Sunday, 25 January 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 January 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      रोजगार मेळाव्यात दिली जाणारी नियुक्तीपत्रे ही राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होण्याचं संकल्पपत्र – पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशाला संबोधित करणार

·      देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं – एनसीसीच्या शिबिरात संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

·      नांदेडमध्ये हिंद दी चादर सोहळ्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार; काल श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्तांकडून कौतुक

****

रोजगार मेळाव्यात दिली जाणारी नियुक्तीपत्रे ही राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होण्याचं संकल्पपत्र असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल १८व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या ६१ हजार युवकांना दूरस्थ पद्धतीनं पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ११ लाख युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, थेट परदेशी गुंतवणूक अडीच पटीनं वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण, कुशल कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय करार आणि सुधारणा-गुंतवणुकीतून भारत ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’च्या मार्गावर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशासनात छोट्या सुधारणा घडवण्याचं आवाहनही करण्यात आलं.

पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं, तर नागपूरच्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू देशाला संबोधित करणार आहेत. हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केलं जाईल.

**

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर उद्या होणाऱ्या संचलनातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम काल झाली. सुमारे अडीच हजार कलाकारांनी त्यात भाग घेतला. वंदे मातरम् गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव हा संचलनाचा प्रमुख विषय आहे.

****

जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिबिरात बोलत होते. एनसीसी ही स्वत:ची श्रेणीवर्धन करणारी कार्यशाळा असून, एनसीसी कॅडेट्स हे देशाचं प्रतिबिंब असल्याचं संरक्षणमंत्र्यांनी नमूद केलं. एनसीसी कॅडेट्सच्या वतीनं यावेळी संरक्षणमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

अचूक मतदार याद्या या लोकशाहीचा पाया आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. आज साजरा होत असलेल्या १६व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. प्रत्येक पात्र मतदाराची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं आणि अपात्र नावं वगळण्याच्या उद्देशानं मतदार याद्यांचं विशेष पुनिरीक्षण सुरु करण्यात आलं, असंही ते म्हणाले. डिजिटल युगाची गरज ओळखून निवडणूक आयोगानं ई सी आय नेट या ऍपद्वारे सर्व मतदार सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तरुण मतदारांनी आवर्जून मतदान करावं तसंच चुकीची आणि दिशाभूल करणाऱ्या माहिती विरोधी लढ्याचं नेतृत्व करावं, असं आवाहन कुमार यांनी केलं.

**

दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्लीत निवडणूक आयोगाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना 'माझा भारत, माझे मत' अशी असून, 'भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक' हे यंदाच्या दिनाचं ब्रीदवाक्य आहे. या सोहळ्यादरम्यान, राष्ट्रपती नव्याने नोंदणी केलेल्या तरुण मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान करतील तसंच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निवडणूक व्यवस्थापन, मतदार जागृती उपक्रम यासह विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार आणि माध्यमांसाठी विशेष पुरस्कारही प्रदान करतील.  

****

उच्च न्यायालयं हे न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत, त्यांनी आणखी सक्रीय पद्धतीनं काम करावं, अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी व्यक्त केली. मुंबईत फली नरिमन स्मृती व्याख्यानात ते काल बोलत होते. न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे तो नाकारला जाणंच नाही, तर तो नष्ट होणं आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा काल मुंबईत राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदांवर असतील, तोपर्यंत संविधान आणि लोकशाहीला कुठलाही धोका नाही, असं शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात दोषसिद्धीचा दर आता ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, तो ६० टक्क्यांपर्यंत नेला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हरियाणातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून सर्वोच्च न्यायालयीन पदापर्यंत न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. या सत्काराबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

****

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं आयोजित हिंद दी चादर या सोहळ्यात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून,

या कार्यक्रमानिमित्त ५२ एकर परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती, मोठ्या प्रमाणावर महा लंगरची सोय, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, ३५० हून अधिक स्टॉल्स, विशेष आरोग्य शिबिरं, तसंच भाविकांच्या सुलभ वाहतुकीसाठी आणि सोयीसाठी सुनियोजित पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा समावेश आहे.

कालपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने करण्यात आली. यावेळी ‘बोले सो निहाल’च्या जयघोषात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिबजी यांचा त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेचा संदेश यांचं स्मरण केलं जात आहे.

**

या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गुरुद्वारा गुरु सिंग सभा इथून २५० जणांचा पहिला जत्था काल नांदेडला रवाना झाला.  

**

हिंगोली शहरात काल हिंद दी चादर निमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या‌ वतीनं विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून गुरु तेग बहादूर यांना मानवंदना दिली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यावेळी उपस्थित होते. विविध शाळांमधले सुमारे ५५० विद्यार्थी या संचलनात सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कौतुक केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल वाघमारे यांनी भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, उपस्थित होते. यावेळी निवडणूक आयुक्तांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करुन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करावं, तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावे, अशी सूचना वाघमारे यांनी केली.

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या २७ तारखेपर्यंत आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी १३ जणांनी, तर पंचायत समितीच्या गणांच्या एकूण अर्जातून २० जणांनी काल अर्ज मागे घेतले.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...