Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
जागतिक वन्यजीव दिवस आज पाळण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक वन्यजीन दिनानिमित्त गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातल्या सासण गिर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये लष्करप्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, या क्षेत्रात काम करणार्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा ४७ सदस्यांचा समावेश आहे. हे मंडळ पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव आणि वनांचं संवर्धन आणि विकास करण्यासाठी काम करते. बैठकीनंतर मोदी सासण इथल्या काही महिला वन कर्मचाऱ्यांशीही संवाद साधतील.
****
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं आजपासून सुरूवात होत आहे. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून घेरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली; या अधिवेशनात अतिशय संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारने न्यायिक पायाभूत सुविधांसाठी सातत्याने दरवर्षी सुमारे एक हजार कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या समितीकडून प्राप्त प्रस्तावाची तातडीने पूर्तता करून कामे मार्गी लावली आहेत, त्यामुळे राज्यात अधिक गतीने न्यायदानाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात महाड इथल्या कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, न्यायवैद्यक प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी-बुच यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतल्या विशेष लाचलुचपत न्यायालयानं संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो यांना हा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. यात सेबीचे तीन अधिकारी आणि मुंबई शेअर बाजाराच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सेबी कायदा आणि इतर लागू कायद्यांच्या संबंधित तरतुदींनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
लोककलांमध्ये नाटकाची मुळं असल्याचं लेखन समोर येत असून, अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यास गट नाट्य परिषदेनं स्थापन करावा, सरकार या कामी पूर्ण मदत करेल, असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १००व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्यमहोत्सवाचा सांगता सोहळा काल मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाट्य जागरमधल्या विजेत्या तीन विशेष एकांकिकांचं सादरीकरण करण्यात आलं.
****
भारतीय संविधानात बदल अशक्य असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये बौद्ध धम्म परिषदेत ते काल बोलत होते. श्री काळाराम मंदीर सत्याग्रह दिनानिमित्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, नाशिक शहरात पंचवटीतल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त काल मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन समिती आणि भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment