Monday, 26 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा देशभर अपूर्व उत्साह

·      महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल आचार्य देवव्रत यांची माहिती

·      शेतकऱ्यांना सुजलाम –सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि

·      मराठवाड्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजवंदन, विविध उपक्रम

****

देशाचा सत्त्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सैन्यदलं, निमलष्करी दलं तसंच सांस्कृतिक पथकांच्या शानदार संचलनाने मानवंदना दिली. स्वातंत्र्याचा मंत्र - वंदे मातरम्‌ आणि समृद्धीचा मंत्र -आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित शानदार संचलन सोहळा आज नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर झाला. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सोहळ्यासाठी देशभरातून आमंत्रित केलेले विशेष पाहुणे आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हा भव्य सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा लष्कराचा चित्ररथ, ब्राह्मोस आणि एस फोर हंड्रे़ड क्षेपणास्त्र, अर्जुन रणगाडा, १६ लढाऊ विमानं, आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्रं हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्यूएल मॅक्रॉन यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून पुढे आला आहे, असं त्यांनी नमूद केलं. राज्यानं एक हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनातून केला. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हेच राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल देवव्रत म्हणाले.

****

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबईत शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्र्यांनी मुख्य शासकीय ध्वजवंदन केलं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यानं दावोस इथं तीस लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भातले सामंजस्य करार केले आहेत. या माध्यमातून मराठवाडा आणि संपूर्ण राज्यात गुंतवणूक येणार आहे. सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पथसंचलनाचं निरीक्षणही केलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे इथं ध्वजवंदन करण्यात आलं. डावोस इथं झालेल्या मोठ्या सामंजस्य करारांचा उल्लेख शिंदे यांनी यावेळी केला. या गुंतवणुकीमुळं सुमारे ४० लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे इथं ध्वजवंदन करण्यात आलं. विविध जाती-धर्मांनी नटलेल्या देशाला एकत्र बांधून संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची मजबूत पायाभरणी करण्यात आली असल्याचं पवार यावेळी म्हणाले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत देश आणि राज्य प्रगतीपथावर आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर जबाबदार भारतीय नागरिकत्वाची भावना जोपासणं हेच खरं बळ आहे, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

****

मराठवाड्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. ऐकूया या संदर्भातला वृत्तांत

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आपल्या संविधानाची मूल्यं जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – संजय शिरसाट

 

बीड इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितीन रहेमान यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जालना हा विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याचं सांगून त्यांनी, जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या -

बाईट – पंकजा मुंडे

 

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन अविरतपणे प्रयत्न करत असल्याचं सावे यावेळी म्हणाले.

 

धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांना बालविवाह मुक्त आणि कॉपीमुक्त धाराशिव जिल्ह्याची शपथ देण्यात आली. यानिमित्ताने वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक वंदे मातरम आणि त्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतांवर कवायती करून उपस्थितांची मने जिंकली.

 

परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी ध्वजवंदन केलं. 

 

लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते म्हणाले,

बाईट – शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी ध्वजवंदन केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉ.इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.

****

राज्य शासनाच्या दिडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या कार्यालयांची यादी आज जाहीर करण्यात आली. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत धाराशिव कार्यालयानं तिसरा तर लातूर कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला. सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरिक्षक कार्यालय श्रेणीत नांदेड कार्यालयानं पहिला, तर विभागीय आयुक्त कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं दुसरा क्रमांक मिळवला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...