Saturday, 24 January 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.01.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 January 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अठराव्या रोजगार मेळावा संपन्न, ६१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

·      कर्तव्यात कसूर करणाऱ्या बूथ स्तरीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश

·      प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तरुणांनी सज्ज राहावं – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

आणि

·      श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या हौतात्म्य सत्संग सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेडला येणार

****

तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्लीत आयोजित अठराव्या रोजगार मेळाव्याला पंतप्रधान मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो तरुणांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली असून हे नियुक्तीपत्र तरुणांना विकसित भारताकडे घेऊन जाणारं संकल्पपत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ६१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यात आठ हजार महिलांचा समावेश आहे. गृह विभाग, वित्त, महसूल, आरोग्य, उच्च शिक्षण आणि संरक्षण आदी क्षेत्रात या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. देशभरात ४५ ठिकाणी हा मेळावा झाला. यात नवी दिल्ली, मुंबई, नागपूर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतरपुरम आणि भुवनेश्वर आदी शहरांचा समावेश आहे. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं तर नागपूरच्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.

****

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्राला संबोधित करतील. हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवर संध्याकाळी सात वाजता आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केले जाईल.

****

दिल्लीतील लष्करी छावणीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरात राष्ट्रीय छात्र सेना- एनसीसी कॅडेट्सना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संबोधित केलं. जग अनिश्चिततेच्या काळातून जात असताना देशातील तरुणांनी तयार राहिलं पाहिजे तसंच एनसीसी कॅडेट्स हे आत्मविकास, शिस्त आणि नेतृत्व घडवण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून काम करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी अपर पोलिस महासंचालक मधुकर पाण्डेय यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, बृहन्मुंबई पोलिस दल, महिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी सहभाग घेतला.

****

भारतीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, गैरवर्तन, आयोगाकडून मिळालेल्या सूचनांचं जाणूनबुजून पालन न करणं किंवा लोकप्रतिनिधी कायदा आणि मतदार नोंदणी नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन यासारख्या प्रकरणांमध्ये निलंबनासह कठोर कारवाई केली जाईल, असं आयोगानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या गैरवर्तनाचे प्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, असं आयोगानं या पत्रात म्हटलं आहे.

****

निवडणूक आयोग उद्या नवी दिल्लीत १६ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असून त्या अध्यक्षस्थान भूषवतील. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना माझा भारत, माझे मत अशी असून, ‘भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिकही यंदाच्या दिनाचे ब्रीदवाक्य आहे. या सोहळ्यादरम्यान, राष्ट्रपती नव्याने नोंदणी केलेल्या तरुण मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान करतील तसंच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निवडणूक व्यवस्थापन, मतदार जागृती उपक्रम यासह विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार आणि माध्यमांसाठी विशेष पुरस्कारही प्रदान करतील.

****

राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. मुलींचे अधिकार, आरोग्य, पोषण आणि कल्याण अबाधित राखत लैंगिक समानता, समान अधिकार तसंच मुलींची सक्षम नागरिक म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं दरवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेचा वर्धापन दिन म्हणूनही हा दिवस देशभर साजरा केला जात आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पुढाकारानं २००८ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला होता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३० वा भाग असेल.

****

राज्यातील शासकीय कारभारात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणाकार्यक्रमाअंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयाची नावं येत्या सोमवारी, २६ जानेवारीला सकाळी १० वाजता जाहीर केली जाणार आहेत. तर सर्वोत्कृष्ट पाच जिल्हा परिषद कार्यालयांची निवड आचारसंहिता संपल्यानंतर आठ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सामाजिक माध्यमावारील सामाईक केलेल्या आपल्या संदेशात माहिती दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कौतुक केलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी राज्य निवडणूक आयुक्तांनी भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सुर्या कृष्णमुर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तहसिलदार दिनेश झांपले आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक आयुक्तांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला.

मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करुन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करावे तसंच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावेअशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.

****

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या होतात्म्य वर्षानिमित्त आज आणि उद्या नांदेड इथं हौतात्म्य सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार असून आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं आज संध्याकाळी नांदेडच्या गुरु गोविंद सिंघजी विमानतळावर आगमन झालं. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. दरम्यान, आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री गुरु ग्रंथ साहीबजी यांचं दर्शन घेतलं.

****

हिंगोली शहरात आज श्री गुरु तेग बहादूरजी साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या‌ वतीनं विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून गुरु तेग बहादूर यांना मानवंदना दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...