Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक शिष्यवृत्तीत वाढ
करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारस
·
रेल्वेचे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्यात
येणार- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
·
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम, सामाजिक हिताच्या
योजना सरकार बंद करणार नाही- अजित पवार यांची विधीमंडळात ग्वाही
आणि
·
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती सर्वत्र उत्साहात
साजरी
****
विद्यार्थ्यांना
सध्या दिली जाणारी वार्षिक शिष्यवृत्ती वाढत्या महागाईमुळे त्यांच्या नियमित खर्चाची
पूर्तता करण्यासाठी पुरेशी नाही, असं संसदीय स्थायी समितीनं नमूद केलं
आहे. त्याबाबतचा अहवाल काल संसदेत मांडण्यात आला. या पार्श्वभूमीवर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, शिक्षण मंत्रालय
आणि इतर संबंधितांसह विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक शिष्यवृत्ती
रकमेचा आढावा घेण्याच्या सूचनाही या समितीनं दिल्या आहेत.
****
देशभरात
रेल्वेचे सगळे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. आतापर्यंत ४१ हजार एलएचबी डबे
तयार झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट
- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
****
राज्याच्या
आर्थिक स्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं खोटं चित्र
रंगवू नका, अशी स्पष्ट सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल
विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. गेल्या १५ वर्षात राज्याच्या
कर्जाचं स्थूल उत्पादनाशी प्रमाण १६ ते १९ टक्के आहे. देशात महाराष्ट्रासह फक्त तीन
राज्यांचं कर्जाचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं, त्यांनी
नमूद केलं. महसुली तूट आणि राजकोषीय तूटही मर्यादेत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं.
ते म्हणाले..
बाईट – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्याच्या
तसंच सामाजिक हिताच्या योजना सरकार बंद करणार नाही, परंतू गरज नसलेल्या
योजना सरकार बंद करेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण
योजनेत सुधारणा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ
उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार असल्याची घोषणाही पवार
यांनी काल केली.
****
सर्व खाजगी
आस्थापनांमध्ये विशाखा तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक केलं जाणार असल्याचं, महिला आणि
बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. यासाठी महिला आणि बालविकास
आयुक्तालयाला राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महिलांना SHE
BOX ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवता येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेतले
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न
सदनात उपस्थित केला. पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास, छत्रपती संभाजीनगरला
किमान दोन दिवसाआड पाणी मिळेल अशी सूचना नियम ९३ अन्वये त्यांनी मांडली.
बीड जिल्ह्यात
केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल
करावा, विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना
बंधनकारक करावं, अशी सूचना दानवे यांनी केली. या प्रकरणाची सखोल
चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जालना जिल्ह्यात बदनापूर इथं कृषी संशोधन
केंद्राच्या बळकटीकरणासाठी दोन कोटी ८५ लाख रुपये, आणि पायाभूत सुविधांसाठी
१४ कोटी ३५ लाख रुपये, असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येणार
आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
****
वाळू तस्करीवर
नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार असल्याची माहिती, महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. काल विधानपरिषदेत बोलताना त्यांनी, गोदावरी खोऱ्यातल्या वाळू उपसाबाबत सात दिवसात चौकशीकरून दोषींवर कठोर कारवाई
करण्यात येईल, असं सांगितलं.
****
विधान परिषदेच्या
पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काल सहा उमेदवारांनी
अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके, भाजपकडून
संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर शिवसेनेकडून चंद्रकांत
रघुवंशी आणि अपक्ष उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी गरज
भासल्यास, २७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
नागपूर
मधल्या महाल परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास दोन गटात तणाव निर्माण झाला होता. धार्मिक
प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे ही घटना घडली, यात दगडफेक करण्यात
आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या. पोलिसांना या परिसरात
जमावाला पांगवण्यासाठी अश्रृधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या,
तसंच लाठीमार करावा लागला. नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाल परिसरात कलम १४४ लागू केलं आहे. केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरीकांना अफवांवर विश्वास
न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती काल राज्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. या निमित्तानं
शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. ठाणे इथं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४५ फुटी पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते अनावरण झालं, तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं
लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात
आलं. या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी,
या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं
आश्वासन दिलं.
दरम्यान, औरंगजेबाच्या
पाशवी विचारांचं महिमामंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून,
ते विचार तिथेच चिरडून टाकण्यात येईल, असं फडणवीस
यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू
परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
राज्यभरात विविध ठिकाणी या संघटनांनी काल आंदोलन केल्याचं वृत्त आहे.
****
लातूर इथं
शिवसेना शहर शाखेच्यावतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आलं. यावेळी शिवछत्रपती ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी
महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ भेट देण्यात आले.
****
नांदेड
जिल्हा परिषदेच्या २०२५- २६ च्या २२ कोटी २६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला काल प्रशासक
तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मान्यता दिली. यावेळी २०२४-२५च्या सुधारीत
अर्थसंकल्पालाही मान्यता देण्यात आली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ लेण्यांमध्ये मधमाशांनी काल पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार
घडला. कैलास लेणी परिसरात घडलेल्या या प्रकारात काही पर्यटक जखमी झाले तर अतिप्रमाणात
मधमाशा चावलेला एक परदेशी पर्यटक बेशुद्ध पडला. त्याला छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ शिवकुमार भगत
यांनी दिली.
****
सामाजिक
कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी
काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. पोलीस दलातले २६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या
तक्रारीचे पुरावे सादर करून, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या
अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या
आष्टी इथं ट्रक चालक विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा जणांना आष्टी पोलिसांनी अटक केली,
तर चार आरोपी फरार झाले. मालकाने केलेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू
झाल्याचा आरोप असून, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
****
परभणी इथं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल जायकवाडी कार्यालयासमोर
आंदोलन केलं. पाणी मिळत नसल्याची तक्रार करत संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप
ठोकलं
****
हवामान
राज्यात
उन्हाचा कडका वाढत असून, विदर्भात कालही उष्णतेची लाट होती. राज्यात काल सर्वाधिक ४१ पूर्णांक
सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ४० पूर्णांक
दोन, परभणी ३९ पूर्णांक चार, धाराशिव ३८
पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३७ पूर्णांक पाच अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment