Thursday, 29 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.01.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 January 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिव देहावर आज बारामतीमध्ये, त्यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार यांच्या हस्ते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी पवार यांचं पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अन्य नेते, पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बारामतीत शरद पवार यांची भेट घेऊन, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.

पवार यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसून आलं. अजित पवार अमर रहे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं.

****

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघातस्थळावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या प्रकरणाचा तपास सखोलपणे, पारदर्शकपणे करण्याला आणि तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ सादर केलं. आर्थिक सर्वेक्षण सादर केल्यानंतर लोकसभेचं कामकाज रविवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करण्यात येणार आहे.

****

भारताची लोकशाही आणि लोकसंख्या जगासाठी आशेचा किरण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. काल संसदेच्या दोन्ही सदनांसाठी राष्ट्रपतींनी केलेलं भाषण म्हणजे देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या विश्वासाची अभिव्यक्ती होती, असं ते म्हणाले. २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी पुढची वर्षं महत्वाची असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं.

****

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत एक कोटी ६४ लाखांहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री तोखन साहू यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, मंजूर घरांपैकी ९८ लाखांहून अधिक घरांचं काम पूर्ण करून लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. या योजनेचा देशात एक कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.

****

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी तो अनिर्बंध नाही आणि एखाद्या व्यक्ति किंवा संस्थेची बदनामी करण्यामध्ये तो वापरला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर संविधानानंच काही निर्बंध घातले असून, इतरांच्या सन्मानाला घातक किंवा बदनामीकारक ठरणाऱ्या वक्तव्याला हा अधिकार संरक्षण देत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

आज संध्याकाळी होणार असलेल्या बीटिंग रिट्रीट समारंभानं यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोप होत आहे. या भव्य समारंभातून भारताचा अमूल्य सैन्यदल वारसा, रीतिरिवाज आणि शिस्तीतली ताकद यांचं दर्शन घडतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी समर्पित राहणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान वाटतो, असं पंतप्रधानांनी म्हटलं असून, भारतीय जवानांच्या निष्ठेला आणि त्यागाला वंदन केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही निवड प्रक्रिया होणार असल्याचं निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलं आहे.

****

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला. देशांतर्गत सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा दर साडेसहा टक्क्यांनी वाढून प्रति दहा ग्रॅम एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपये झाला, तर चांदीचा दर पाच पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढून प्रति किलो चार लाख दहा हजार दोनशे चाळीस रुपये, इतका झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...