Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 January 20206
Time 01.00 to 01.05pm
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
७७व्या प्रजासत्ताक दिनाचा आज देशभरात
सर्वत्र उत्साह आहे. यानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य ध्वजारोहण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. भारतीय संरक्षण दलांचं सामर्थ्य, विविध
राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणारं दिमाखदार संचलन यावेळी पार
पडलं. महाराष्ट्राचा गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित चित्ररथही यात सहभागी झाला
होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ग्रूप कॅप्टन
शुभांशु शुक्ला यांना यावेळी अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन
आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. स्वातंत्र्याचा मंत्र- वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र-आत्मनिर्भर
भारत अशी यंदाच्या संचलन सोहळ्याची प्रमुख संकल्पना आहे.
या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
युद्ध स्मारकात देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
मुंबईत शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी पथसंचलनाची पाहणी केली.
****
सत्त्यात्तरावा प्रजासत्ताक दिन मराठवाड्यात उत्साहात विविध
कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विभागातल्या सर्वच शाळा
महाविद्यालयांमध्ये,
तसंच शासकीय – निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह, कवायत, सांस्कृतिक
कार्यक्रम पार पडले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. आपल्या संविधानाची मूल्यं जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य
असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.
****
बीड इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत
कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितीन रहेमान यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी
उपस्थित होते.
****
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा
मुंढे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी मुंढे यांनी परेड
निरीक्षण करुन जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जालना हा
विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याचं सांगून त्यांनी, जिल्ह्यात
राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
****
नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य
ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा पोलीस मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर
झालेल्या या सोहळ्यात पालकमंत्री सावे यांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात
आली. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन अविरतपणे प्रयत्न करत असल्याचं
सावे यावेळी म्हणाले.
****
धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांना
बालविवाह मुक्त धाराशिव जिल्हा आणि कॉपीमुक्त धाराशिव जिल्ह्याची शपथ देण्यात आली.
यानिमित्ताने वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त
सामूहिक वंदे मातरम आणि त्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध
गीतांवर कवायती करून उपस्थितांची मने जिंकली.
****
परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केलं.
यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर सुमारे दोन हजार
विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ
यांनी ध्वजवंदन केलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंह
राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. संविधानाच्या
मार्गदर्शक तत्त्वांचा आदर करत आपण सर्वांनी भारताला जगातलं सर्वश्रेष्ठ राष्ट्र
बनवण्यासाठी कटिबद्ध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. लातूर
जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार
आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी
ग्वाही पालकमंत्री भोसले यांनी दिली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती
विभा कंकणवाडी यांनी ध्वजारोहण केलं. खंडपीठाचे न्यायमूर्ती यांच्यासह विधिज्ञ
यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथल्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉ. इंद्रमणी
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक
वाचन करण्यात आलं.
****
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा
कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या कार्यालयांची यादी आज जाहीर करण्यात आली. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत धाराशिव
कार्यालयानं तिसरा तर लातूर कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला. सर्वोत्तम पोलिस
परिक्षेत्र महानिरिक्षक कार्यालय श्रेणीत नांदेड कार्यालयाने पहिला, तर
विभागीय आयुक्त कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं दुसरा क्रमांक
मिळवला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र
गुराखी गड इथं ३१ वं जागतिक गुराखी साहित्य संमेलन आजपासून सुरु झालं. श्री
क्षेत्र पोहरादेवी संस्थानचे महंत धर्मगुरू श्री बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते
संमेलनाचं उद्घाटन झालं. २८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या
या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment