Wednesday, 13 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. हे अभियान आता लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

****

व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकरी संघाटनांचे नेते आणि शेतकऱ्यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन आभार मानले. बनावट खते आणि रसायनज उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवे कायदे करणार असल्याचा पुनरुच्चार चौहान यांनी यावेळी केला.

****

लोकसभेत काल भारतीय बंदरे विधेयक २०२५ मंजूर झालं. बंदरांसंबंधित सर्व कायद्यांना एकत्र आणून एकात्मिक बंदर विकास साधणं, तसंच व्यवसायसुलभता आणत देशाच्या किनारपट्टीचा सर्वोत्तम वापर साधण्याचं कार्य या विधेयकामुळे साध्य होईल. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन विधेयकही काल सभागृहात मंजूर झालं.

राज्यसभेत नवं आयकर विधेयक, कर आकारणी विधेयक, राष्ट्रीय क्रीडा सुशासन विधेयक २०२५ तसंच राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी विधेयक २०२५ ही विधेयकं मंजूर करण्यात आली.

एक देश- एक निवडणूक’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल.

****

रायगड जिल्ह्यातल्या उरण इथं काल बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने, ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स लिडर्स डायलॉग आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. भारत आणि सिंगापूर यांच्यात सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात वाढतं सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधल्या संबंधांना नवीन आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबईत काल २०२३-२४ या  वर्षाचे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता तसच सेवक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथालयांनी प्रदर्शनं, पुस्तक परीक्षण, कविता वाचन यासारखे कार्यक्रम घ्यावे, असं त्यांनी सूचित केलं. मान्यता रद्द झालेल्या दोन हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार असून, ज्या सार्वजनिक वाचनालयाला ५०, ७५ आणि १०० वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही पाटील यांनी केली.

****

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे. वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणं किंवा वापरणं अशा कारवायांमध्ये टेलर याचा सहभाग असल्याचं आढळलं आहे. त्याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वाशिम - हिंगोली मार्गावर एका मालवाहू पिकअप वाहनाला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. अनिल आणि मोहन ठाकरे अशी मृतांची नावं असून, ते अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरचे रहीवाशी होते.

****

अंगारकी चतुर्थीनिमित्त काल जालना जिल्ह्यातल्या राजुरेश्वर गणपतीची माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. काल जवळपास दहा लाख भाविकांनी राजुरेश्वराचं दर्शन घेतलं.

****

साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार सध्या लंडन दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर काल संचालकांसोबत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.

****

अहिल्यानगर शहरातल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकस्थळी उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण काल विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झालं. हे प्रवेशद्वार, भावी पिढ्यांना देशभक्ती, शौर्य आणि ऐक्याचा संदेश देणारं स्मारक ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

No comments: