Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30
January 2026
Time 11.00
to 11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
आज शहीद दिन. राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या 78 व्या पुण्यतिथीनिमित्त
देशभरात त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीतील राजघाट इथं गांधीजींच्या
समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 30 जानेवारीला महात्मा
गांधी यांचे जीवनकार्य आणि विचार यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले जाते. देशाचे
स्वातंत्र्य आणि एकतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीदांना आदरांजली
वाहण्यासाठी हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा मुख्य आधार असलेल्या स्वदेशीच्या विचारावर गांधीजींनी नेहमीच भर दिल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व
आणि त्यांचे कार्य देशवासीयांना सदैव कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत
राहील, असं पंतप्रधान म्हणाले.
****
लातूर महानगरपालिकेच्या नवीन महापौराची
निवड ९ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
लातूरचं महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रक्रियेसाठी पीठासन
अधिकारी म्हणून लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे राहणार आहेत. लातूर महानगरपालिका निवडणुकीत ७० पैकी
४३ जागा जिंकून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून काँग्रेसकडून महापौर पदासाठी तीन
नावांची चर्चा आहे. यात कांचन अजनीकर, जयश्री सोनकांबळे आणि
मनीषा बसपुरे यांचा समावेश आहे. दरम्यान काँग्रेसच्या गटनेतेपदी विजयकुमार साबदे यांची
काँग्रेस पक्षाने निवड केली आहे. २२ जागा मिळवलेल्या भाजपकडून अद्याप गटनेता जाहीर
झालेला नाही.
****
नांदेड जिल्ह्यातील शिराढोण इथल्या
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि दोन सहशिक्षकांना बाराशे रुपयांच्या लाच
प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहरातल्या उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. बदली झाल्यानंतर एका शिक्षक दाम्पत्याला आयकर परतावा भरण्यासाठी
आवश्यक असलेलं पगार विवरणपत्र देण्यासाठी या तिघांनी ही लाच मागितली होती.
****
भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग
जिल्हा समितीनं पक्ष विरोधी कारवायांमुळं २३ पदाधिकारी आणिच कार्यकर्त्यांना पक्षातून
निलंबित केल आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षविरोधी कारवायामुळं
सहा वर्षांसाठी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
****
चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चंद्रपूर
परिक्षेत्रात येत असलेल्या लोहारा इथे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते
लोहारा जंगल सफारी गेटचं काल उद्घाटन करण्यात
आलं. वन-वन्यजीव व्यवस्थापन करणं, मानव आणि वन्यजीव यांच्यात सहजीवन
प्रस्थापित करणं, वनांचं शाश्वत जतन करून लोकांचं वनावरील अवलंबन कमी करणं
तसंच वनांच्या माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध देणं या उद्देशाने सुरु करण्यात
आलेल्या या जंगल सफारीसाठी, ३५ किलोमीटर चा परिसर
पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या क्षेत्रात एकूण १५ कृत्रिम पाणवठे आणि नैसर्गिक लोहारा तलावाचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment