Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाऊंडेशनचं सहकार्य
· विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप
· २०२४ वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना
जाहीर
· छत्तीसगडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत ३० नक्षलवादी ठार
· महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची
घोषणा
आणि
· पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ-भानुदास एकनाथच्या जयघोषात संतनगरी दुमदुमली
****
राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
वापरात करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला
देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात
उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर ही माहिती
देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
या उपक्रमातही गेट्स फाऊंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
गोहत्येचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या
आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा-मकोका अंतर्गत गुन्हे दाखल
करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत संग्राम
जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देत होते.
****
विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची
कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी आज राजभवनात
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं, त्यात
हा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या
जात असून, सत्ताधारी पक्षाच्या कलानं कामकाज केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य
तो निर्णय घ्यावा,
अशी मागणी दानवे यांनी केली.
****
दिवंगत अभिनेता सुशांतहसिंह राजपूत यांची
व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य अमित साटम, नितेश
राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी
घोषणाबाजी सुरु केल्याचं विधानसभेचं कामकाज काही काळासाठी बाधित झालं
भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत
हा मुद्दा उपस्थित केला,
या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव
आणल्याचा आरोप सॅलियन कुटुंबाने केला आहे. तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता
सुरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नव्याने चौकशी करावी अशी
मागणी दरेकर यांनी केली.
दरम्यान, सत्ताधारी पक्ष या प्रकरणी
सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
केला. सदस्य अनिल परब यांनी सॅलियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं सभागृहात सांगितलं.
यावेळी परब आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वरून झालेल्या
गदारोळामुळे सदनाचं कामकाज काही काळ बाधित झालं.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या
मागणीसाठी आज शिवसेना सदस्यांनी विधानभवन परिसरात मूक आंदोलन केलं.
****
२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
दरम्यान, सुतार यांना हा पुरस्कार
मिळाल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
म्हटलं आहे. तर सुतार यांना हा पुरस्कार जाहीर होणं हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या
त्यांच्यावरच्या निखळ प्रेमाचं प्रतीक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी
करण्यासाठी शिफारशी मागवल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत
सांगितलं. अवैध वाळू उपसा झाला असेल तर त्याठिकाणी दंडासह वसुली केली जाईल, वाळू
क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही
त्यांनी सांगितलं. प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये
सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. बावनकुळे यांनी ही माहिती दिली. अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही
अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास
आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
****
राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई
अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत
लेखी उत्तरात ही माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचार सुरू असल्याचं
भुसे यांनी या उत्तरात नमूद केलं.
****
धाराशिव इथं "बांधा-वापरा आणि हस्तांतरित
करा" या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार
आहे. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्या
सह एसटीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित
केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक सैनिक हुतात्मा झाला. दंतेवाडा-बीजापूर सीमा
आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आणि स्फोटकंही
जप्त करण्यात आली आहेत.
****
जागतिक चिमणी दिवस आज पाळण्यात येत आहे.
“मला चिमण्या आवडतात” या संकल्पनेनं चिमणी
संवर्धनासाठी पुढे यावं, तसंच यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या
अंगणात, छतावर किंवा गॅलरीत चिमण्यांसाठी पाण्याची सोय करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात
येत आहे.
****
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. ते आज महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाचा
९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, चवदार
तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या ७ कोटी रुपयांची
कामं,
तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची
कामं तातडीनं सुरू केली जातील, अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
यांनी घोषणा केली.
दरम्यान, हजारो भीम अनुयायांच्या
उपस्थितीत आज सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर
रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी
सोहळ्याला आज सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक
विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अंकित,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रौत्सवासाठी यंदा
६२७ पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून, हजारो वारकरी इथे मुक्कामी आहेत.
पैठण नगर परिषदेच्या वतीनं याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या
आहेत.
पैठण शहरातून आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात
आली. वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या
समाधीचं दर्शन घेतलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
औरंगपुरा येथील नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी काकड आरती, भजन, कीर्तन, पालखी
सोहळा, यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी परिसरातून
नाथांची पालखी निघाली,
शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं.
****
No comments:
Post a Comment