Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27
January 2026
Time 11.00
to 11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून
सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही बैठक बोलावली आहे. २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय
अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा
पहिला टप्पा येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचं कामकाज
९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत निश्चित करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात
सुरू होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 च्या चौथ्या परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधान
परिषदेत सहभागी प्रतिनिधींना आभासी स्वरूपात संबोधितही करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि
प्रगत तंत्रज्ञान मंत्री डॉ. सुलतान अहमद अल जाबेर, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री टिम हॉजसन यांच्यासह
आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि ग्लोबल साऊथमधील अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ऊर्जा सुरक्षितता मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि कार्बन
उत्सर्जन कमी करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या
परिषदेत अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिकमधील प्रतिनिधी
सहभागी होणार आहेत.
****
राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजासाठी
पाच दिवसांचा आठवडा तातडीनं लागू करावा, या आणि इतर मागण्यांसाठी आज देशव्यापी संप करायचा निर्णय
बँक कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. या संदर्भात मुख्य कामगार आयुक्तांबरोबरच्या वाटाघाटी
फसल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी हा निर्णय घेतला. मात्र खासगी क्षेत्रातल्या
बँकांचे कर्मचारी संपात सहभागी नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
७७ वा प्रजासत्ताक दिन काल
देशभरात उत्साहात विविधि कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा झाला. नवी दिल्लीत कर्तव्य
पथावर यानिमित्त झालेल्या दिमाखदार संचलनात भारताच्या सामरिक शक्तीचं प्रभावी
प्रदर्शन करण्यात आलं. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन
आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. स्वातंत्र्याचा मंत्र- वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र- आत्मनिर्भर
भारत अशी यंदाच्या संचलन सोहळ्याची प्रमुख संकल्पना होती. ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप
दाखवणारा लष्कराचा चित्ररथ, ब्राह्मोस आणि एस
फोर हंड्रे़ड क्षेपणास्त्र, अर्जुन रणगाडा, १६ लढाऊ विमानं, आणि भारताच्या सामरिक
सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्रं हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं.
****
राज्यातही सर्वत्र ७७वा प्रजासत्ताक
दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला
जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. मुंबईत शिवाजी
पार्क इथं मुख्यमंत्र्यांनी मुख्य शासकीय ध्वजवंदन केलं, त्यावेळी ते बोलत होतं.
दावोस इथं नुकत्याच झालेल्या जागतिक
आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्रानं ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून येत्या
काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र राज्य अधिक सक्षमपणे उभं राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स
सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या कार्यलयांची यादी काल जाहिर करण्यात
आली. सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरिक्षक कार्यालय श्रेणीत नांदेड कार्यालयाने
राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ई–गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र वेबसाईट
आपले सरकार, ई ऑफिस, डॅश बोर्ड, व्हाट्सअप चॅटबॉट, एआय ब्लॉक चेन युज, जीआयएस उपयोगिता या बाबींवर आधारित
ही स्पर्धा घेतली होती. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यलय श्रेणीत धाराशिव कार्यालयानं
तिसरा तर लातूर कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला. तर विभागीय आयुक्त कार्यालय श्रेणीत
छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं दुसरा क्रमांक मिळवला आहे.
****
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
आज सुपर सिक्स फेरीत भारत आणि झिम्बाब्वे सामना होणार आहे. झिम्बाब्वेत सुरु असलेल्या
स्पर्धेतील सामना भारतीय वेळेनूसार दुपारी एक वाजता सुरु होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत
चांगली कामगिरी करत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.
****
हवामान
राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात
सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे, येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पावसाचा, हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात आज पहाटे
अवकाळी पाऊस झाला. पेण तालुक्यातील जोहे- हमरापूर परिसरात पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं पेण तालुक्यातील वीटभट्टी
आणि गणेश मूर्ती कारखान्यांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment