Saturday, 24 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 January 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

देशभरात आज अठराव्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ४५ ठिकाणी होणाऱ्या या मेळाव्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ६१ हजाराहून अधिक तरुणांना विविध शासकीय विभागातल्या पदांची नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात येणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशेतिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम काल नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झाली. परवा होणाऱ्या या पथसंचलनात ऑपरेशन सिंदूरमध्ये देशानं मिळवलेला विजय आणि तीनही दलांचा समन्वय यांचं दर्शन घडवणारा लष्कराचा चित्ररथ पाहायला मिळेल, असं दिल्ली उपविभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नवराज धिल्लों यांनी सांगितलं. रणगाडे, क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन यांच्या सहाय्यानं प्रथमच युद्धभूमीवरील रचना सादर केली जाणार आहे. सुमारे ६ हजार ५० सैनिक यात सहभागी होणार असून लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार चौथ्यांदा नेतृत्व करणार आहेत. पहिल्यांदाच भैरव बटालियन, शक्तिवान रेजिमेंट आणि लडाख स्काऊट संचलनात भाग घेणार आहेत.

****

आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. समाजात खोलवर रुजलेली लैंगिक विषमता दूर करून मुलींच्या समान हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं २००८ पासून  महिला आणि बाल विकास मंत्रालयानं हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. “उज्ज्वल भविष्याकरिता बालिकांचे सबलीकरण” ही राष्ट्रीय बालिका दिनाची यंदाची संकल्पना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उद्या २५ तारखेला पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल मंत्रालयात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदार जागृतीची शपथ दिली. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिव इथं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसंच लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मतदार जागृतीची शपथ घेतली. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या मंगळवारी २७ तारखेला मतदार दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे.

****

हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त नांदेडमधल्या तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबजी इथं आज सकाळी श्री सचखंड गुरुद्वारा इथून भव्य नगर कीर्तन काढण्यात आलं. या नगर कीर्तनात पंचप्यारे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. दरम्यान, जळगांव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जवळपास २ हजाराच्यावर भाविक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

****

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप यांच्यात झालेल्या हाणामारी प्रकरणी महाड न्यायालयाने दोघांनाही काल दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोघांच्या गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासून ते फरार होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाचे नाव बदलून अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यात आलं आहे. विमानतळावर कालपासून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे अशी पाटी लावण्यात आली आहे.

****

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथे येत्या २७ आणि २८ जानेवारीला राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात होणाऱ्या या परिषदेचं बीजभाषण सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर नीरज हातेकर करणार आहेत.

****

नंदुरबार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण पाडवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडलं. एका तलाव संस्थेसोबतच्या करारासाठी पाडवी यांनी तक्रारदाराकडे  २ लाख ६५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ६५ हजार रुपये घेतांना त्यांना पकडण्यात आलं.

****

झिम्बॉब्वे इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुपारी एक वाजता सामन्याला सुरवात होईल.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...