Tuesday, 27 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.01.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 January 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत-ब्रिटन व्यापार कराराला पूरक आहे. यामुळं उत्पादन आणि सेवा क्षेत्राला चालना मिळणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज गोव्यात इंडिया एनर्जी वीक-2026 च्या चौथ्या परिषदेचं, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. ऊर्जेची मागणी सतत वाढत असल्यानं भारताला या क्षेत्रात मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात संवाद आणि कृतीसाठी भारत जागतिक व्यासपीठ म्हणून वेगानं उदयास येत असल्याचं मोदी म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारत जागतिक स्तरावर पेट्रोलियम उत्पादनांच्या पहिल्या पाच निर्यातदारांमध्ये समाविष्ट असल्याचं पंतप्रधानांनी याप्रसंगी नमूद केलं. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत, ऊर्जा सुरक्षितता मजबूत करणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना यावर परिषदेत विशेष भर देण्यात येणार आहे.

****

संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी, आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ. एल. मुरुगन यांची बैठकीला उपस्थिती होती. विरोधी पक्षांकडून काँग्रेसचे जयराम रमेश, डीएमकेचे तिरुची शिवा, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्यासह विविध पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे.

****

ऑपरेशन सिंदूर बाबत पसरवण्यात येत असलेल्या भ्रामक वृत्तांबाबत भारतानं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. भारताच्या अंतर्गत बाबींवर, विशेषतः जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशावर भाष्य करण्याचा इस्लामाबादला कोणताही अधिकार नाही, असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी सांगितलं. सुरक्षा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमाची पुष्टी शांती, न्याय आणि बहुपक्षीयतेला पुनरुज्जीवित करण्याचे मार्ग या विषयावर खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी केलेल्या वक्तव्याला पी. हरीश उत्तर देत होते.

दरम्यान, भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेची तातडीची गरज असल्याचं म्हटलं आहे. वाढत्या जागतिक आव्हानांमुळं संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता धोक्यात येत असल्याचा इशारा त्यांनी दिला. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यसंख्येत वाढ करून अर्थपूर्ण सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येणार आहेत. त्यानंतर साडेतीन वाजता अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या चार जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

****

जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर शिवारातल्या शेलगाव पेट्रोलपंपाजवळ, आज पहाटे तीनच्या सुमारास पुण्याहून यवतमाळकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसनं अचानक पेट घेतला. बसमध्ये २७ प्रवासी होते. माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. या दुर्घटनेत प्रवासी बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, जिवीतहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हवामान

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे, येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा, हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...