Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 January
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचं विमान अपघातात निधन,
आज बारामती इथं अंत्यसंस्कार
·
अजित पवार यांच्या निधनानं
राज्यावर शोककळा,
बहुतांश जिल्ह्यांमध्ये बंद पाळून वाहिली श्रद्धांजली
·
संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनला सुरुवात
आणि
·
अजिंठा-वेरुळ चित्रपट
महोत्सवाला प्रारंभ,
ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांचा पद्मपाणि पुरस्काराने गौरव
****
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं. ते
६६ वर्षांचे होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या
प्रचारसभांसाठी त्यांचं विशेष विमान बारामतीला उतरत असताना अपघातग्रस्त झालं आणि
विमानातल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे
सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, शांभवी
पाठक आणि विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा समावेश आहे.
मुंबईहून सकाळी आठ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या विमानानं
उड्डाण केलं. बारामती विमानतळावर उतरण्याआधी दृश्यमानता कमी असल्याची तक्रार
वैमानिकानं केली होती. त्यानंतर पावणे ९ ला विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली, पण
उतरल्यावर लगेच विमानानं पेट घेतला. घटनास्थळाची पाहणी सुरू असून, विमानाचा
ब्लॅक बॉक्स,
वैमानिकाचं संभाषण याची पडताळणी केल्यावर अपघाताचं कारण कळू
शकेल, असं पोलिसांनी सांगितलं. विमान अपघात चौकशी ब्युरोच्या पथकानं घटनास्थळाची
पाहणी केली असून चौकशी सुरू आहे.
****
अजित पवार यांच्या कारकिर्दिचा आढावा घेणारा हा संक्षिप्त
वृत्तांत.
आपल्या कार्यकर्त्यांसोबतच संपूर्ण राज्यभरात ‘दादा’ या
आत्मीय संबोधनाने लोकप्रिय असलेले अजित आशा अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९
रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं झाला. कार्यतत्पर आणि अभ्यासू नेते असलेल्या अजित दादांनी आपले
काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनात राजकारणात
प्रवेश केला,
आणि राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ भुषवण्याचा
विक्रम करत अर्थमंत्री म्हणूनही आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली. १९८२ मध्ये ते
सर्वप्रथम साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. १९९१ मध्ये दहाव्या
लोकसभेत बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पण काही
काळातच खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याच्या राजकारणात रमले. बारामती विधानसभा
मतदारसंघातून ते दरवेळी मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत निवडून गेले. विलासराव
देशमुख,
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे,
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या
काळात त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. अजित पवारांनी तब्बल ११ वेळा
राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यासोबतच जलसंपदा, ऊर्जा,
ग्रामविकास यासारख्या खात्यांचा कारभारही त्यांनी समर्थपणे सांभाळला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं
अध्यक्षपद १६ वर्ष सांभाळलेल्या अजित दादांनी राज्य ऑलिम्पिक संघटना तसंच राज्य
खोखो संघटनेचं अध्यक्षपदही दीर्घकाळ सांभाळलं. याशिवाय विविध
साखर कारखाने, सहकारी संस्थांशी त्यांचा
निकटचा संबंध होता.
उमद्या स्वभावाचे हजरजबाबी आणि स्पष्टवक्ते अजित दादा, राज्याच्या राजकारणात कायमच केंद्रीय वर्तुळात राहिले. राजकारणातल्या प्रदीर्घ
कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, आक्षेपार्ह विधानांमुळे टीकाही झाली. पण त्यांच्या राजकीय वाटचालीवर याचा
फारसा परिणाम दिसून आला नाही. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात अजित दादांनी
राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला गट, वेगळा केला. न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित दादांच्या गटाला दिलं, मात्र या प्रकरणी अंतिम निकालापूर्वीच अजित दादांचा अपघाती मृत्यू झाला.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अजित पवार यांनी उमटवलेला ठसा आणि कामाच्या धडाडीचा
घालून दिलेला आदर्श,
सर्वसामान्य नागरिकांच्या सदैव स्मरणात राहील.
****
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
बारामती इथं त्यांचे शोकाकुल कार्यकर्ते आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.
राज्यात उद्यापर्यंत शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या पार्थिव देहावर आज बारामती मधल्या विद्या
प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह काटेवाडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला
आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बारामती इथं जाऊन अजित
पवार यांचं अंत्यदर्शन घेतलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजित पवार आणि इतर चार
जणांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातल्या
कार्याबद्दल पवार यांचं नेहमी स्मरण ठेवलं जाईल, असं त्यांनी आपल्या
शोकसंदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार यांच्या निधनाबद्दल
शोक व्यक्त करत,
अजित पवार यांचं प्रशासकीय कौशल्य अद्भुत होतं आणि
महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात ते अग्रणी होते, असं
म्हटलं आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह,
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री
पियुष गोयल,
अश्विनी वैष्णव, काँग्रेसचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे,
काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे,
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह राजकीय
क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या आकस्मिक अकाली निधनाबद्दल धक्का
आणि शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी
अजित पवार यांच्या निधनावर शोक भावना व्यक्त केल्या.
बाईट – शोक भावना
**
दरम्यान, याप्रकरणावरुन राजकारण न करण्याचं आवाहन
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे, असं
त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. एका कर्तृत्त्ववान आणि निर्णयक्षम
व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. झालेलं नुकसान भरुन निघणारं नाही, अशी
प्रतिक्रिया त्यांनी दिली.
****
अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर राज्यात काल
अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात बीड शहरासह
अनेक ठिकाणच्या बाजारपेठा काल बंद होत्या. तर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद
ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघानं घेतला आहे.
****
संसदेच्या अर्थसंकलपीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी विकसित भारताचं
उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज असल्याचं सांगितलं. संसदेतल्या सर्व
सदस्यांनी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी राष्ट्रपतींनी, सरकारच्या गेल्या
वर्षभरातल्या कार्याचा आढावा घेताना, कृषी उत्पादनात झालेली मोठी
वाढ, नवीन कामगार कायदे,
नौकानयन क्षेत्रातल्या जुन्या कायद्यांमधले बदल, नक्षलवाद
उच्चाटनातली प्रगती,
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ३५ लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती, इत्यादी
ठळक मुद्द्यांचा उल्लेख केला. याशिवाय, भगवान गौतम बुद्ध यांचे
अवशेष परत आणण्यात सरकारला मिळालेलं यश, सोमनाथ स्वाभिमान पर्व, प्राचीन
हस्तलिखितांचं डिजीटलीकरण,
दिवाळीच्या सणाला युनेस्कोने दिलेला जागतिक वारशाचा दर्जा, इत्यादी
मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीयांचं शौर्य आणि
शक्तीचा सुजाण वापर जगाने पाहिला असं राष्ट्रपती म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२५ – २६ सादर करणार आहेत. तर वर्ष २०२६–२७ चा
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या रविवारी एक फेब्रुवारीला सादर होईल.
****
मातृभूमी प्रति श्रद्धा आणि कर्मभूमी प्रति समर्पण, ही
भारतीय तरुणांची ओळख असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
दिल्लीच्या करिअप्पा कवायत मैदानावर एनसीसी शिबीराच्या पंतप्रधान रॅलीत ते काल
बोलत होते. कौशल्य आणि संस्कार या गुणांमुळे संपूर्ण जग आज भारतीय तरुणांकडे
विश्वासाने पाहत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल साधेपणानं करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या निधनामुळे या कार्यक्रमात नियोजित असलेले सर्व सत्कार रद्द करण्यात आले
होते. यावेळी केवळ पद्मपाणि पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार
पद्मविभूषण इलायराजा यांना प्रदान करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात सुरू असलेल्या ३१ व्या
जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या निधनाचं वृत्त कळताच संमेलनातले कालचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
करण्यात आले. या संमेलनात शेवटच्या दिवशी पाच ठराव संमत करण्यात आले.
****
विशाखापट्टणम इथं झालेल्या चौथ्या टी – ट्वेंटी क्रिकेट
सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत
न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित षटकात २१५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला
भारतीय संघ १८ षटकं आणि चार चेंडुत १६५ धावाच करु शकला.
****
No comments:
Post a Comment