Monday, 3 March 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०3 मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राने देशातल्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान दिलं असून, महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य असल्याचं नमूद करत त्यांनी, दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीची माहिती दिली. राज्य सरकार गतिमान आणि सुशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. यामध्ये शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना करणं, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणं आणि एकात्मिक मानव संसाधन प्रणाली विकसित करणं, यांचा समावेश असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या शहरी भागात उत्तम पायाभूत सुविधांद्वारे जीवनमान सुधारण्यासाठी नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

सरकार महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वाद सोडवण्यासाठी बांधील असून, सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक केली आहे. सरकार सीमाभागातल्या मराठी नागरीकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि इतर योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, फास्टटॅगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने टोल वसुली, १० लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, वस्त्रोद्योग क्षेत्राचं बळकटीकरण आणि विस्तार, कर्मयोगी भारत कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना, नमो ड्रोन दीदी आदी योजनांचा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

****

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ च्या सहा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात ९३२ कोटींच्या अनिवार्य, तीन हजार ४२० कोटींच्या कार्यक्रमाअंतर्गत, दोन हजार १३३ कोटींच्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमा अंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. या मागण्यांवर सहा आणि सात मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे.

योगेश सागर, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, सुनील राऊत, अमित झनक यांची सभा अध्यक्षांच्या तालिकेवर निवड झाली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात शोक प्रस्ताव ठेवला. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, प्रदीप जाधव नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, तुकाराम बिरकड यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी विधान भवनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केला. राज्यात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांची पाठवणी करताना होणाऱ्या अपमानाच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं ते म्हणाले.

****

दरम्यान, राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात महायुतीचं सरकार, शेतकरी, कष्टकरी, कामगार-मजूर वर्ग, महिला, सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास अशा राज्यातल्या सर्व समाजघटकांच्या हिताचे सर्वसमावेशक निर्णय या अधिवेशनात घेतले जातील, असं त्यांनी सांगितलं.

****

जागतिक वन्यजीव दिवस आज पाळण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणाच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

वन्यजीव दिनानिमित्त सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध राहण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक प्रजाती महत्त्वाची भूमिका बजावते यावर त्यांनी भर दिला. वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनात भारताच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही जागतिक वन्यजीव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यातल्या रब्बी हंगामातल्या पिकांच्या पेरण्याखालील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९७ हजार हेक्टर इतकं आहे. तर कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी म्हणजे ६४ लाख ८३ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात पाण्याची उपलब्धता अधिक असल्यामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत झाल्याचं पुणे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं. यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे यंदा उत्पादनातही निश्चित वाढ अपेक्षित असल्याचं, कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...