Saturday, 31 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 January 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे

·      खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

·      उपमुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

·      राज्यात महापौर निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग

आणि

·      भारत-न्यूझीलंडदरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज अखेरचा सामना

****

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. विभागानं या माहितीला दुजोरा दिला. गेल्या बुधवारी बारामती विमानतळावर उतरत असताना या विमानाचा अपघात होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी वेगाने करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. विमान अपघात अन्वेषण ब्यूरो तर्फे सुरु असलेल्या चौकशीत अपघातस्थळी आवश्यक सहकार्य करावं असं त्यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेते पदाबाबत चर्चा होणार असल्याचं, मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. राज्य चालवण्यासाठी या मुद्याला प्राधान्य देत असल्याचं, भुजबळ यांनी नमूद केलं, ते म्हणाले,

बाईट – मंत्री छगन भुजबळ

****

भुजबळ यांच्यासह पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली.

दरम्यान, उपमुख्यमंत्रिपद तसंच विधिमंडळ पक्षनेत्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. हा त्यांच्या पक्षाचा विषय असून, पक्ष घेईल, तो निर्णय मान्य आपल्याला मान्य असेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं, ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, विधानभवनात अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल अजित पावर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन करून अभिवादन केलं.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त काल संपूर्ण देशभर त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मान्यवरांनीही गांधीजींना अभिवादन केलं. राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना पार पडली.

देशाचं स्वातंत्र्य आणि एकतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळण्यात आला.

**

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं. मुंबईत विधानभवन इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

****

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारं प्रभावी साधन ठरत असल्याचं मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर 'दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन आणि सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता उलगडणं' या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचं आयोजन मुंबईतल्या हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल इथं करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसंच बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, अ‍ॅप्स आणि डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करावं, असं अग्रवाल म्हणाले.

****

छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात काल चार नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यात दोन महिलांचा समावेश असून त्या चौघांवर मिळून आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं. बस्तरचे पोलीस महानिरिक्षक सुंदरराज पी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्यासमोर या चौघांनी शस्त्रं टाकली. हे सर्वजण गोलापल्ली, कोंटा आणि किस्ताराम परिसरात सक्रीय होते.

****

केंद्र सरकारने राज्यातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांसाठी २०२५–२६ या आर्थिक वर्षाकरिता १५व्या वित्त आयोगाच्या अनिर्बंध अनुदानाचा दुसरा हप्ता जारी केला आहे. या दुसऱ्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्राला ७१४ कोटी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचा लाभ राज्यातल्या २६ हजार ४०७ पात्र ग्रामपंचायती, १५ पात्र पंचायत समित्या आणि दोन जिल्हा परिषदांना मिळणार आहे.

****

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अकोला महानगरपालिकेत महापौरपदाची निवडणूक काल झाली. भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने संख्याबळ सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदं मिळवली आहेत. भाजपाच्या शारदा खेडकर ४५ मतं मिळवून महापौर बनल्या. उपमहपौरपदी आघाडीचे उमेदवार अमोल घोगे निवडून आले. एमआयएमचे नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले आणि अपक्ष उमेदवाराने शहर सुधार आघाडीला पाठिंबा दिला.

नवी मुंबई महापालिका महापौर पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे. यंदा महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी आरक्षित आहे.

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौरपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर भाजपाचे कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. याची औपचारिक घोषणा येत्या तीन फेब्रुवारीला होईल.

नागपूर महापालिकेच्या महापौर पदाबाबतच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल बैठक झाली. नागपूर इथं येत्या ६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे.

मालेगाव महानगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत स्वतंत्र गट स्थापन केला आहे.

लातूर शहर महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी विधिज्ञ दीपक मठपती यांची निवड झाली आहे. काल या निवडीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

****

राज्यात सद्यःस्थितीत ७ कोटी ७७ लाख ४१ हजार मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप पूर्ण झालं आहे, तर ९ पूर्णांक १ टक्के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचं ७१ लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन तयार झालं आहे. राज्यातल्या २०६ साखर कारखान्यांकडून प्रतिदिन दहा लाख ४३ हजार ५५० मेट्रिक टन ऊसगाळप सुरू असून, हंगाम जोमाने सुरू आहे. यंदाचा हंगाम फेबुवारीअखेर किंवा दहा मार्चपर्यंत चालू राहण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाचे साखर सह संचालक महेश झेंडे यांनी वर्तवला आहे.

****

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं मिळवलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार काल नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याची संस्कृती आणि परंपरांचं दिमाखदार दर्शन घडवणारा हा चित्ररथ गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता. या चित्ररथाचा विषय केवळ धार्मिक नसून, तो आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर आधारित होता.

****

शाश्वत उत्पादन देणारा फळबागेचा पथदर्शी प्रकल्प बीड जिल्ह्यात ३५० एकर क्षेत्रावर येत्या काळात साकारणार आहे. हरित वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना बळकटी देण्यासोबतच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हर्बालाईफ कंपनीने सामाजिक बांधिलकी उत्तरदायित्व अंतर्गत पुढाकार घेतला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. तिरूवनंतपुरम इथं संध्याकाळी सात वाजता हा सामना होणार आहे. या मालिकेत भारताची तीन – एक अशी विजयी आघाडी आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...