Wednesday, 31 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. आज छाननी झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १८ प्रभागांतून एकूण ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज या अर्जांची छाननी होणार आहे. काँग्रेस - वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीत काँग्रेसनं ६५ तर वंचितने पाच जागी उमेदवार दिले आहेत. भाजपने स्वबळावर ७० उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम पक्षानं प्रत्येकी ०९ उमेदवार दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं ९६ जणांना उमेदवारी दिली आहे.

****

नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठीचा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा उद्या इंदूरचे महापौर तथा अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष पुष्यमित्र भार्गव यांच्या हस्ते प्रसिद्ध केला जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारने सुरु झालेल्या महत्त्वाकांक्षी 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमानं ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कालपर्यंत या उपक्रमात सहभागासाठी तीन कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात प्रचंड सहभाग दर्शवला आहे, जो या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता दर्शवतो. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो आणि परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवतो, असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

ध्रुव-एनजी-Next Generation या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक कमी वजनाच्या हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी बंगळूरू इथं हिरवा झेंडा दाखवला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे विकसित केलेलं हे हेलिकॉप्टर ६ ते १४ प्रवाशांच्या आसन क्षमतेचं असून ते एरो इंडिया शोमध्ये प्रथम सादर करण्यात आले होते. पर्यटनमहत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण करणे, दुर्गम भागातील सेवा, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य, पूर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे.

****

केंद्र सरकारनं आणलेल्या ‘विकसित भारत जी-राम-जी’ कायद्यामुळे देशातील राज्यांना सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळू शकतो, असं भारतीय स्टेट बँकेचे समूह प्रमुख वित्तीय सल्लागार सौम्यकांती घोष यांनी म्हटलं आहे. मनरेगाच्या तुलनेत अधिक कुशल, गरजेनुसार आणि डिजिटल माध्यमातून निधी वितरणाची व्यवस्था या कायद्यात करण्यात आली असून, त्यामुळे राज्यांना थेट फायदा होणार असल्याचं घोष म्हणाले.

****

राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाला आहे. राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात राज्यातील ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. या महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांतील विजेते संघ येत्या १० ते १२ जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

****

युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी, पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली. इंग्रजीसह एकंदर २२ भारतीय भाषांमधल्या ४३ विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना सहा महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यभर १० टक्के रॉयल्टीही दिली जाणार आहे.

****

आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या सवागतासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त शेगाव इथं संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता आज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. आनंद विहार, आनंद विसावा या भक्तनिवासांमध्ये पर्यटकांना राहण्याची सोय संस्थानच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर कायम आहे. काल अहिल्यानगरमध्ये राज्यातल्या सर्वात कमी, म्हणजे 8 पूर्णांक 4 अंश सेलसीयस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...