Friday, 30 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.01.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 January 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि शहीद दिनानिमित्त आज संपूर्ण देश त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. यानिमित्त नवी दिल्लीतील राजघाट इथं गांधीजींच्या समाधीस्थळावर सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाट इथल्या समाधीस्थळावर महात्मा गांधींना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांधी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. दरवर्षी ३० जानेवारीला महात्मा गांधी यांचे जीवनकार्य आणि विचार यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केलं जातं. देशाचे स्वातंत्र्य आणि एकतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, आज हुतात्मा दिनानिमित्त ठिकठिकाणी सकाळी ११ वाजता मौन पाळून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

****

२०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. देशाची वाटचाल आता प्रलंबित समस्यांच्या पलिकडे जात दीर्घकालीन उपाययोजनांच्या मार्गावर होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. जिल्हा मुख्यालयात बस्तर रेंज चे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी तसंच अन्य पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात २ महिलांचा समावेश आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी आपली हत्यारं पोलीसांकडे सोपवली. हे नक्षलवादी छत्तीसगडच्या, कोंटा आणि किस्ताराम या क्षेत्रात सक्रीय होते आणि त्यांच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

****

नवी मुंबई महापालिका महापौर पदासाठी येत्या ५  फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. नवी मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. नवी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाला ६५, शिवसेनेला ४५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १ जागा मिळाली आहे.

****

पुणे महानगरपालिकेची महापौर तसंच उपमहापौरपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी ३ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. विशेष सभेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. १६५ सदस्य संख्या असलेल्या पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ११९ नगरसेवक आहेत.

****

नांदेड महापालिकेच्या महापौर निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे या सभेचे पीठासीन अधिकारी असणार आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपनं ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

****

जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नांदेड इथल्या झेरॉक्स सेंटर चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. साहेबराव नागोराव गुंडीले असं या झेरॉक्स सेंटर चालकाचं नाव आहे. तक्रारदाराने त्यांच्या दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे फाईल दाखल केली होती. दोन प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी गुंडीले यानं केली होती.

****

ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. मनोविकास प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केली. आशयघन आणि कल्पक पुस्तकांचे प्रकाशक अशी त्यांची ओळख होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. मुंबईत कामगार चळवळीतही अनेक वर्ष त्यांनी सक्रीय भूमिका बजावली. अरविंद पाटकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रंथभेट’ योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेसाठी ग्रंथ निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यासाठी एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत 28 फेब्रुवारीपर्यंत मुंबई इथल्या ग्रंथालय संचालक कार्यालयाकडं सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळं आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात 6 टक्क्यांची घट होऊन, हा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख 59 हजार 250 रुपयांवर आला. तर, चांदीच्या दरातही 6 टक्क्यांची घसरण होऊन चांदीचा दर प्रति किलो 3 लाख 75 हजार 900 रुपयांवर आला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...