Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०
****
· दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे
· राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक; विधीमंडळ नेतेपदाची निवड होण्याची शक्यता
· राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन
· १५व्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्राला ७१४ कोटी ३२ लाख
रुपये मंजूर
आणि
· अनेक महानगरपालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीला वेग; अकोला इथं भाजपाचा तर ठाण्यात शिवसेनेचा महापौर
****
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास
महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. विभागानं या
माहितीला दुजोरा दिला. परवा बुधवारी बारामती विमानतळावर उतरत असताना या विमानाचा अपघात
होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी वेगाने करण्यासाठी
सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. विमान अपघात अन्वेषण ब्यूरो तर्फे सुरु असलेल्या चौकशीत
अपघातस्थळी आवश्यक सहकार्य करावं असं त्यांनी फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं
आहे.
****
दरम्यान, विधानभवनात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
अजित पावर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे
यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी
ही भेट घेण्यात आली. अजित पवार यांच्याकडील अर्थ आणि नियोजन, उत्पादन शुल्क आणि क्रीडा
ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावीत, असा
प्रस्ताव या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ
पक्षाची उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना
ही माहिती दिली. विधिमंडळ नेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी, अशी अनेकांची भावना असून ही मागणी रास्त असल्याचंही भुजबळ यावेळी म्हणाले. उद्याच्या
बैठकीत विधिमंडळ पक्ष नेता निवडीचा निर्णय झाल्यास तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही
त्यांनी वर्तवली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त
आज संपूर्ण देशभर अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मान्यवरांनीही गांधीजींना अभिवादन
केलं. राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थनेचे कार्यक्रम होत आहेत.
देशाचं स्वातंत्र्य आणि एकतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक
आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या कार्याचं महत्त्व
अधोरेखित केलं. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मूलभूत स्तंभ स्वदेशी आहे
आणि गांधीजींनी यावर नेहमीच भर दिला, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. गांधीजींचं कार्य आणि विचार देशवासियांनी सदैव कर्तव्याच्या पथावर
वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात, त्यांनी मानवतेच्या रक्षणासाठी
अहिंसेवर भर दिला आणि कोणत्याही हत्यारांशिवाय जगात बदल घडवण्याची ताकद अहिंसेत आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
भाषा, क्षेत्र, जात यामध्ये विभागलेल्या देशाला एक करणं, स्वातंत्र्य
चळवळीला व्यापकता देणं, स्वदेशी आणि स्वच्छतेला एकत्र
गुंफून गौरवशाली भारताची संकल्पना तयार करणं हे गांधीजींच्या विचारांचं मूळ असून, हे विचार आपल्याला सदैव प्रेरित करत राहतील, असं
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं.
मुंबईत विधानभवन इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात
आली.
****
छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात आज चार नक्षलवाद्यांनी शरणागती
पत्करली. त्यात दोन महिलांचा समावेश असून त्या चौघांवर मिळून आठ लाख रुपयांचं बक्षीस
होतं. बस्तरचे पोलीस महानिरिक्षक सुंदरराज पी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण
यांच्यासमोर या चौघांनी शस्त्रं टाकली. हे सर्वजण गोलापल्ली, कोंटा आणि किस्ताराम परिसरात सक्रीय होते.
****
केंद्र सरकारने राज्यातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था
आणि पंचायतराज संस्थांसाठी २०२५–२६ या आर्थिक वर्षाकरिता १५व्या वित्त आयोगाच्या अनिर्बंध
अनुदानाचा दुसरा हप्ता जारी केला आहे. तळागाळातलं प्रशासन अधिक मजबूत करत स्थानिक विकासाच्या
गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्याअंतर्गत
महाराष्ट्राला ७१४ कोटी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचा लाभ राज्यातल्या
२६ हजार ४०७ पात्र ग्रामपंचायती, १५ पात्र पंचायत समित्या आणि
दोन जिल्हा परिषदांना मिळणार आहे.
****
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महापौरपदाच्या
निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अकोला महानगरपालिकेत महापौरपदाची निवडणूक आज
झाली. भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने संख्याबळ सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर दोन्ही
पदं मिळवली आहेत. भाजपाच्या शारदा खेडकर ४५ मतं मिळवून महापौर बनल्या. उपमहपौरपदी आघाडीचे
उमेदवार अमोल घोगे निवडून आले. एमआयएमचे नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले आणि अपक्ष
उमेदवाराने शहर सुधार आघाडीला पाठिंबा दिला.
नवी मुंबई महापालिका महापौर पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक
होणार आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी
विशेष महासभा होणार आहे. यंदा महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी
आरक्षित आहे.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौरपदासाठी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर भाजपाचे कृष्णा पाटील
यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज आला
नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. याची औपचारिक घोषणा येत्या तीन फेब्रुवारीला
होईल.
लातूर शहर महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी विधिज्ञ दीपक
मठपती यांची निवड झाली आहे. आज या निवडीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
****
पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शेतीतून मिळणारं उत्पन्न वाढवण्याच्या
उपक्रमांना राज्यशासन प्रोत्साहन देत आहे. याच अनुषंगाने शाश्वत उत्पादन देणारा फळबागेचा
पथदर्शी प्रकल्प बीड जिल्ह्यात ३५० एकर क्षेत्रावर येत्या काळात साकारणार आहे. हरित
वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना बळकटी देण्यासोबतच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हर्बालाईफ
कंपनीने सामाजिक बांधिलकी उत्तरदायित्व अंतर्गत पुढाकार घेतला असून, याला फामर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला. याअंतर्गत जिल्ह्यात
पडीक जमीन विकास तसंच वृक्ष लागवड आणि संवर्धन यासाठी ३५० एकर वर फळबाग आणि देशी वृक्ष
लागवड करण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये निधी देण्यात येणार असून, हर्बालाइफ आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात
सहकार्य करार झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मतदानासंदर्भातल्या अडचणी आणि तक्रारींचं तत्काळ
निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मतदार मदत आणि तक्रार निवारण कक्ष
स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी ०२४० - २३३१०७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून
देण्यात आला आहे. मतदान यादी, नाव नोंदणी, दुरुस्ती,
स्थलांतर तसंच मतदान प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण असल्यास मतदारांनी
या कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
****
मैत्री कट्टा कवीमनाचा साहित्य समूह आयोजित चौथ्या राज्यस्तरीय
एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री तथा शिक्षिका आशा डांगे
यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एक फेब्रुवारीला हे संमेलन होणार
आहे. या संमेलनात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळा आणि कविसंमेलन
आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही गाडी उद्या धर्माबाद
ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. उद्या ही गाडी नांदेड ते मनमाड दरम्यान
धावेल,
अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
दिली.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना उद्या खेळवला जाणार आहे. तिरूवनंतपुरम इथं संध्याकाळी
सात वाजता हा सामना होणार आहे. या मालिकेत भारताची तीन – एक अशी विजयी आघाडी आहे.
****
No comments:
Post a Comment