Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०
****
· राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार
यांच्याकडून शपथग्रहण
· आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार
· देशामध्ये आणखी दोन नव्या पाणथळ जागांना ‘रामसर
’स्थळांचा दर्जा
आणि
· भारत-न्यूझीलंड टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज अखेरचा सामना
****
राज्याच्या, पहिल्या महिला
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज शपथ घेतली. मुंबईत लोकभवनात
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
बाईट – उपमुख्यमंत्री
सुनेत्रा अजित पवार
लोकभवनात अत्यंत साधेपणानं पार पडलेल्या या शपथग्रहण
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा
पवार,
जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत
अजितदादा पवार यांची स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास
पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे.
दरम्यान, या शपथविधीपूर्वी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक झाली. अजित पवार
यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या विधीमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार
यांची निवड एकमताने झाली. दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा
प्रस्ताव मांडला तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलं. या बैठकीनंतर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आणि पक्षाने केलेल्या
ठरावाची माहिती दिली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू
झाल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांना
उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घाईगडबडीने होत असल्याची प्रतिक्रिया, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते बारामती इथं
वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची
आज बारामती इथं बैठक होत आहे.
****
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असलेल्या
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात तेर
इथं झाला. छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी
पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ रश्मी बोरीकर
यांनी,
सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
झाल्याबद्दल अभिमान व्यक्त करत, या पदावर कार्य करून
सुनेत्रा पवार,
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर छाप पाडतील असा विश्वास
व्यक्त केला. त्या म्हणाल्या…
बाईट – सरस्वती
भुवन शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ रश्मी बोरीकर
दरम्यान, सरस्वती भुवन शिक्षण
संस्थेतर्फे आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक तसंच कर्मचारी
वृंदाने अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
****
भारतीय पोलीस सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारची
दोन वर्ष सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आणि उपमहानिरीक्षक पदासाठी
२०११ च्या तुकडीपासून अर्हताप्राप्त अधिकाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे
****
आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत
सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग नवव्यांदा हा अर्थसंकल्प
सादर करतील. यावेळी देशभरातल्या विविध महाविद्यालयांच्या तीस विद्यार्थ्यांना
लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेत बसून ही प्रक्रिया पाहता येणार आहे. त्यानंतर हे
विद्यार्थी अर्थ मंत्रालयाला भेट देऊन, मंत्रालयातल्या
कामकाजाची प्रक्रिया जाणून घेणार आहेत.
****
देशामध्ये आणखी दोन नव्या पाणथळ जागांना ‘रामसर ’स्थळांचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही
घोषणा केली. उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातलं ‘पाटणा
पक्षी अभयारण्य’
आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ‘छारी-धांड’ ही ठिकाणं रामसर क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. २०१४ मध्ये अशा पाणथळ जागा
फक्त २६ होत्या,
ही संख्या आता ९८ पर्यंत पोहोचल्याचं यादव यांनी सांगितलं
आहे.
****
संत निवृत्तीनाथ महाराजांनी अध्यात्म हे फक्त ग्रंथांपुरतं
मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवलं, असं
प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलं
आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी
परिसरातील प्रशासकीय इमारत आणि दर्शनबारी मंडप लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र पुरस्कृत प्रसाद योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांमध्ये येणाऱ्या भाविक आणि
पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन त्या ठिकाणांचा शाश्वत विकास करण्यात येत
असल्याचं शेखावत यांनी सांगितलं.
****
देशभरात २५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य
कार्डांचं वाटप करण्यात आलं आहे. कृषी मंत्रालयाकडून आज ही माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षी जुलैपर्यंत, या योजनेअंतर्गत ९३
हजारांहून अधिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, ६
लाखांहून अधिक थेट प्रात्यक्षिकं आणि हजारो जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. मृदा
आरोग्य कार्ड दर दोन वर्षांनी जारी केली जातात. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या
मातीतली पोषक तत्वांची स्थिती आणि भौतिक-रासायनिक परिस्थितीची व्यापक माहिती दिली
जाते.
****
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी
प्रत्येकी सहा असे १२ अर्ज भाजपनं भरले आहेत. शिवसेनेकडूनही दोन्ही पदांसाठी
प्रत्येकी दोन असे चार अर्ज आले आहेत. जळगाव महापालिकेची विशेष महासभा ६
फेब्रुवारीला होत आहे.
**
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी
नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका
निवडणुकीत सोलापुरात भाजपाला ८७ जागा मिळाल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण
कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम निवासी
स्वरुपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने इच्छुक स्वयंसेवकांच्या तुकड्या १२ फेब्रुवारी रोजी रायगड
जिल्ह्यात कोलाड इथं पाठवण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी
कार्यालयात १० फेब्रुवारी पर्यंत जमा करावे, असं
आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं
आहे.
****
सोलापूर विद्यापीठातर्फे येत्या ३ ते ९ फेब्रुवारीदरम्यान
राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार
आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या स्पर्धेचं
आयोजन करण्यात येत असल्याचं, विद्यापीठाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट
मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार आहे. सायंकाळी ७ वाजता
सामना सुरु होणार आहे. भारताने या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****
No comments:
Post a Comment