Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 January 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२६ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिव
देहावर आज बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. त्याआधी पवार यांचं
पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पवार
यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, पक्षाच्या
नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अन्य नेते, पदाधिकारी
याठिकाणी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते
बारामतीत दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पवार यांची अंत्ययात्रा
सुरू होताच अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसत असून, अजित पवार अमर रहे, अशी घोषणा देत कार्यकर्ते
आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत आहेत.
दरम्यान, कालच्या अपघातात मृत्युमुखी
पडलेले अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक, मुंबई पोलीस दलातले
२००९ च्या तुकडीचे शिपाई विदिप जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातल्या
त्यांच्या मूळ गावी, तरडगाव इथं रात्री उशिरा अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
अजित पवार यांच्या निधनबाद्दल कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
यांनी शोक व्यक्त केला आहे. चांदा ते बांदा, शहर
असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
यांचे विमान अपघातात निधन झाले “दादा यावेळी वेळ चुकली" असे शब्द ओठांवर
येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही, असं महाजन यांनी
आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांना
श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज
जालना शहर आणि जिल्ह्यातली व्यापारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या
आवाहनाला जालना जिल्हा व्यापारी महासंघानं संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थिक
सर्वेक्षण २०२५-२६ सादर करणार आहेत. हा दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागारांच्या
मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केला आहे.
आर्थिक सर्वेक्षण हे देशाच्या सद्यस्थितीतली आर्थिक स्थिती आणि भविष्यातल्या
दृष्टिकोनाचा एक सर्वसमावेशक आढावा असतो. केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला
जाणार आहे.
काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय
संरक्षण दलांनी दाखवलेलं शौर्य आणि पराक्रम अवघ्या जगानं पाहिला असून, भारतावरच्या कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं
जाईल असा संदेश सरकारनं दिल्याचं राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाल्या.
****
देशाच्या सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
दिल्लीतल्या कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक वैभवाचं सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या
चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र
सरकारकडून आज या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली. 'गणेशोत्सव:
आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित या
चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार आणि
आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरची भव्य
गणेशमूर्ती,
पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या
प्रभावी सादरीकरणामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्तम ठरला. या गटात
जम्मू-काश्मीरनं दुसरा तर केरळनं तिसरा क्रमांक पटकावला आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथे येत्या १३ ते १५
फेब्रुवारी या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचं' आयोजन करण्यात आलं
आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातल्या विविध दर्जेदार प्रजातींचे एक हजाराहून अधिक
पशुपक्षी आणले जाण्याची अपेक्षा आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपक्षी पालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती मिळणार असल्याचं राज्याच्या
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर
पदाची निवड दहा फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली आहे.
त्यांच्या अध्यक्षतेखाली दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ही निवड प्रक्रिया होणार असल्याचं निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयानं
प्रसिद्ध केलं आहे.
****
No comments:
Post a Comment