Friday, 21 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

संसदेत आज वित्त विधेयक सादर होणार आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं सगळ्या खासदारांना व्हिप जारी करुन लोकसभेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

****

माथाडी कामगारांसंदर्भातल्या कायद्यात कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींसंदर्भातलं विधेयक विधान परिषदेत काल मंजूर करण्यात आलं. विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवत या विधेयकातल्या तरतुदी माथाडी कामगारांच्या हिताच्या नसल्याचं सांगितलं आणि विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पुन्हा पाठवण्याची मागणी केली. मात्र कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हे विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी असल्याचं नमूद करत, यासंदर्भात हितसंबंधितांची बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं. 

****

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक काल विधानसभेत संमत झालं. या सुधारणांमुळे शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती घेणाऱ्या मात्र धर्मादाय रूग्णालयात व्यवस्थेच्या कक्षेत न आलेल्या ३०३ रुग्णालये धर्मादाय रूग्णालयांच्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयांनाही गरिब आणि निर्धन रुग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवावं लागणार असल्याचं, विधी आणि न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. 

निर्धन आणि दुर्बल घटकातल्या रूग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटा आणि उपचार घेत असलेल्या रूग्णांची अद्ययावत माहिती रोजच्या रोज धर्मादाय रूग्णालयांनी दर्शनी भागातील फलकावर लावावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले. 

****

जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातल्या प्रकल्पबाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याकरता ४६ कोटी १० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली.  

****

नागपूर दंगलींचा सूत्रधार फहीम खान याच्यासह सहा जणांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फेसबुक, एक्स, यू ट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवरच्या सुमारे २३० प्रक्षोभक पोस्ट आढळल्या आहेत, असं सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. आता काही भागात दुपारी दोन ते संध्याकाळी चार या कालावधीत संचारबंदी शिथिल केली आहे. 

****

औरंगजेब कबरीवरील वादानंतर राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. या पथकाकडून खुलताबाद परिसराची पाहणी करण्यात येत आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबाद मधली ही कबर हटवण्यासाठी आंदोलनं सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पथक जिल्ह्यात आलं आहे. 

****

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या माध्यमातून या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी गावं तयार झाली असून, ही कामं सुरू राहण्यासाठी गावातल्या सर्वांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन भूजल आयुक्त डॉक्टर विजय पाखमोडे यांनी केलं आहे. अटल भूजल योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत ते काल पुण्यात बोलत होते. 

****

दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवाचा आज समारोप होत आहे. ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते काल या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. 

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मेघना कावली यांनी काल पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली. 

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात साडेचार हजार विद्यार्थी आणि ५० कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

****

मद्यविक्री परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात केलेल्या १५ टक्के दरवाढी विरोधात परभणी जिल्ह्यातल्या मद्यविक्री दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. यासाठी काल दिवसभर दुकानं बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

****

खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राचा बॅडमिंटनपटू सुकांत कदम याने एस एल फोर गटात महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा २१-१०, २१-१९ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. व्हीलचेअरच्या डब्ल्यू एच वन गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार अले यानेही उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं.

****

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने काल वेल्सचा १०२-४७ असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

****

पुढील तीन मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्याच्या काही भागात कालही अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई शहर परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.‌ लातूरच्या औसा, चाकूर, जळकोट शहरात, तसंच धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातही काल पाऊस झाला. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...