Wednesday, 28 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन; देशभरातून शोकभावना; राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाही

·      अजित पवार यांच्या पार्थिव देहावर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार

·      विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज – राष्ट्रपतींचं प्रतिपादन; संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

आणि

·      भारत – न्यूझीलंड दरम्यान चौथा टी–ट्वेंटी क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार

****

राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारसभांसाठी त्यांचं विशेष विमान बारामतीला उतरत असताना अपघातग्रस्त झालं आणि विमानातल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, शांभवी पाठक आणि विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा समावेश आहे. अपघातस्थळी विमानानं पेट घेतला. घटनास्थळाची पाहणी सुरू असून विमानाचा ब्लॅकबॉक्स, वैमानिकांचं संभाषण याची पडताळणी केल्यावर अपघाताचं कारण कळू शकेल, असं पोलिसांनी सांगितलं.

****

अजित पवार यांच्या कारकिर्दिचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.

राज्याच्या राजकारणात आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या नावाने लोकप्रिय असलेल्या अजित आशा अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं झाला. कार्यतत्पर आणि अभ्यासू नेते असलेल्या अजित दादांनी आपले काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला आणि राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ भुषवण्याचा विक्रम करत अर्थमंत्री म्हणूनही आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

१९८२ मध्ये साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. दहाव्या लोकसभेत १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पण काही काळात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर ते राज्यातच रमले. दरवेळी बारामती विधानसभा मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत निवडून येत गेले.

विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्याशिवाय जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास यासारखी खाती त्यांच्याकडे होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद १६ वर्ष त्यांच्याकडे होतं. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र खोखो संघटना यांचेही ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. याशिवाय विविध साखर कारखाने, सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

उमद्या स्वभावाचे हजरजबाबी आणि स्पष्टवक्ते अजित दादा, राज्याच्या राजकारणात कायमच केंद्रीय वर्तुळात राहिले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, आक्षेपार्ह विधानांमुळे टीकाही झाली. त्यांच्या राजकीय वाटचालीवर मात्र याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला गट वेगळा केला. न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित दादांच्या गटाला दिलं, मात्र या प्रकरणी अंतिम निकालापूर्वीच अजित दादांचा अपघाती मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अजित पवार यांनी उमटवलेला ठसा आणि कामाच्या धडाडीचा घालून दिलेला आदर्श, सर्वसामान्य नागरिकांच्या सदैव स्मरणात राहील.

****

अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती इथं त्यांचे शोकाकुल कार्यकर्ते आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. राज्यात शासनानं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे.

अजित पवार यांच्या पार्थिव देहावर उद्या बारामती मधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती इथं जाऊन अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेतलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजित पवार आणि इतर चार जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातल्या कार्याबद्दल पवार यांचं नेहमी स्मरण ठेवलं जाईल, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, अजित पवार यांचं प्रशासकीय कौशल्य अद्भुत होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात ते अग्रणी होते, असं म्हटलं आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह राजकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या आकस्मिक अकाली निधनाबद्दल धक्का आणि शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक भावना व्यक्त केल्या.

****

अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात बीड शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारपेठा आज बंद आहेत.

नाशिक जिल्ह्यातही निफाड, चांदोरी, नांदूर शिंगोटे यासह अनेक गावांत आज व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, नाशिकमध्ये मध्ये गोदावरी नदीच्या माघ उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणारी भव्य महाआरती देखील रद्द करण्यात आली आहे.

तर अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून उद्या पुणे शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघानं घेतला आहे.

****

संसदेच्या अर्थसंकलपीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज असल्याचं सांगितलं. संसदेतल्या सर्व सदस्यांनी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात २५ कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्यावर आणण्यात सरकारला यश मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावेळी राष्ट्रपतींनी, सरकारच्या गेल्या वर्षभरातल्या कार्याचा आढावा घेताना, कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ, नवीन कामगार कायदे, नौकानयन क्षेत्रातल्या जुन्या कायद्यांमधले बदल, नक्षलवाद उच्चाटनातली प्रगती, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ३५ लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती, इत्यादी ठळक मुद्द्यांचा उल्लेख केला. याशिवाय, भगवान गौतम बुद्ध यांचे अवशेष परत आणण्यात सरकारला मिळालेलं यश, सोमनाथ मंदिर, सोमनाथ स्वाभिमान पर्व, प्राचीन हस्तलिखितांचं डिजीटलीकरण, दिवाळीच्या सणाला युनेस्कोने दिलेला जागतिक वारशाचा दर्जा, इत्यादी मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीयांचं शौर्य आणि शक्तीचा सुजाण वापर जगाने पाहिला असं राष्ट्रपती म्हणाल्या.

****

मातृभूमी प्रति श्रद्धा आणि कर्मभूमी प्रति समर्पण, ही भारतीय तरुणांची ओळख असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीच्या करिअप्पा कवायत मैदानावर एनसीसी शिबीराच्या पंतप्रधान रॅलीत ते आज बोलत होते. कौशल्य आणि संस्कार या गुणांमुळे संपूर्ण जग आज भारतीय तरुणांकडे विश्वासाने पाहत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सुमारे महिनाभर चाललेल्या या शिबीराच्या समारोप सत्रात सर्वोत्तम संघाचा प्रथम पुरस्कार कर्नाटक आणि गोवा संचालनालयाला, तर द्वितीय पुरस्कार पंजाब संचालनालयाला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज साधेपणानं होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या कार्यक्रमात नियोजित असलेले सर्व सत्कार रद्द करण्यात आले आहेत.

****

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी तूर पिकाची हमीभावानं खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना येत्या २० फेब्रुवारीपर्यंत खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. या खरेदीसाठी जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चौथा टी–ट्वेंटी क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्याच्या मालिकेतले पहिले तीन सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...