Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
January 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनीही
स्वत: अद्ययावत राहण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात
झालेल्या अठराव्या रोजगार मेळाव्यात ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित
करत होते. शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नागरिक देवो भव हा मंत्र लक्षात ठेवून
कार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशात उद्योग क्षेत्रात मोठी वाढ होत असून, रोजगाराच्या
संधी वाढत आहेत, देशवासियांच्या क्रयशक्तीतही मोठी वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
ते म्हणाले…
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
रोजगार मेळाव्यात अंतर्गत
नागपुरात हिंगणा इथं केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफचे नागपूरचे उपमहानिरिक्षक
अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण करण्यात आलं. निवड झालेले हे नवनियुक्त
कर्मचारी सीआरपीएफ, एमएसीएल तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागात कार्यभार
स्वीकारतील.
****
एनसीसी कॅडेट्स हे देशाच्या
संरक्षण विभागातली दुसरी फळी असल्याचं, संरक्षणमंत्री राजनाथसिंह
यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात कॅडेट्सना मार्गदर्शन
करत होते. राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसी हा स्वत:ची श्रेणीवर्धन करणारी कार्यशाळा असून
एनसीसी कॅडेट्स हे देशाचं प्रतिबिंब असल्याचं संरक्षणमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट – संरक्षणमंत्री राजनाथसिंह
एनसीसी कॅडेट्सच्या वतीनं
यावेळी संरक्षणमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आलं.
****
भारताच्या क्षमता, बुद्धिमत्ता
आणि धोरणातील सातत्यामुळे जागतिक स्तरावरील उत्पादक भारताकडे आकर्षित होत असल्याचं
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नेदरलँड इथं
अॅडव्हान्स सेमिकंडक्टर मटेरियल्स लिथोग्राफीच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत
होते. लिथोग्राफीसंदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणून घेणं आणि गुजरातच्या धोलेरे
इथल्या सेमिकंडक्टर सुविधेत त्याचा उपयोग करणं, हा या भेटीचा उद्देश असल्याचं
वैष्णव यांनी सांगितलं.
****
नांदेडमध्ये हिंद-दी-चादर
श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या हौतात्म्य सत्संग सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. दोन दिवस चालाणाऱ्या कार्यक्रमाची
सुरुवात आज सकाळी आठ वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने झाली. नगर कीर्तन जात
असलेल्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी तसंच फुलांची सजावट केली होती. देश-विदेशातून
शेकडो भाविक या ऐतिहासिक समारंभात सहभागी झाले आहेत, सर्वांसाठी मोफत वाहनसेवा
आणि भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. या समारंभात गुरु तेग बहादुर साहिबजींच्या
बलिदानाचा वारसा जपला जात आहे.
****
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या
लाभार्थ्यांसाठी ११८ ही मदतवाहिनी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण
मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून ही माहिती दिली. केवायसी प्रक्रिया
करतांना चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी काही लाभर्थ्यांकडून
प्राप्त झाल्या होत्या, या तक्रारीसह योजनेसंदर्भातील अन्य तक्रारींच्या निवारणासाठी
ही मदत वाहिनी सुरु करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं आहे.
****
प्रजासत्ताक दिनाला लातूरच्या
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे. २७
तारखेला तो नियमित सुरु होईल असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन जाधव यांनी
सांगितलं.
दरम्यान, प्रजासत्ताक
दिनानिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर सुमारे
५ हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित कवायत संचलन सादर केले जाणार आहे. जिल्ह्यातील इतर
नऊ तालुक्यांमध्ये देखील ध्वजवंदनानंतर स्वतंत्रपणे कवायत आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची
बैठक घेऊन प्रजासत्तक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आवश्यक मार्गदर्शन केले.
****
चंद्रपूर महापालिकेत गटनेता
पदासंदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महापौर खासदार प्रतिभा धानोरकर
आणि स्टँडिग कमिटी बाबत विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार निर्णय घेणार आहेत. आज काँग्रेसच्या
पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
No comments:
Post a Comment