Thursday, 14 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता त्यांचा हा संदेश आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल.

****

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड आणि नागरी संरक्षण तसंच सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहिर झाली आहेत.

राज्यातल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना आणि तीन अग्निशमन कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहिर झालं आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुरेश तेलामी यांना मरणोत्तर शौर्य पदकाने गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक राज्यातल्या तीन पोलीस अधिकार्यांना जाहिर झालं आहे. तर गुणवत्तापूर्ण सेवा पदक मिळालेल्यांमध्ये २१ पोलीस, पाच अग्निशमन, पाच होमगार्ड आणि नागरी संरक्षण, तर आठ सुधारात्मक सेवेतल्या कर्मचार्यांचा समावेश आहे.

****

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील, आणि प्रथेनुसार राष्ट्राला संबोधित करतील. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून यावर्षी देशभरातल्या २१० सरपंचांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये महिला सरपंचांचा लक्षणीय सहभाग आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले असून, केंद्र सरकारच्या योजना शंभर टक्के कार्यान्वित करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत. यामध्ये राज्यातल्या १५ सरपंचांचा समावेश असून, यात मराठवाड्यात परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी गावच्या सरपंच पार्वती हरकळ आणि लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या बामणी गावच्या सरपंच प्रभावती बिराजदार यांचा समावेश आहे.

या सर्व सरपंचांचा आज दिल्लीत पंचायत राज मंत्रालयाकडून सन्मान करण्यात येणार आहे. या वर्षीच्या या कार्यक्रमाचं घोषवाक्य ‘आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख’ अशी असून, यावेळी सभासार अॅपचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

****

दरम्यान, उद्या सकाळी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारं बातमीपत्र सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होणार आहे.

****

राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते, तर बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी- पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली- पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड- पालकमंत्री अतुल सावे, लातूर- इथं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनार्इक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. 

****

विभाजन विभिषिका दिवस आज पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृत्यर्थ हा दिवस पाळला जातो। या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, फाळणीच्या काळात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो निरपराध नागरिकांना, शूर वीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबांना आदरांजली अर्पण केली.

****

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज बीड शहरात तिरंगा फेरी काढण्यात आली. या फेरीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

****

मुलीच्या जन्माचं स्वागत करुन मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यास चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वाळूजनजिक पंढरपूर इथं झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. समाजात मुला- मुलीत भेद करणारी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

****

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी राज्य शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्राची संस्था असलेल्या युनिसेफच्या प्रतिनिधींसोबत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम, शाळेतून मुलींचं प्रमाण कमी होणं, लहान वयात गर्भधारणा, कुपोषण आदी समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. बालिका पंचायतच्या सहभागातून बालविवाहविरोधी अभियान राबवण्याची गरज व्यक्त करुन, यशस्वी राज्यांच्या अनुभवाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश, तटकरे यांनी यावेळी दिले. 

****

No comments: