Monday, 11 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधानांचं प्रतिपादन; पुणे ते अजनीसह तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा शुभारंभ

·      छत्रपती संभाजीनगर ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट पर्यंत नवीन मालवाहतूक मार्गिका निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

·      नाशिकमध्ये इगतपुरी इथल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर सीबीआयची कारवाई

·      हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड इथं तिरंगा वाहन फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

आणि

·      राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज- नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी तीन दिवस यलो अलर्ट जारी

****

अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आपल्या सरकारचा भर असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरू इथं काल तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा शुभारंभ तसंच विविध पायाभूत सुविधांचं भूमिपूजन आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. आपली शहरं स्मार्ट, गतिमान आणि अधिक कार्यक्षम होतील, तेव्हाच आपण प्रगतीपथावर अग्रेसर होऊ, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ऑपरेशन सिंदूरनंतर आपण प्रथमच बंगळुरूत आल्याचं सांगत, दहशतवादाविरोधातल्या या कारवाईच्या यशात बंगळुरूचा मोठा वाटा असल्याबद्दल पंतप्रधानांनी बंगळुरूतल्या तरुणांचं तसंच शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

**

पुणे ते अजनी, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या वंदे भारत रेल्वे गाड्यांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले होते. अजनी-पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून, ८८१ किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे. ही जलदगती गाडी ७३ किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान १० थांबे घेईल, या रेल्वेला शेगाव इथं देखील थांबा देण्यात आल्याचं मध्य रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

**

नागपूर-पुणे या रेल्वेमुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यवोळी म्हणाले. ज्या प्रवासाला आधी १६ ते १७ तास लागत होते ते अंतर आता केवळ बारा तासात कापणं शक्य होणार असून, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे हा औद्योगिक पट्टा असून इथला विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं. नागपूर इथं आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे १० कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम, तसंच नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुडदृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण आहे, असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते काल सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवथापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रुपरेषेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात व्यापक क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि संरक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनात्मक बदलांचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उद्घाटन होणार आहे. बाबा खरक सिंह मार्गावरच्या या संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते शेंदूर वृक्षाचं रोपही लावलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी, या दृष्टीनं या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

अनैतिकता दूर करण्याचा मार्ग सांगितला नाही तर नैतिक उपदेशाला अर्थ नसल्याचं मत, ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. रसाळ यांनी लिहिलेल्या आणि मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्याम मनोहरांची नाटकं या पुस्तकाचं प्रकाशन काल छत्रपती संभाजीनगर इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. संवाद ही परिवर्तन घडवून आणणारी गोष्ट असल्याचं निरीक्षण रसाळ यांनी नोंदवलं. ते म्हणाले,

बाईट - डॉ सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

 

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आपल्या भाषणात कुलकर्णी यांनी, श्याम मनोहरांची नाटकं चौकटीबाहेर विचार करायला प्रोत्साहित करतात, असं मत व्यक्त केलं. ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर, मौज प्रकाशनाचे श्रीकांत भागवत तसंच मोनिका गजेंद्रगडकर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक, वाचक आणि अभ्यासक यावेळी उपस्थित होते.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेलं एका बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त केलं. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरुन ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केले जात होते. गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोनकॉल अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करुन त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. आरोपींनी साठ जणांना या सेंटरवर कर्मचारी म्हणून नेमलं होतं. सीबीआयने तपासादरम्यान ४४ लॅपटॉप आणि ७१ मोबाईल फोन जप्त केले. तसंच महागड्या गाड्या, सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त केली.

****

कारागृहातल्या बांधवांचं सामाजिक आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा आणि पुनर्वसन होण्याच्या दृष्टीनं कोलकाता इथल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत राज्यातल्या ६० कारागृह ग्रंथालयासाठी बुक केस आणि बुक रॅक दिली जाणार आहेत. राज्यातली वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी इतर ग्रंथालयांनीही अशा सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

****

हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड महापालिकेच्या वतीनं काल तिरंगा वाहन फेरी काढण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात झाली. महापालिका विभाग प्रमुख, अग्निशमन दल कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.

****

लातूर शहरात उभारण्यात आलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. लातूर जिल्हा विकास कामासंदर्भात ते एक बैठकही घेणार आहेत.

****

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यांपैकी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे.

****

हवामान

पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी आजपासून तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments: