Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 January 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
·
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार
करार
·
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी पीएम
सेतू योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद गटांसाठी ३११
आणि पंचायत समिती गणांसाठी ५७० उमेदवार निवडणूक रिंगणात
आणि
·
अकराव्या अजिंठा – वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला
आजपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात, ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांचा पद्मापाणि
पुरस्काराने गौरव
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात होईल. २०२६-२०२७ या
आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दुसऱ्या टप्प्याचं
कामकाज ९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत होईल.
दरम्यान, अधिवेशनाच्या
त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी,
काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ
सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, तसंच
समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
****
भारत आणि
युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार काल करण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष एँतिनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या
अध्यक्ष उर्सुला वॉन देयर लेन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या
करण्यात आल्या. युरोपियन युनियनच्या सर्व २७ देशांसोबत झालेला हा ऐतिहासिक करार भारतीय
शेतकरी, लघुउद्योग, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रासाठी
नव्या संधी उघडणारा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
भारत आणि
युरोपियन युनियनमधल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करार हा सर्वचदृष्ट्या भारतासाठी लाभादायक
असल्याची प्रतिक्रिया, मराठवाडा ॲग्रीकल्चर ॲण्ड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज – मासिआचे छत्रपती
संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले,
बाईट – अर्जुन गायकवाड
****
औद्योगिक
प्रशिक्षण संस्थामध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला
आहे. कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातली तफावत भरून काढण्यासाठी ही योजना
असून, पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथल्या
आयटीआयचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे.
पीएम सेतू
योजनेची पुढच्या वर्षात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता
दिली. योजनेकरिता केंद्र सरकारचा ५० टक्के राज्य शासनाचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा
१७ टक्के निधी असेल. छत्रपती संभाजीनगर इथल्या आयटीआयसह पैठण, खुलताबाद,
गंगापूर आणि फुलंब्री इथल्या आयटीआयचंही आधुनिकीकरण केलं जाणार आहे.
छत्रपती
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या
मेट्रो मार्गिका आठ ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
सार्वजनिक
बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंत्राटदार- उद्योजकांची
प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्मची निर्मिती, धुळ्यातल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय
सहकार विकास महामंडळाकडे शिफारस, वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या
जाणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडे पट्ट्याचा कालावधी वाढवून देणं, केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातल्या शत्रू संपत्तीच्या खरेदी–विक्रीसाठी
मुद्रांक शुल्क माफ करणं इत्यादी निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतले.
****
शाश्वत
आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेकरता नवोन्मेषी संशोधनाची गरज असल्याचं केंद्रीय अवजड
उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. वाहन तंत्रज्ञानाविषयी पुण्यात
आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. आत्मनिर्भर
भारत अभियानाच्या यशाकरता संशोधक आणि उद्योजकांनी अभिनव तंत्रज्ञान विकसित करावं असं
आवाहन त्यांनी केलं. पर्यायी इंधन, विजेवरची वाहनं आणि वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या
अत्याधुनिक सोयीसुविधा या क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठेवावं असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल
संपली. १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी
मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या ६३ जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण ३११ उमेदवार, तर १२६ पंचायत
समिती गणांमध्ये ५७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
आगामी जिल्हा
परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या भारतीय
जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या
बैठकीस मंत्री अतुल सावे आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मार्गदर्शन केलं.
****
बँकाचा
कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करावा या प्रमुख मागणीसाठी काल सर्व राष्ट्रीयकृत आणि
सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. बँक कर्मचारी गेल्या
अनेक वर्षापासून ही मागणी करत आहेत. मात्र, वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष
होत असल्यानं नाईलाजानं हा संप केल्याचं आंदोलक कर्मचारी संघटनांनी सांगितलं. काही
बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखांसमोर मागणीच्या समर्थनासाठी निदर्शनंही केली. या मागणीवर
विचार झाला नाही तर बेमुदत संपावर जाण्याची तयारी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
धाराशिव
इथं बँक कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं केली. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ
युनियनचे नेते गोरखनाथ लवटे यांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला
आहे.
लातूर शहरात
स्टेट बँकेसमोर आंदोलनकर्त्यांनी निदर्शनं केली. शहर आणि परिसरातले दोनशेहून अधिक बँक
कर्मचारी यात सहभागी झाले होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं अकराव्या अजिंठा – वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज सुरुवात
होत आहे. संध्याकाळी सहा वाजता एमजीएम विद्यापीठातल्या रुक्मिणी सभागृहात सांस्कृतिक
कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. या
कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार, पद्मविभूषण इलायराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने
गौरवण्यात येणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पद्मश्री रसुल
पुकुट्टी यावेळी उपस्थित असतील. स्पॅनिश चित्रपट सिरेट ने या महोत्सवाची सुरुवात होईल.
एक फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या महोत्सवात सिने रसिकांना विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट बघायला मिळणार आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या तब्बल १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी एकाच सुरात महाराष्ट्र
गीताचं समूहगान केलं असून, या उपक्रमाची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दशसूत्री उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची
भावना रुजावी, या उद्देशानं हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला.
या सोहळ्याला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत उपस्थित
होते. या जागतिक विक्रमाची नोंद केल्याचं प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांना सुपूर्द करण्यात
आलं.
****
धाराशिव
जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या केमवाडी ग्रामस्थांनी सावरगाव ते गळवाडी या मुख्य
रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर सामूहिक
बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून रस्त्याची मागणी
करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची
भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या पाच तारखेपर्यंत जर ठोस निर्णय
झाला नाही, तर गावातले सुमारे दोन हजार २०० मतदार मतदान प्रक्रियेत
सहभागी होणार नाहीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेड
इथल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे बनावट व्हाउचर वापरून जवळपास एक कोटी साडे नऊ लाख
रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक निरीक्षक सतीश गर्जे यांनी तक्रार
दिल्यानंतर याप्रकरणी बँकेचे संचालक बालाजी शिंदे यांच्यासह इतर ४१ बँक अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
१९ वर्षाखालील
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बुलावाओं इथं झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वे
वर २०४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत विहान मल्होत्राच्या नाबाद १०९ धावांच्या
बळावर भारताने निर्धारित षटकात ३५२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा
संघ १४८ धावात सर्वबाद झाला.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि
सामाजिक आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने आरोग्य समुपदेशन कार्यशाळा आज सर्व शाळांमध्ये
एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे. हा उपक्रम दशसूत्री कार्यक्रमांतर्गत आरोग्य क्षम
विद्यार्थी घडवणं या मुख्य हेतूने राबवण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment