Thursday, 29 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      चालू आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपी वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज; आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर

·      विद्यापीठ अनुदान आयोगानं उच्च शिक्षण संस्थांसाठी लागू केलेल्या नव्या समानता संवर्धन नियमाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

·      बीटिंग रिट्रीट या समारंभाने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोप

·      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

आणि

·      छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तास विद्यार्थ्यांसाठी या विशेष जनजागृती मोहिमेची सुरुवात

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२५-२६ सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल घरगुती उत्पादन – जीडीपी वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. सलग चौथ्या वर्षी भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील, दरडोई वार्षिक उत्पन्न २ लाख ५ हजार रुपयांवरुन, २ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज, तर आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर ६ पूर्णांक ८ ते ७ पूर्णांक २ टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे. जीएसटीमधे केलेल्या सुधारणा, जागतिक पातळीवरच्या संकटांचं संधींमध्ये केलेलं रुपांतर, या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेला पुढचं वर्ष लागेल, असं यात नमूद केलं आहे. २०२५ या वर्षात आयातीच्या तुलनेत आपण अधिक सेवांची निर्यात केली. पण रुपयाला सावरण्यासाठी हे पुरेसं ठरलं नसल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे. गुंतवणुकीसाठी सुरक्षित असल्यानं, सोनं आणि चांदीतली तेजी येत्या काळातही कायम राहील असंही यात म्हटलं आहे.

****

दरम्यान, देशाच्या विकास दरात वाढ होत असून, अगदी कमी चलनवाढीसह देश असे उच्च विकास दर गाठत असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटलं आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२५-२६ च्या संदर्भात ते आज माध्यमांशी बोलत होते. विकासाच्या अन्य मापदंडांच्या संदर्भात बोलताना नागेश्वरन यांनी, ८१ टक्के ग्रामीण घरांमध्ये शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याचं, दोन कोटी नव्वद लाख घरं निर्माण केल्याचं आणि स्वामित्व योजनेअंतर्गत दोन कोटी शहात्तर लाख संपत्ती कार्ड जारी केल्याचं सांगितलं.

****

सरकारनं देशभरात आतापर्यंत अठरा वेळा रोजगार मेळावे आयोजित करून त्यातून अकरा लाख एकोणचाळीस हजार नागरिकांना केंद्र सरकारमध्ये नोकऱ्या दिल्या असल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत दिली. गेल्या दशकभरात रोजगार मेळाव्यांचा हा मंच मजबूत झाला असून, सहा कोटींहून जास्त लोकांनी यामध्ये नोंदणी केल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर कामकाज एक फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आलं.

****

विद्यापीठ अनुदान आयोगानं उच्च शिक्षण संस्थांसाठी लागू केलेल्या, नव्या समानता संवर्धन नियम २०२६ ला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. या नियमाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची सुनावणी घेत आहेत. हा नियम खुल्या वर्गासाठी भेदभावपूर्ण असल्याचा आक्षेप घेत, न्यायक्षेत्रातल्या नामवंत जाणकार व्यक्तींच्या समितीकडून या नियमाची समीक्षा केली जावी, अशी सूचना न्यायालयानं केली. विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्र सरकार, यांनी यासंदर्भात येत्या १९ मार्चपर्यंत उत्तर द्यावं, अशी नोटीस न्यायालयानं जारी केली. याकाळात, याबाबतीतले २०१२ चे नियम लागू राहतील, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

****

देशाच्या सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार संचलनात, राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकया संकल्पनेवर आधारित या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता.

****

बीटिंग रिट्रीट या समारंभाने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोप होत आहे. नवी दिल्लीत विजय चौकात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ सुरु आहे. सरसेना अध्यक्ष अनिल चौहान यांच्यासह तिनही सैन्य दलांचे प्रमुखही या समारंभाला उपस्थित आहेत.

या भव्य समारंभातून भारताचा अमूल्य सैन्यदल वारसा, रीतिरिवाज आणि शिस्तीतली ताकद यांचं दर्शन घडतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले इतर मंत्री, राज्यभरातले खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातले मान्यवर, यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

प्रशासनाच्या वतीनं राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते.

****

दरम्यान, या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या प्रकरणाचा तपास सखोलपणे, पारदर्शकपणे करण्याला आणि तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज जालना शहर आणि जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्हा व्यापारी महासंघानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री खासदार भागवत कराड, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, तसंच नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून शहरात आजपासून एक तास विद्यार्थ्यांसाठी, या विशेष जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेत इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीनं डॉक्टर शहरातल्या विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. याशिवाय थेट संवाद, चर्चासत्रं अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून अशी जीवनशैली पाळण्याची प्रतिज्ञा घेतली जात आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या आयकर कार्यालयाच्या टीडीएस विभागानं दोन ठिकाणी कारवाई करत रस्ते बांधकाम करणाऱ्या एका कंपनीकडून १ कोटी ७३ लाख रुपयांची तर पॉलिमर निर्मिती क्षेत्रातल्या एका कंपनीकडून ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. आयकर अधिकारी राहुल मोरे यांनी ही माहिती दिली. संबंधित कंपन्यांनी आयकर कायदा १९६१ च्या टीडीएस तरतुदींचं पालन करावं, असं आवाहनही मोरे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड दहा फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया होणार असल्याचं निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलं आहे.

****

डाक विभागाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कैलास शिल्प इथं उद्या आणि परवा, म्हणजे ३० आणि ३१ जानेवारीला नियोजित असलेलं दुर्मिळ टपाल तिकिटांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. राज्यात शासकीय दुखवटा असल्यामुळे आता हे प्रदर्शन त्याच ठिकाणी येत्या ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवारीला भरवण्यात येणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...