Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 January
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· ७७ वा प्रजासत्ताक
दिन उत्साहात साजरा, कर्तव्य पथावर देशाच्या सामरिक शक्तीचं प्रदर्शन
· संविधानातल्या
मूल्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनून वाटचाल करत आहे, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
· मराठवाड्यात
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत
ध्वजवंदन
· राज्यात
शालेय विद्यार्थ्यांचं एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन, उपक्रमाची
लंडन इथल्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद
आणि
· पुढील दोन
दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान
विभागाचा अंदाज
****
७७व्या प्रजासत्ताक दिन काल
देशभरात उत्साहात विविधि कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा झाला. नवी दिल्लीत कर्तव्य
पथावर यानिमित्त झालेल्या दिमाखदार संचलनात भारताच्या सामरिक शक्तीचं प्रभावी प्रदर्शन
करण्यात आलं. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा
उर्सुला फॉन डेर लेयन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याचा
मंत्र- वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र- आत्मनिर्भर भारत अशी यंदाच्या संचलन सोहळ्याची
प्रमुख संकल्पना होती.
ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा
लष्कराचा चित्ररथ, ब्राह्मोस आणि एस फोर हंड्रे़ड क्षेपणास्त्र, अर्जुन
रणगाडा, १६ लढाऊ विमानं, आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्रं
हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं.
या सोहळ्याविषयी अधिक माहिती
देत आहेत आमचे प्रतिनिधी,
बाईट
“कर्तव्य पथाकडे जाणारे
सगळे रस्ते पहाटेपासून नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. या नागरिकांमध्ये
पथसंचलनात सहभागी असलेले तीनही सैन्य दलाचे सैनिक आणि एनसीसी कॅडेट्स तर होतेच, त्याशिवाय
हे पथसंचलन पाहण्यासाठी आमंत्रित केलेले एन एस एस चे कार्यकर्ते, सामाजिक
कार्यकर्ते, आदर्श गावांचे सरपंच आणि
बचत गटाच्या महिला सदस्यांचाही त्यात समावेश होता. राष्ट्रपतींच्या हस्ते
ध्वजारोहण झाल्यावर पथसंचलन सुरू झालं आणि महाराष्ट्राचा चित्ररथ समोर अवतरताच
मराठी मनं अभिमानाने भरून आली. राज्य उत्सव झालेल्या गणेशोत्सवातला अनंत चतुर्दशी
चा विसर्जन सोहळा या चित्ररथावर साकारला आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा
येत्या ३१ तारखेपर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यात सर्वांना पाहता येणार आहे.’’
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून आकाशवाणी बातम्यांसाठी मी हर्षवर्धन दीक्षित.’’
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात
पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना यावेळी अशोक चक्र देऊन
सन्मानित करण्यात आलं.
**
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल
आचार्य देवव्रत यांनी काल राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं. महाराष्ट्र थेट परकीय
गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून
पुढे आला आहे, असं त्यांनी नमूद केलं. राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेखही
त्यांनी आपल्या संबोधनातून केला. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन
असल्याचं राज्यपाल म्हणाले.
**
संविधानातल्या मूल्यांच्या
मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचं इंजिन बनून वाटचाल करत असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण
केल्यानंतर ते बोलत होते. नुकत्याच दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने
३० लाख कोटी रुपयांचे करार केले असून, यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर
रोजगार निर्मिती होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासनाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी
दिली.
बाईट –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
**
मराठवाड्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त
जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजवंदन पार पडलं. विभागातल्या सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये, तसंच शासकीय
– निमशासकीय कार्यालयांमध्ये कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.
**
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री
संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी परेड निरीक्षण करुन उपस्थितांना
शुभेच्छा दिल्या. आपल्या संविधानाची मूल्यं जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं
शिरसाट यावेळी म्हणाले.
बाईट –
पालकमंत्री संजय शिरसाट
**
धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या
विद्यार्थ्यांना बालविवाह मुक्त धाराशिव जिल्हा आणि कॉपीमुक्त धाराशिव जिल्ह्याची शपथ
देण्यात आली. यानिमित्ताने वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त
सामूहिक वंदे मातरम आणि त्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतांवर
कवायती करून उपस्थितांची मने जिंकली.
**
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या
मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी परेड
निरीक्षण करुन जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जालना हा विकासाभिमुख
जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याचं सांगून त्यांनी, जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या
विविध योजनांची माहिती दिली.
बाईट –
पालकमंत्री पंकजा मुंडे
**
परभणी इथं पालकमंत्री मेघना
बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर
सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या.
हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी
झिरवाळ यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर बीड
इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
**
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात
पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी ध्वजारोहण केलं. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक
नागरिकासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षिततेची हमी
देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बाईट –
शिवेंद्रसिंहराजे भोसले
**
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी ध्वजारोहण केलं. छत्रपती संभाजीनगर
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या
हस्ते, नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉ. इंद्रमणी
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
**
'राष्ट्र प्रथम' या उपक्रमांतर्गत
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरात शासकीय ध्वजावंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांचं
एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन झालं. या उपक्रमात राज्यातल्या एक
लाख शाळांमधल्या दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर शिस्तबद्ध
आणि समन्वयपूर्ण कवायत सादर केली. या उपक्रमाची अधिकृत नोंद लंडन इथल्या वर्ल्ड बूक
ऑफ रेकॉर्डस् या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री
दादा भुसे यांनी दिली.
**
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी
दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या संचलन सोहळ्यात देशभरातून अनेक पाहुण्यांना आमंत्रित
करण्यात आलं होतं. धाराशिव जिल्ह्यातल्या जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी आणि नांदेड
जिल्ह्यातल्या येवलीच्या सरपंच शितल कंठाळ यांनी हा सोहळा अनुभवल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया
या शब्दात व्यक्त केल्या,
बाईट –
सरपंच अमर सूर्यवंशी, सरपंच शितल कंठाळ
****
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या कार्यलयांची यादी काल
जाहिर करण्यात आली. सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरिक्षक कार्यालय श्रेणीत नांदेड
कार्यालयाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यलय
श्रेणीत धाराशिव कार्यालयानं तिसरा तर लातूर कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला. तर
विभागीय आयुक्त कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं दुसरा क्रमांक मिळवला
आहे.
****
हवामान
राज्यात अनेक भागात किमान
तापमानात किंचित वाढ आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment