Tuesday, 12 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      हर घर तिरंगा अभियानात अमृत सरोवरांच्या काठावर तिरंगा उत्सव साजरा केला जाणार

·      शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल व्हॅन परवाने वाटपाचा राज्य परिवहन विभागाचा निर्णय

·      राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ

·      इंडिया आघाडीचा दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा; तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर आंदोलन

·      लातूर रेल्वे कोच फॅक्टरीत दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल-मुख्यमंत्र्यांची माहिती, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण

आणि

·      पुढील दोन दिवस बहुतांश भागात पावसाची शक्यता- नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

****

हर घर तिरंगा अभियान विकसित भारताचा संकल्प अधिक सुदृढ करेल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा देशभरातल्या एक हजार अमृत सरोवरांच्या काठावरही तिरंगा उत्सव साजरा केला जाणार असल्याचं, शेखावत यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री

 

१४ ऑगस्ट रोजी, विभाजन विभिषिका दिनी, मूक मोर्चा, चित्रप्रदर्शन तसंच पथनाट्य आणि चर्चासत्रं आयोजित केली जाणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं.

****

दरम्यान, ७९ वा स्वातंत्र्यदिन येत्या शुक्रवारी साजरा होत आहे. राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते, तर बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी- पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली- पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड- पालकमंत्री अतुल सावे, लातूर- पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनार्इक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.

**

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा काल आढावा घेतला. या समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

**

हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं तिरंगा फेरी काढण्यात आली, तर औंढा इथं नागनाथ मंदिर परिसरात, शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

****

राज्य परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्कूल व्हॅनचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या वाहनांमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा, दप्तरांसाठी स्वतंत्र जागा, अग्निशमन अलार्म यंत्रणा, तसंच जीपीएस प्रणालीचा समावेश अनिवार्य आहे, यामुळे अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त शालेय विद्यार्थी वाहतुक सेवा राबवणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं, सरनाईक म्हणाले.

****

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना आता ५३ ऐवजी ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. गेल्या एक जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी करण्यात आला.

****

लोकसभेनं नवीन प्राप्तिकर विधेयक काल आवाजी मतदानानं संमत केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या २८५ शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे. सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण देण्यात आलं आहे. प्रमाणित वजावट, घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न इत्यादीबाबत सोप्या, सरळ भाषेत माहिती देण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

****

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करत, इंडिया आघाडीच्या खासदारांनी काल निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला. बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

प्रत्येक समाजातल्या वंचितांच्या विकासाची गोपीनाथ मुंडे यांनी रुजवलेली भावना आजच्या राजकीय नेत्यांनी जोपासण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते काल लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यावर बोलत होते. सत्तेशी तडजोड नव्हे तर सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला दिली, आपण आजही त्या शिकवणीवर वाटचाल करत असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या गुंडगिरीचा बिमोड, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, सामाजिक समरसता, विधानसभेतील कामकाज, आदी मुद्द्यांच्या संदर्भाने गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वांनी उजाळा दिला.

लातूर इथल्या रेलवे कोच फॅक्टरीत पुढच्या वर्षी दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल, स्थानिकांनाच ही संधी मिळावी, तसंच या कारखान्याला आवश्यक असं मनुष्यबळ तयार करण्याची सूचना संबंधितांना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूरच्या पाणी पुरवठा योजना तसंच सामान्य रुग्णालयाला मंजुरी देत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, जळकोट तालुक्यात गुट्टी इथल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे ७२२ कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे.

****

भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली,

बाईट - अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद

 

हिंगोली, जालना शहरात महात्मा गांधी चमन इथं, तर सोलापूर तसंच धुळे इथं पक्षाच्या वतीनं मोर्चा काढत जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं.

****

पुणे जिल्ह्यात खेड इथं दरीत जीप कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. या सर्व महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तर केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पडसाळी इथल्या पंपगृहाचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल उद्घाटन करून कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल असा विश्वास, विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून देणार असं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

हिंगोली इथं झालेल्या २७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकादार कामगिरी केली. मुलांच्या सांघिक गटातही छत्रपती संभाजीनगरचा संघ अव्वल ठरला.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments: