Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 26 January 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
७७व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह; नवी दिल्लीत
मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण
·
देशवासीयांनी राष्ट्रप्रथम या भावनेतून देशाच्या प्रजासत्ताकाला
अधिक गौरवशाली बनवावं – राष्ट्रपतींचं आवाहन
·
अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण, १३ पद्मभूषण,
तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, परभणी
जिल्ह्यातले प्रगतशील शेतकरी दादा लाड यांचा सन्मान
·
९८२ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहिर
·
मतदार होण्याचा उत्सव साजरा केल्यास लोकांमध्ये मतदानाबद्दल
जागरूकता वाढेल; मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन
आणि
·
‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा नांदेडमध्ये उत्साह; श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचं स्मरण
****
देशाचा
७७वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर साजऱ्या होत असलेल्या
मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. युरोपियन
परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर
लेयन हे या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडे
दहा वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल. ‘स्वतंत्रता का मंत्र: वंदे मातरम आणि समृद्धी
का मंत्र: आत्मनिर्भर भारत ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना आहे.
****
देशवासीयांनी
राष्ट्रप्रथम या भावनेतून देशाच्या प्रजासत्ताकाला अधिक गौरवशाली बनवावं असं आवाहन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी
काल देशाला उद्देशून संबोधित केलं. मतदानात महिलांची वाढती भागीदारी हा लोकशाहीचा सशक्त
पैलू असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी महिला शक्तीचा गौरव केला. बेटी बचाओ-बेटी पढाओ
आणि जनधन योजनेमुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं असून क्रीडा क्षेत्रातही मुलींनी
जागतिक स्तरावर सुवर्ण इतिहास रचला आहे असं त्यांनी नमूद केल.
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
पर्यावरणाभिमुख
जीवनशैलीचा अवलंब करण्याचं आवाहन करत राष्ट्रपतींनी जागतिक शांततेचा संदेश दिला.
****
दरम्यान, प्रजासत्ताक
दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातल्या जनतेला उद्देशून संदेश आज सकाळी
साडे आठ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात येणार
आहे.
****
२०२६ या
वर्षासाठीचे पद्म पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये पाच जणांना पद्मविभूषण, १३ पद्मभूषण
आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून,
बाईट – पद्म पुरस्कार
“ज्येष्ठ अभिनेता
धर्मेंद्र यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के. टी. थॉमस,
विख्यात व्हायोलिनवादक एन. राजम, साहित्य आणि शिक्षणक्षेत्रासाठी
पी. नारायणन आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना पद्मविभूषण पुरस्कार
जाहीर झाला आहे. धर्मेंद्र आणि व्ही. एस. अच्युतनंदन यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला
जाईल.
१३ जणांना पद्मभूषण पुरस्कार
जाहीर झाले. प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, उद्योगपती उदय कोटक,
जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियूष पांडे, झारखंडचे
माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, बॅडमिंटनपटू विजय अमृतराज यांच्यासह
इतरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
तर, देशभरात विविध
ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार
जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या ११ मान्यवरांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रात
अर्मिडा फर्नांडिस, उद्योग क्षेत्रात अशोक खाडे आणि सत्यनारायणन
नुवाल, कला क्षेत्रात भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर खेडकर, अभिनेता
सतीश शहा, सामाजिक कार्यासाठी जनार्दन बोठे, विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी जुझेर वासी, क्रिकेटपटू
रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.’’
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यातले प्रगतशील शेतकरी श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कापूस संशोधनातील
उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल लाड यांनी आकाशवाणीशी
बोलताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
बाईट – श्रीरंग उर्फ दादा लाड
****
प्रजासत्ताक
दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड,
नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधल्या ९८२ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि
सेवा पदकं काल जाहिर झाली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय
ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘अशोक चक्र’ जाहिर झाला
आहे. तर भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट
कमांडर रुपा ए यांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात येणार आहे.
१०१ कर्मचाऱ्यांना
राष्ट्रपतींचं विशिष्ट सेवा पदक आणि ७५६ कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं प्रदान
केली गेली. यापैकी सव्वाशे कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं देण्यात आली आहेत.
यामध्ये
महाराष्ट्रातल्या ८९ कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येणार आहे. यात ३१ शौर्यपदकं, उल्लेखनीय
सेवेसाठीची चार राष्ट्रपती पदकं आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या ४० पदकांचा समावेश
आहे. कोलकाता इथल्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातलं डॉक्टर हत्याप्रकरण आणि
विचारवंत नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही
यात समावेश आहे.
****
मतदान म्हणजे
केवळ राजकीय अभिव्यक्ती नाही, तर निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांच्या
विश्वासाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. सोळाव्या
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
घटनात्मक कर्तव्य लक्षात घेऊन प्रत्येक पात्र नागरिकानं मतदानाचा हक्क बजावावा,
यावर त्यांनी भर दिला. यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना “माझा भारत,
माझं मत” अशी होती.
मतदार दिनानिमित्त
राज्यस्तरीय कार्यक्रम नाशिक इथं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या
उपस्थितीत झाला.
****
मतदार हाच
लोकशाहीचा आत्मा असतो म्हणूनच मतदार होण्याचा उत्सव साजरा केल्यास लोकांमध्ये मतदानाबद्दल
जागरूकता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा काल १३०वा
भाग प्रसारित झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
पंतप्रधानांनी
यावेळी पर्यावरण, स्वच्छता, नदी स्वच्छता याविषयी देशसहभागातून
केल्या जाणाऱ्या कामांची प्रशंसा केली. `जेन झी` अर्थात नव्या पिढीमध्ये भक्ती आणि अध्यात्माविषयी आवड निर्माण होत असल्याबद्दल
त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल, भारत
आणि मलेशिया यांच्यातले राजकीय संबंध, इंडिया ए आय समिट,
नवोन्मेषाच्या क्षेत्रात युवकांनी केलेलं काम आदी मुद्यांवर पंतप्रधानांनी
मन की बात मधून भाष्य केलं.
****
राज्यातल्या
तीन लाख ३७ हजार मेट्रीक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी
मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत किंमत समर्थन योजनेअंतर्गत
सुमारे दोन हजार ६९६ कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असल्याचा निर्णय
घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याचे पणन
मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित
होते.
****
श्री गुरु
तेग बहादुर साहीबजी यांच्या साडे तिनशेव्या हौतात्म्य वर्षानिमित्त ‘हिंद दी चादर’
हा कार्यक्रम नांदेडमध्ये उत्साहात पार पडला. राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग
आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड इथल्या मोदी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात
लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचं
स्मरण केलं.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहेब अबचलनगर
साहिबजी गुरुद्वाराचं दर्शन घेतलं.
श्री गुरु
तेगबहादूर साहिब यांनी मानवतेसाठी आणि धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले. राज्य सरकार शीख समाजातल्या दहा गुरूंचे विचार आणि त्यांच्या बलिदानाचा
इतिहास प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
**
बीड इथं
हिंद दी चादरनिमित्त मुलींच्या शासकीय वसतिगृहात श्री गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या
जीवन कार्यावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
****
न्यूझीलंडविरुद्धचा
तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत तीन – शून्य
अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment