Saturday, 31 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 January 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग नवव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी देशभरातल्या विविध महाविद्यालयांच्या तीस विद्यार्थ्यांना लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेत बसून ही प्रक्रिया पाहता येणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी अर्थ मंत्रालयाला भेट देऊन, मंत्रालयातल्या कामकाजाची प्रक्रिया जाणून घेणार आहेत.

****

राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यात विधीमंडळ पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेता निवडीचा निर्णय झाला, तर तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी, अशी अनेकांची भावना असून, ही मागणी रास्त असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रिपदाविषयी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तर याबाबत पक्षाच्या सर्व आमदारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून, जनभावनेचा आदर करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तो लवकरच घेऊ, हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपद आणि विधीमंडळ नेत्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

राज्याच्या गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आय. एस. चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त होत आहे. चहल यांच्या निवृत्तीनंतर मनिषा पाटणकर-म्हैसकर हा पदभार स्वीकारतील. मनिषा म्हैसकर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव आहेत. त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

****

पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर निवडीनंतर, बिडकर सभागृहनेते होतील. काँग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक विधिज्ज्ञ रामचंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे. पुणे महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या नऊ फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी तीन फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील.

****

महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळालं असून आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगलं यश मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी काल ते बोलत होते. जनतेने मोठा विश्वास दाखवत काँग्रेसला राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवलं. नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष, १००६ नगरसेवक तर महानगरपालिकेत ३५० नगरसेवर निवडून दिले असल्याचं सपकाळ म्हणाले. तीन महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे महापौर होत असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितलं.

****

मासिक पाळी दरम्यानचे आरोग्य हा महिलांच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मासिक पाळी आरोग्य हा कलम २१ अंतर्गत सन्मानाने जगण्याच्या आणि निजतेच्या अधिकाराचा हिस्सा असल्याचे न्यायालयानं म्हटले आहे. मुलींच्या आरोग्य आणि समानतेसाठी न्यायालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि शाळांना यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार, सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थिनींना मोफत 'बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स' उपलब्ध करून देणे आता अनिवार्य असेल. तसेच, प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र आणि पुरेशी स्वच्छतागृहे असावीत, असे आदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांची प्रतिष्ठा आणि स्वच्छता जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे.

****

केंद्रीय भूजल विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माहिती भांडाराचा सुसंगत आणि व्यापक वापर करून जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक करता येईल. असं धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी म्हटलं आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण होणाऱ्या मौल्यवान माहिती भांडाराचा स्थानिक भूजल व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अधिकाधिक प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांच्या वतीनं धाराशिव इथं  आयोजित भूजल माहिती भंडार तसंच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग” या कार्यशाळेत काल ते बोलत होते. गावपातळीवरील जलसुरक्षा आराखडे, पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...