Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 January 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सात पूर्णांक चार दशांश
टक्के राहील असा अंदाज, आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर
·
भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची
सांगता
·
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक वेळापत्रकात बदल, सात फेब्रुवारीला
मतदान
·
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा
निरोप
आणि
·
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून ‘एक तास विद्यार्थ्यांसाठी’
या विशेष मोहिमेचा आरंभ
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२५-२६ सादर
केला. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल घरगुती उत्पादन – जीडीपी वाढीचा दर सात पूर्णांक
चार दशांश टक्के राहील असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. सलग चौथ्या वर्षी भारत ही
जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील, दरडोई वार्षिक उत्पन्न
२ लाख ५ हजार रुपयांवरुन, २ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा
अंदाज, तर आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर ६ पूर्णांक
८ ते ७ पूर्णांक २ टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
जीएसटीमधे केलेल्या सुधारणा, जागतिक पातळीवरच्या संकटांचं संधींमध्ये
केलेलं रुपांतर, या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेला
पुढचं वर्ष लागेल, असं यात नमूद केलं आहे. २०२५ या वर्षात आयातीच्या
तुलनेत आपण अधिक सेवांची निर्यात केली. पण रुपयाला सावरण्यासाठी हे पुरेसं ठरलं नसल्याचं
आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे. गुंतवणुकीसाठी सुरक्षित असल्यानं, सोनं आणि चांदीतली तेजी येत्या काळातही कायम राहील असंही यात म्हटलं आहे.
****
देशात होत
असलेल्या सुधारणांचं सर्वंकष चित्रण या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर येत आहे. आव्हानात्मक
असलेल्या जागतिक परिस्थितीतही देशाची स्थिर पद्धतीनं होत असलेली प्रगती यातून दिसून
येत असल्याची प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, तसंच युवावर्गाला दिले जाणारे रोजगार
आणि जन कल्याण यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन होत असलेल्या सर्वंकष विकासाचं महत्त्व
हा अहवाल सांगत असल्याचं ते म्हणाले.
****
प्रजासत्ताक
दिन सोहळ्याची सांगता करणारा भव्य बीटिंग रिट्रीट समारंभ काल दिल्लीत विजय चौक इथं
मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सरसेना अध्यक्ष अनिल चौहान
यांच्यासह तिनही सैन्य दलांचे प्रमुखही या समारंभाला उपस्थित होते. भारतीय लष्कर,
नौदल आणि हवाई दलाच्या बँड पथकांनी सादर केलेल्या मनमोहक देशभक्तीपर
धूनांनी वातावरण भारावून टाकलं. पारंपरिक सैनिकी शिस्त, संगीताची
भव्यता आणि प्रकाशयोजनेच्या सौंदर्यामुळे हा समारंभ विशेष ठरला. देशाच्या सैन्य परंपरेचं
आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा हा सोहळा नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत, देशसेवेचं प्रतीक असलेल्या या समारंभानं
प्रजासत्ताक दिन उत्सवाचा भावनिक आणि गौरवशाली समारोप झाला. या समारंभात वाजवण्यात
आलेल्या देशभक्तीपर धूनांची ही झलक,
बीटिंग रिट्रीट धून
****
प्रजासत्ताक
दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार संचलनात, राज्यांच्या
चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित
या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा
संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता.
****
राज्यातल्या
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात
आला आहे. आता पाच ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान होणार असून नऊ फेब्रुवारीला मतमोजणी
केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात
आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक
आयोगाने दिली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज, छाननी तसंच अंतिम उमेदवार यादीची प्रक्रिया
पूर्ण झाली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारीला
प्रसिद्ध करतील. जाहीर प्रचाराची सांगता पाच फेब्रुवारीला रात्री १० वाजता होणार आहे.
जिल्हा
परिषदांच्या एकूण ७३१ जागांसाठी आलेल्या सात हजार ८८६ उमेदवारी अर्जांपैकी २३० अर्ज
छाननीत अवैध ठरले, तर ३ हजार ६०७ जणांनी उमेदवारी मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीच्या
रिंगणात दोन हजार ६२४ उमेदवार आहेत.
पंचायत
समित्यांच्या एकूण १ हजार ४६२ जागांसाठी आलेल्या १३ हजार २९७ उमेदवारी अर्जांपैकी ४०५
अर्ज छाननीत अवैध ठरले, तर सहा हजार ११८ जणांनी उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आता चार हजार ८१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगानं
काल ही आकडेवारी जाहीर केली.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांना काल शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती
इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली
वाहिली.
विधानसभेचे
अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले
इतर मंत्री, राज्यभरातले खासदार, आमदार,
विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय,
सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातले मान्यवर, यांच्यासह
सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या नेत्याला अखेरचा निरोप
दिला.
प्रशासनाच्या
वतीनं राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
अंत्यसंस्कारापूर्वी
अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच
जनसागर उसळला होता. अजित पवार यांचं परवा २८ तारखेला विमान अपघातात निधन झालं, ते ६६ वर्षांचे
होते.
****
दरम्यान, या अपघातग्रस्त
विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं
दिली आहे. या प्रकरणाचा तपास सखोलपणे, पारदर्शकपणे करण्याला आणि
तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं
आहे.
****
अजित पवार
यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल जालना शहर आणि जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
छत्रपती
संभाजीनगर इथं काल भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
बीड जिल्हाधिकारी
कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी, तसंच नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठातही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
डोमेस्टिक
टुरिझम अर्थात घरेलू पर्यटनाच्या प्रसारासाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं पर्यटन व्यवसायाशी
संबंधित भागधारकांची बैठक घेण्यात आली. भारत सरकारचं पयर्टन मंत्रालय तसंच कर्नाटक
टुरिझम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी
कनार्टक मधल्या तसंच छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातली स्थानिक पर्यटन स्थळं, सुप्रसिद्ध
जागतिक वारसा, इतर ऐतिहासीक वारसा स्थळांमध्ये स्वदेशी पर्यटकांची
संख्या वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या पर्यटक सूचना
अधिकारी स्नेहल पाटील यांनी या बैठकीसंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या,
बाईट – स्नेहल पाटील
****
छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून शहरात एक तास विद्यार्थ्यांसाठी, या विशेष
जनजागृती मोहिमेची काल सुरुवात झाली. या मोहिमेत इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीनं
डॉक्टर शहरातल्या विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत
आहेत. याशिवाय थेट संवाद, चर्चासत्रं अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना
आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून अशी
जीवनशैली पाळण्याची प्रतिज्ञा घेतली जात आहे.
****
No comments:
Post a Comment