Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
January 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
ज्याप्रमाणे आपण वाढदिवस साजरा करतो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा युवक किंवा युवती पहिल्यांदाच मतदार होतात तेव्हा
तो दिवस देखील साजरा करायला पाहिजे, त्यामुळे मतदारांमध्ये जागृती होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी
आज आकाशवाणीवरच्या आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधला. या मालिकेतला हा १३०वा आणि या वर्षाचा पहिला भाग होता. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी
देशवासियांना प्रजासत्ताक दिन आणि आज साजरा होत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या
शुभेच्छा दिल्या. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. यावर्षी
सर्व ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊ या, असं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शून्य दोष
- शून्य परिणाम असं केल्यानंच आपण विकसित देशाचा प्रवास वेगानं पुढे नेऊ शकू असं ते
म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पर्यावरण, स्वच्छता, नदी स्वच्छता याविषयी देशसहभागातून केल्या जाणाऱ्या कामांची
प्रशंसा केली. ‘जेन झी’ अर्थात नव्या पिढीमध्ये भक्ती आणि अध्यात्माविषयी आवड निर्माण
होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाबाहेर असलेले भारतीय, देशाबाहेरही आपल्या संस्कृती आणि परंपरांचं जतन करत असल्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. मलेशियामधल्या भारतीयांचा पंतप्रधानांनी त्यासाठी विशेष
उल्लेख केला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाची उल्लेखनीय कामगिरी जाणून
घेण्याची आणि ती साजरी करण्याची संधी मिळते असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी
दिल्लीत १६वा राष्ट्रीय मतदार दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात येत आहे. माझा भारत, माझं मतदान हा या कार्यक्रमाचा विषय होता. निवडणूक आयोगानं या
कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
****
आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाला २०२५ वर्षासाठी मतदार
शिक्षण जागृतीवरील सर्वोत्तम मोहीम या श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक विभागातला माध्यम पुरस्कार
राष्ट्रीय मतदार दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतला सहभाग वाढवण्यासाठी आणि निवडणुकांबाबत जागरूकता
निर्माण करण्याकरिता आकाशवाणीनं दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
****
श्री गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी
समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये होत असलेल्या “हिंद दी चादर” कार्यक्रमासाठी देशभरातून अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं येत
आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य समारंभ होत
आहे. दिल्लीचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मनजींदर सिंघ सिरसा, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, या सोहळ्यासाठी आज सकाळी नांदेडला पोहचले, खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचं
स्वागत केलं.
****
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील बीडपासून पुढे
रखडलेले रेल्वे मार्गाचे कामे, भूसंपादनाची २० प्रकरणे वेळेत पूर्ण करा, रेल्वे मार्गाशेजारील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा अशा
सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज बीड इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात रेल्वे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासह
विविध महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२०
क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. भारतीय
संघाने आधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील हा संघ
तिसरा सामनाही जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. आगामी
टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे दोन आठवडे उरले असून, ही मालिका दोन्ही संघांसाठी ‘अंतिम चाचणी’ ठरणार असल्यानं या
मालिकेला मोठं महत्त्व आहे.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग येत्या
२७ ते ३१ जानेवारी दरम्यान अमरावती ते वाशीम मार्गावर संकेत फलकांची आधार चौकट उभारण्यासाठी
काही काळ बंद ठेवण्यात येईल. राज्य रस्ते विकास महामंडळानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार
१२ टप्प्यात हे काम केलं जाणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक
संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरता पूर्णतः थांबवण्यात येणार आहे.
****
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर
महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची बैठक काल झाली. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये निकालाचं विश्लेषण करण्यात आलं. आगामी काळात
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक ताकदीनं मैदानात उतरतील, असा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
No comments:
Post a Comment