेल तसंच इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं
महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद कार्यालयात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
परभणी शहरात आज भाजपच्या वतीनं
एकता दौड घेण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गोमातेची
पूजा करून एकता दौडचा प्रारंभ केला. परभणी पोलिसांच्या वतीनंही कृषी विद्यापीठ गेट
ते पोलीस कार्यालय अशी दौड घेण्यात आली. हिंगोली पोलिसांनीही एकता दौड घेऊन एकतेचा
संदेश दिला.
छत्रपती संभाजीनगर इथेही एकता
पदयात्रा काढण्यात आली. तिचा समारोप राज्याचे इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे
यांच्या उपस्थितीत झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया - नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या वतीने आज “फिट इंडिया
फ्रीडम रन आणि स्वच्छता जनजागृती धाव” हा उपक्रम पार पडला. दौलताबाद इथं
देवगिरी किल्ल्यावरही रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्यात आला.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात एकता दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले. इंदिरा गांधी आणि
सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड
जिल्हा परिषदेत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकता आणि
अखंडतेची शपथ घेत देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
****
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त
दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या एक हजार चारशे सहासष्ट
पोलिसांना जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या नऊ पोलिस अधिकारी तसंच
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
****
राज्यात १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत
जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आज मुंबईत त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘इज ऑफ
डुईंग बिझिनेस’ संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेत १५४
सुधारणांचा समावेश आहे, यात राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि
विभागीय बैठका होतील, तसंच प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान
करण्यात येतील, अशी
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
‘मिशन
मौसम’ योजनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसवण्याच्या प्रस्तावाला केंद्र
सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.
जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे ही माहिती दिल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-
बोर्डीकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथे सी-बँड
प्रकारचा २५० किलोमीटर परिघ कार्यक्षेत्राचं रडार बसवण्याचं काम सुरू असल्याचं
बोर्डीकर यांनी सांगितलं. या केंद्रामुळे मराठवाड्यातल्या शेती, पीक संरक्षण, हवामान पूर्वसूचना आणि आपत्ती
व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे.
****
आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त
क्रीडा गुण विकसित करण्यासाठी ६०० विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन
करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी केली आहे. आज नाशिक इथं
मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या राज्यस्तरीय
क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या
स्पर्धेत दोन हजार ७०४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट
संघात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना यजमान
ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षण स्वीकारत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. अभिषेक शर्मा आणि हर्षित
राणा वगळता इतर फलंजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघ १९ व्या षटकांत १२५
धावांवर सर्वबाद झाला. यजमान संघानं हे आव्हान १४ व्या षटकांत सहा गडी गमावत पूर्ण
केलं.
मालिकेतला पहिला सामना पावसामुळे
रद्द करावा लागला होता, तर तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबरला होणार आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला अंतिम सामनाही
याच दिवशी खेळवला जाणार आहे.
****
कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर
छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण आणि आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखड्यासंदर्भात
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज आढावा बैठक घेतली. नाशिक इथल्या आगामी
कुंभमेळ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विविध
तीर्थक्षेत्रांना भाविकांकडून भेटी देण्याचा अंदाज असून त्या अनुषंगानं जिल्ह्यात
विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात
अतिवृष्टीबाधितांना जाहीर अनुदानाची रक्कम प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे अनुदान
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केलं जाईल,
असं तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे
यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यावर्षी
प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी एका
अ-मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये,
मानचिन्ह आणि मानपत्र असं या
पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हवामान
राज्यात आज विदर्भ आणि
खानदेशातल्या काही जिल्ह्यांसह, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. जालना, परभणी
तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात उद्या मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशवासियांना एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन केलं
आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं, असं ते म्हणाले.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त
एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभाला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं.
आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
सरकारनं २०१४ पासून नक्षलवाद
आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात
सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन आणि संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार
केला, ते म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
तत्पूर्वी, एकता नगर इथं
आज भव्य एकता दिवस संचलन करण्यात आलं. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव
पोलीस दल आणि विविध राज्यांतील पोलीस दलांच्या तुकड्यांचा समावेश होता. हवाई दलाच्या
'सूर्य किरण' पथकानं तिरंग्याची आकर्षक शौर्यगाथा प्रदर्शित केली.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती देशभरात आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत
आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि देशवासीयांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरदार पटेल यांचा दृढ निर्धार
आणि दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं उपराष्ट्रपती
सी. पी. राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शहा, दिल्लीच्या
मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही सरदार पटेल यांच्या
पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. सरदार पटेल यांनी संस्थानांचं एकत्रीकरण करून देशाची
एकता आणि सुरक्षा अधिक बळकट केली, असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज
एकता पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यलढा आणि अखंड भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई
पटेल यांचं योगदान अमूल्य असून, त्यांचा दृढनिश्चय आणि समर्पणाचं स्मरण करून आपण सर्वांनी
देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहावं, असं आवाहन इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण
मंत्री अतुल सावे यांनी केलं. शहागंज इथल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ पदयात्रेचा
समारोप झाला.
****
हिंगोली पोलीस दलातर्फे आज
एकता दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण
कोकाटे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
परभणी इथं सरदार वल्लभाई पटेल
यांच्या जयंती निमित्त पोलीस दलाच्या वतीनं एकता दौड आयोजित केली होती. पोलीस अधीक्षक
रवींद्र सिंह परदेशी यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. कृषी विद्यापीठ गेट ते
पोलीस अधीक्षक कार्यालय अशी ही दौड पूर्ण करण्यात आली.
परभणी भाजपच्या वतीने सरदार
पटेल यांच्या जयंती निमित्त एकता दौड काढण्यात आली. अरोग्य राज्य मंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर
साकोरे यांनी गोमातेची पूजन करून या एकता दौडला प्रारंभ केला.
नांदेड इथंही आज सकाळी नवा
मोंढा ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या उपक्रमात जिल्हाधिकारी
राहुल कर्डीले, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, पोलीस अधीक्षक
अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
कन्नड नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता
मिळाल्याची माहिती, कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी दिली आहे. या अंतर्गत
विविध वार्डात सिमेंटचे रस्ते आणि विविध विकासकामं केली जाणार आहेत.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 31 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३१ ऑक्टोबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे
पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आदरांजली
वाहिली. केवडिया येथील एकता नगर इथं झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी संबोधित केलं.
आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला बळकटी देण्याचा संकल्प केल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला
पुष्पांजली अर्पण करून दिवसाची सुरुवात केली. या प्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना
एकता दिवसाची शपथ दिली. त्यानंतर भव्य एकता दिवस परेड झाली. या परेडमध्ये बीएसएफ, सीआरपीएफ आणि विविध राज्य पोलिस दलांच्या
तुकड्यांचा समावेश होता. यावर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या
धर्तीवर आयोजित 'राष्ट्रीय एकता परेड'मुळे हा कार्यक्रम वैशिष्टय्पूर्ण बनला. या वर्षीचे
एक वैशिष्ट्य म्हणजे बीएसएफच्या मार्चिंग तुकडीत केवळ स्वदेशी श्वान होते. 'विविधतेत एकता' या थीमचे प्रतिबिंबित करण्यासाठी डिझाइन केलेले दहा आकर्षक
चित्रफित देखील विविध राज्ये आणि एनएसजी, एनडीआरएफकडून प्रदर्शित केली.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची
आज शतकोत्तर सुवर्ण जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सरदार पटेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि ते
देशाचे पहिले उपपंतप्रधान देखील होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील
पटेल चौकात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. सरदार पटेल
हे महान देशभक्त, दूरदृष्टी असलेले नेते
आणि राष्ट्रनिर्माते होते, असं राष्ट्रपती मुर्मू
यांनी म्हटलं आहे. आपला दृढ निर्धार, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वाच्या
जोरावर त्यांनी राष्ट्राला एका सूत्रात बांधण्याचे ऐतिहासिक कार्य केले. सरदार पटेल
यांचं समर्पण आणि राष्ट्रसेवेची भावना सर्व भारतीयांना सतत प्रेरणा देत असते.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहीली. सरदार पटेल यांचा दृढ निर्धार आणि
दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश एका लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र बांधला गेला, असं राधाकृष्णन यांनी एका संदेशात
म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता
आणि उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली
वाहिली. सरदार पटेल यांनी संस्थानांचे एकत्रीकरण करून देशाची एकता आणि सुरक्षा अधिक
बळकट केली, असं शहा यांनी एका संदेशाद म्हटलं
आहे. सरदार पटेल यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, वंचित आणि दुर्बल घटकांना एकत्र आणून
देशाला स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेल्याचं शहा यांनी सांगितलं. सरदार
पटेलांनी न्याय आणि एकतेच्या तत्त्वांवर आधारित उभं केलेल्या राष्ट्राचे संरक्षण करणे
हे प्रत्येक देशभक्ताचं कर्तव्य आहे, असे शहा म्हणाले.
****
स्वातंत्र्यलढा आणि अखंड भारताच्या
निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या दृढनिश्चय व समर्पणाचे
स्मरण करून आपण सर्वांनी देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहावं, असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री
अतुल सावे यांनी केले आहे. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र
सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित एकता पदयात्रेचा समारोप
छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज येथील उद्यानातील पुतळ्याजवळ झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी
उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता आणि स्वदेशी वस्तू वापराची शपथ देण्यात आली.
****
विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील केंद्रीय
सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनेच्या १४६६ कर्मचाऱ्यांना वर्ष २०२५ साठी
केंद्रीय गृहमंत्र्यांचं दक्षता पदक प्रदान करण्यात आलं. विशेष मोहिमा, तपास, गुप्तचर कार्य आणि न्याय वैज्ञानिक विज्ञान क्षेत्रांतील
उत्कृष्ट कार्याची दखल घेत हे पदक देण्यात येतं. हा सन्मान प्रत्येक वर्षी ३१ ऑक्टोबर
रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केला जातो.
****
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी देशभरातील ७६ प्रमुख रेल्वे स्थानकांवर आधुनिक प्रवासी होल्डिंग क्षेत्रे
उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत राज्यातल्या आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा
समावेश आहे. या होल्डिंग क्षेत्रांची बांधणी २०२६ च्या सणासुदीपूर्वी पूर्ण करण्याचे
निर्देश त्यांनी दिले असून, ही सर्व केंद्रे स्थानिक
हवामान, प्रवासी गरजा आणि परिसराच्या परिस्थितीनुसार
मॉड्युलर डिझाईनमध्ये केली आहेत.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त
देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
·
शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची
घोषणा
·
शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं-केंद्रीय
कृषीमंत्र्यांचं आवाहन
·
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयकडून कापूस किसान मोबाईल
ॲप विकसित
·
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची
नोंद, आजही मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता
आणि
·
महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा
अंतिम फेरीत प्रवेश
****
देशाचे
पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आज साजरी
होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनाविषयी
अधिक माहिती देणारा हा वृत्तांत…
‘‘स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबादसह देशभरातल्या सुमारे सहाशे संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार
पटेल हे
भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून
ओळखले जातात. त्यांची जयंती
दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचं औचित्य साधून यंदा देशभरात विविध कार्यक्रम होणार
आहेत. गुजरातमधे केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या
स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत
एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलं
आहे. या संचलनात विविध राज्यांची पोलिस दलं तसंच चित्ररथ सहभागी असतील. एकतेचा धागा या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथही यात सहभागी होत आहे. या महोत्सवात येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला सांस्कृतिक
कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं १५ ते २० कलाकारांचं सादरीकरण
होणार आहे.
राज्यात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात पदयात्रा, निबंध वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या
जीवनकार्याची ओळख करुन दिली जाईल या उपक्रमात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्यशासनानं केलं आहे.’’
दरम्यान, पंतप्रधान
काल गुजरात दौऱ्यावर दाखल झाले. त्यांच्या हस्ते काल सुमारे एक हजार १४० कोटी रुपयांच्या
विकास योजनांचा प्रारंभ तसंच पायाभरणी करण्यात आली. एकता नगर परिसरात पर्यटकांच्या
सोयीसाठी २५ इलेक्ट्रिक बसचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या परिसरात
ई बसची संख्या आता ५५ झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सरदार पटेल यांच्यावरील विशेष
टपाल तिकीट आणि दीडशे रुपयांचं नाण्याचंही काल प्रकाशन करण्यात आलं.
पटेल यांच्या
जयंतीनिमित्त आज सर्वत्र पदयात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं
सकाळी साडे सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून पदयात्रा सुरु होणार आहे.
****
शेतकऱ्यांनी
फक्त शेती न करता उत्पादक व्हावं, असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग
चौहान यांनी केलं आहे. नवी दिल्लीत कृषी उत्पादक संघटनांच्या संमेलनात काल ते बोलत
होते. आतापर्यंत कृषी उत्पादक संघटनामधे ५२ लाख शेतकरी सदस्य आहेत, आता एका वर्षात २ कोटी शेतकरी सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे,
असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान
****
राज्यातील
शेतकऱ्यांसाठी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार, अशी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रात्री मुंबई इथं सह्याद्री अतिथीगृहात
शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या बैठकीनंतर फडणवीस बोलत होते. सध्या
शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य
असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या
आठवड्याअखेर १८ हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या
खात्यात थेट रक्कम दिली जाईल, असे निर्देश दिल्याचं फडणवीस यांनी
सांगितलं.
****
दरम्यान, सरकारनं ई-पीक
पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं
परिपत्रक महसूल विभागाकडून काल जारी करण्यात आलं.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या
खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. बृहन्मुंबई
महापालिकेसह राज्यातल्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत,
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या
निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चमर्यादा निर्धारित करून दिल्या आहेत.
****
निवडणूकीसंदर्भात
नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच
राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. दररोज सकाळी ८ ते रात्री
८ वाजेपर्यंत १८००-११-१९५० या टोल-फ्री क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारींचं निरसन केलं
जाणार आहे.
****
कापूस उत्पादक
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कापूस महामंडळ- सीसीआयनं कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू
केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाव नोंदणी, वेळ निर्धारण
प्रक्रियेसाठी मदत होणार आहे. हे ॲप कापूस हंगामात २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस
उपलब्ध राहणार आहे. या प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कापस
किसान ऑफसियल या युट्युब संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कापूस महामंडळानं केलं आहे.
राज्यात अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी वेळ निश्चिती दररोज सकाळी १० वाजता
सुरू होईल, अशी माहिती पणन महासंघाच्या वतीनं दिली आहे.
****
शालेय पोषण
आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या
मानधनामध्ये वाढ व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात
येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत भुसे बोलत होते. शालेय पोषण आहार कामगारांना सध्या
अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं.
****
राज्य शासनाने
पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने पशुपालन व्यवसायाला
चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल, असा विश्वास,
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे. वीजदरात सवलतीचा लाभ
देण्याची कार्यपद्धती निश्चित केली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.
****
अवकाळी
पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत, यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ
आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत
गोऱ्हे बोलत होत्या. शासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं गोऱ्हे यांनी
नमूद केलं.
****
लातूर जिल्ह्यातील
रेणापूर इथं रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोलंगे यांनी
अतिवृष्टीने खराब झालेलं सोयाबीन रेणापूर तहसील कार्यालयात जाळत सरकारचा निषेध केला.
अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे
आले नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला.
****
सरकारनं
राज्याला थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार केला असून, त्यादृष्टीने
आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं, सार्वजनिक आरोग्य तसंच कुटुंबकल्याण
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. “एक पाऊल थॅलेसेमीया मुक्तीकडे”
या अभियानात त्या काल बोलत होत्या. या आजाराच्या रुग्णांसाठी परभणी जिल्ह्यात दहा खाटांचा
स्वतंत्र रुग्ण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं, बोर्डीकर
यांनी सांगितलं. परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित या अभियानाचा आज समारोप
होत आहे.
****
क्रिकेट
महिला एकदिवसीय
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. काल मुंबईत
झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच खेळाडू राखून पराभव केला. ३३९
धावांचं आव्हान भारतानं केवळ पाच खेळाडू गमावत पूर्ण केलं. जेमिमा रोड्रिग्सने १३४
चेंडूंमध्ये नाबाद १२७ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूंमध्ये
८९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तत्पुर्वी, ऑस्ट्रेलिया संघानं
४९.५ षटकांत ३३८ धावा केल्या होत्या. स्पर्धेत रविवारी नवी मुंबई इथल्या डी वाय पाटील
स्टेडिअमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान अंतिम सामना होणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक १०३ पूर्णांक ७५
मिलिमीटर पाऊस हा हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव महसूल मंडळात झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
एक हजार २२० पूर्णांक ३० मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण १३७ पूर्णांक
३० टक्के पाऊस झाला आहे.
****
हवामान
राज्यात
आज विदर्भ आणि खानदेशातल्या काही जिल्ह्यांसह, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात
जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 January 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...