Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाऊंडेशनचं सहकार्य
• धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये निधी दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
• २०२४ वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर
• महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा
• पैठण इथं भानुदास एकनाथच्या जयघोषात नाथषष्ठी साजरी
आणि
• खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेला दिल्लीत सुरुवात, बाराशेपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
****
राज्यातल्या शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमातही गेट्स फाऊंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
****
राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अनुदानावरच्या मागण्यांना उत्तर देताना सांगितलं. अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी तरतुदीच्या तुलनेत अतिशय कमी खर्च झाल्याचा आरोप केला होता. तो पवार यांनी फेटाळून लावला….
बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार
****
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी काल राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं, त्यात हा आरोप करण्यात आला आहे. राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
****
दिवंगत अभिनेता सुशांतहसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं.
भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, दिशा सॅलियान प्रकरणी होत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
****
२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. २५ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी मागवल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. अवैध वाळू उपसा झाला असेल तर दंडासह वसुली केली जाईल, वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही, बावनकुळे यांनी दिली.
****
राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानपरिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचार सुरू असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
****
धाराशिव इथं "बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. ते काल महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत काल सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक सैनिक हुतात्मा झाला. दंतेवाडा-बीजापूर सीमा आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला काल प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रौत्सवासाठी यंदा ६२७ पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून, हजारो वारकरी इथं मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीनं याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पैठण शहरातून काल सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
यानिमित्त नाथ समाधी मंदिरात विश्व शांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आयोजित केलेल्या विश्व शांती प्रार्थना कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा इथल्या नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. काल सकाळी परिसरातून नाथांची पालखी निघाली, शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं.
****
जालना इथल्या सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीनं आयोजित पाच दिवसीय पंचकल्याण महोत्सवाला काल शोभायात्रेनं सुरुवात झाली. या महोत्सवास देवमूर्ती इथल्या गुरुमंदिरात भगवान विमलनाथ, भगवान धर्मनाथ आणि भगवान अनंतनाथ यांच्या मूर्तींचा प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
खेलो इंडिया पॅरा क्रिडा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ काल दिल्लीत केंद्रीय क्रिडा मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी आणि टेबल टेनिस या क्रिडा प्रकारात बारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. २७ तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.
****
जागतिक चिमणी दिन काल पाळण्यात आला. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं सद्गुरू आश्रम शाळेत अशफाक अत्तार यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसह चिमण्यांसाठी घरटी करण्याचा उपक्रम राबवला. याबाबत अत्तार यांनी माहिती दिली...
बाईट – अशफाक अत्तार
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातले ५०१ ग्रामपंचायत सदस्य आणि बारा सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलं आहे. २०२१ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या या सदस्यांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वेळा मुदत वाढ दिली होती.
****
दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवाला काल प्रारंभ झाला. ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा संकुल परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथं काल सकाळी एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात, चौकात भाजी विक्रीसाठी बसलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तुकाराम बाजीराव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
****
मराठवाड्याच्या काही भागात काल अवकाळी पाऊस झाला.
अंबाजोगाई शहर परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. लातूरच्या औसा, चाकूर, जळकोट शहरात, तसंच धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातही काल पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment