Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· सर्वसमावेशक विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यसरकार कार्यरत -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन
· माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात न्यायालयाच्या निकालानंतर योग्य तो निर्णय घेण्यात
येणार-मुख्यमंत्र्यांचा खुलासा
· लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा
होणार
आणि
· लातूर जिल्ह्यात पहिल्या राज्यस्तरीय गावगाडा संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
****
राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन
सर्वसमावेशक,
प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी
काम करत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरवात झाली, त्यावेळी
ते बोलत होते.
महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचं
राज्य असल्याचं सांगत,
दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीची राज्यपालांनी माहिती दिली.
एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं
राज्यपालांनी नमूद केलं,
राज्य सरकार गतिमान आणि सुशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी त्रिसूत्री
कार्यक्रम राबवत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. यामध्ये शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना
करणं, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणं आणि एकात्मिक मानव संसाधन प्रणाली विकसित करणं, यांचा
समावेश असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या शहरी भागात उत्तम पायाभूत सुविधांद्वारे जीवनमान
सुधारण्यासाठी नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं
राज्यपालांनी सांगितलं.
सरकार महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वाद सोडवण्यासाठी
बांधील असून,
सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ
वकिलांची नेमणूक केली आहे. सरकार सीमाभागातल्या मराठी नागरीकांसाठी शिक्षण, आरोग्य
आणि इतर योजना राबवत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, फास्टटॅगच्या
माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने टोल वसुली, १० लाख युवकांना प्रशिक्षित
करण्याचं लक्ष्य,
औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, वस्त्रोद्योग
क्षेत्राचं बळकटीकरण आणि विस्तार, कर्मयोगी भारत कार्यक्रम, प्रधानमंत्री
आवास योजना,
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन
योजना, अटल भूजल योजना,
नमो ड्रोन दीदी आदी योजनांचा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात
उल्लेख केला.
****
विधीमंडळाचं कामकाज सुरू होताच, विधान
परिषदेत प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडला, त्यावर
उद्या आणि परवा चर्चा घेण्याचा निर्णय सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, कृषीमंत्री
माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही
बाजूच्या सदस्यांनी गदारोळ केला. सभापती राम शिंदे यांनी, कोकाटे
हे विधानसभेचे सदस्य असल्याने, त्यांच्यासंदर्भातला विषय विधानसभेत मांडणं
उचित ठरेल,
असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या
प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं
सांगितलं. ते म्हणाले –
(बाईट – देवेंद्र फडणवीस)
सभापती राम शिंदे यांनी माजी पंतप्रधान डॉ
मनमोहनसिंग यांच्यासह विधीमंडळाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला, सदनाने
तो एकमताने संमत केला. त्यानंतर सदनाचं कामकाज उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित
करण्यात आलं.
****
विधानसभेत कामकाज सुरू होताच, मुख्यमंत्र्यांनी
नवीन सदस्य असलेले पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा परिचय करून दिला. रणधीर सावरकर यांनी
राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर उद्या मंगळवारी सदनात
चर्चा घेणार असल्याचं,
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर अर्थमंत्री
अजित पवार यांनी २०२४-२५ साठीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. या पुरवणी मागण्यांवर येत्या
गुरुवारी आणि शुक्रवारी चर्चा होणार आहे.
दरम्यान, विधानसभेच्या या अधिवेशनासाठीच्या
तालिका अध्यक्षांची नावं अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केली. यामध्ये बबनराव लोणीकर, रमेश
बोरनारे, यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीसाठीचा
शोकप्रस्ताव अध्यक्ष नार्वेकर यांनी मांडला. सदनाने या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा
दिला. त्यानंतर सदनाचं कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणातील
अनेक मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाने असमती दर्शवली आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये
भ्रष्टाचार होत असून,
भ्रष्ट मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा
सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. या सर्व मुद्यांवर सरकारला जाब
विचारणार असल्याची भूमिका पटोले यांनी मांडली, ते म्हणाले –
(बाईट – नाना पटोले)
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. अशोक महाजन आज रुजू झाले. डॉ. महाजन हे विद्यापीठाचे
पाचवे प्र-कुलगुरू म्हणून रुजू झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक विषयात डॉक्टरेट असणारे डॉ.
महाजन यांनी,
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात
पाच वर्षे ‘कुलसचिव’ पदाची जबाबदारी सांभाळली आहे. जगभरातील जवळपास २९ देशांना त्यांनी
शैक्षणिक कामानिमित्त भेटी दिल्या आहेत. भारतीय अनुदान संस्थामार्फत एकूण १० संशोधन
प्रकल्पही डॉ महाजन यांनी पूर्ण केले आहेत.
****
जागतिक वन्यजीव संरक्षण दिनानिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातमध्ये सासन गीर इथं राष्ट्रीय वन्यजीव
मंडळाची सातवी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी जुनागढ इथं वन्यजीवांसाठीच्या राष्ट्रीय
संदर्भ केंद्राची पायाभरणी केली. तसंच, सोळाव्या आशियाई सिंहगणना अहवाल, मानव-वन्यजीव
संघर्ष व्यवस्थापन कार्यक्रम ‘सॅकोन’चं अनावरण केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी गीर राष्ट्रीय
उद्यानाची सफर केली आणि नंतर वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.
****
भारत पुढील दोन वर्षांत जगातील तिसरी सर्वात
मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं
आहे. नवी दिल्ली इथं सशस्त्र सेना ध्वज दिन कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी - सीएसआर परिषदेला
ते आज संबोधित करत होते. देशाच्या आर्थिक विकासात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांची
महत्त्वाची भूमिका असून,
संरक्षण उद्योगात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची गरज राजनाथसिंग
यांनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी
महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी
सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे
यांनी ही माहिती दिली. त्या आज विधान भवन परिसरात बोलत होत्या.
(बाईट – आदिती तटकरे)
****
लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात तादलापूर
इथं पहिलं राज्यस्तरीय गावगाडा संमेलन आज पार पडलं. परिसरातल्या नागरिकांचा या संमेलनाला
उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. माय मराठी चॅनल, अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळातर्फे
घेण्यात आलेल्या या संमेलनाचं संशोधक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
ज्येष्ठ विचारवंत मॅक्सवेल लोपीस यांनी यावेळी बोलतांना, माणसाची
निसर्गापासून झालेली फारकत दूर करण्यासाठी आता शब्दांचे शस्त्र हाती घेऊन भवताल घडवावा
लागेल असं मत व्यक्त केलं. उद्घाटनापूर्वी सकाळी कर्नाटकातील मूर्कीवाडी इथून निघालेल्या
ग्रंथदिंडीला समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देशटवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ
झाला. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या दिंडीने सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं
होतं.
****
छत्रपती संभाजीनगर माहपालिकेतर्फे येत्या
७ ते मार्च दरम्यान तीन दिवस महा कर समाधान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. विधी प्राधिकरण
मार्फत कोर्टाच्या नोटीस मिळालेल्या मालमत्ता धारकांसाठी महा कर समाधान शिबीर असून
शिबीरातच कर भरण्याची सुविधा उपलब्ध असेल, करधारकांच्या अर्जावरील निर्णयात
अंतिम होणारा मालमत्ता कर नागरीकास त्याच ठिकाणी एकरकमी भरणा करावा लागेल अशी माहिती
उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे.
****
महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नवतेजस्विनी
महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं येत्या
७ ते ९ मार्च दरम्यान औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातील महिलांनी
उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होणार आहे. या मेळाव्यात
५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसेच दररोज विविध विषयावर परिसंवाद आणि
बचत गटातील उद्योजक महिलांचे मनोगत तसंच उद्योजक महिलांचा सन्मान केला जाणार असल्याची
माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी दिली. या मेळाव्यास
भेट देऊन उपलब्ध वस्तूंची खरेदी करावी, असं आवाहन राठोड यांनी केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment