Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 August
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू देशवासीयांना संबोधित करणार
·
राज्यात हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह, विविध उपक्रमांचं
आयोजन
·
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी २१० पंचायत प्रतिनिधींना निमंत्रण, राज्यातल्या
१५ जणांचा समावेश
·
ऑपरेशन सिंदूरचा पराक्रम आणि स्वदेशी वस्तुंच्या वापराबाबत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करण्याचा मुख्यमंत्र्यांचं
आवाहन
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची
शक्यता, मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
****
भारतीय स्वातंत्र्याचा ७८
वा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज
देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता त्यांचा हा संदेश आकाशवाणी तसंच
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल.
दरम्यान उद्या सकाळी होणाऱ्या
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी
प्रसारित होणारं बातमीपत्र सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होणार आहे.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर
देशभरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अनेक केंद्रीय
मंत्री आणि राजकीय नेते आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून या देशभक्ती मोहिमेत
सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर इथं बहुजन
कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ झाला. सिद्धार्थ उद्यानात
मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाला अभिवादन करून सावे यांनी तिरंगा फडकावला. शहरातल्या
विविध महाविद्यालयीन तसंच शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा फेरी काढून या अभियानाच्या
जनजागृतीत सहभाग घेतला.
परभणी इथं जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण
आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल फेरी काढण्यात आली. शाळा महाविद्यालयांमधले
विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.
जालना जिल्ह्यातल्या बदनापुर
तालुक्यात वाकुळणी इथल्या छत्रपती संभाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हर
घर तिरंगा तसंच एक पेड मा के नाम अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी झालेल्या
कार्यक्रमात रांगोळी, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात
आल्या तसंच विद्यार्थ्यांनी लेझीम आणि कवायतींचं सादरीकरण केलं.
नांदेड महापालिकेच्या वतीनं
काल काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे
यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
धाराशिव शहरात जिल्हा प्रशासन
आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायकल फेरी काढण्यात
येणार आहे.
****
विभाजन विभिषिका दिवस आज पाळला
जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या
भीषण संहाराच्या स्मृत्यर्थ हा दिवस पाळला जातो. या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या
आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
१९४७ साली देशाला स्वातंत्र्य
मिळालं, त्यावेळी हैदराबाद प्रांतात निझामाच्या राजवटीत असलेला मराठवाडा हा दिवस साजरा
करू शकला नव्हता. अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मराठवाड्याला १५ ऑगस्ट
१९४९ पर्यंत वाट पहावी लागली. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्यास असलेले
ज्येष्ठ विधीज्ञ अनंत उमरीकर आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ प्रभाकर देव यांनी आपलं
मनोगत या शब्दांत व्यक्त केलं...
बाईट- अनंत उमरीकर
आणि डॉ प्रभाकर देव
या दोन्ही मान्यवरांनी यासंदर्भात
केलेलं विस्तृत विवेचन आमच्या विशेष प्रासंगिक या सदरात आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम
आमच्या केंद्रावरून आज सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित केला जाणार आहे.
****
नवी दिल्लीत यंदाच्या स्वातंत्र्यदिन
सोहळ्यात देशभरातल्या २१० पंचायत प्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये
महाराष्ट्रातल्या १५ जणांचा समावेश आहे. यात मराठवाड्यात परभणी जिल्ह्याच्या जिंतूर
तालुक्यातल्या कुंभारी गावच्या सरपंच पार्वती हरकळ आणि लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या
बामणी गावच्या सरपंच प्रभावती बिराजदार यांचा समावेश आहे. या प्रतिनिधींचा आज एका विशेष
कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.
****
निवृत्तीवेतन धारकांच्या हयातीच्या
दाखल्यांसाठी चौथी देशव्यापी डिजिटल मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार
आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्यावरुन ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजित
केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने
जगाला दाखवून दिलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तुंच्या वापराबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी
जनजागृती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही
सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ईद-ए-मिलाद सणही
गणेशोत्सवादरम्यान येत असल्याने धार्मिक सौहार्द कायम ठेवत उत्सव साजरा करण्याचं आवाहन
त्यांनी केलं.
****
वसई विरार महापालिकेचे माजी
आयुक्त अनिल पवार यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीने काल अटक केली. त्यांच्यासह शहराचे
माजी नगर नियोजक वाय. एस. रेड्डी आणि इतर दोघांनाही अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी
ईडीनं या सर्वांवर धाड टाकून चौकशी केली होती. अवैध बांधकामांना परवानगी देण्यासाठी
पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक
उईके यांनी काल छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन विभागाच्या विविध योजनांचा
आढावा घेतला. या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीनं करण्याचे
निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वडनेर
आणि सुरूडी इथल्या शासकीय आश्रमशाळांच्या नवीन इमारतींचं यावेळी आभासी पद्धतीनं लोकार्पण
करण्यात आलं. याठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांच्या हस्ते काल एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७०
उमेदवारांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेचं नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. विभागीय
स्तरावर आणखी ६६ उमेदवारांना ३१ ऑगस्टपर्यंत अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र
दिलं जाणार आहे.
****
जालना जिल्हा परिषद परिसरात
मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांच्या उपस्थितीत काल श्रमदानातून स्वच्छता
मोहिम राबवण्यात आली. तसंच तालुकास्तरीय गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व पंचायत
समिती आणि गाव पातळीवर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी
यांच्या सहकार्याने गावागावात प्लास्टिक संकलन, ओला कचरा आणि सुका कचरा संकलन
करण्यात आलं. उद्या १५ ऑगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता विषयक
शपथ घेतली जाणार असून, प्लास्टिक बंदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
पारंपरिक खेळाडूंना शिवछत्रपती
पुरस्कार, शासकीय लाभ आणि शासकीय सेवेतल्या नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं
आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं. काल मुंबईत कुर्ला
इथं खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. २२ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या
या क्रीडा महाकुंभात विविध १८ प्रकारच्या स्पर्धांमध्ये वीस हजार खेळाडू सहभागी झाले
आहेत.
****
उत्तर प्रदेशच्या नोएडा इथं
झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर इथली मुष्टियोद्धा
ओवी अदवंत हिने सुवर्णपदक पटकावलं. भसरतीय खेळ प्राधिकरण- साईचे छत्रपती संभाजीनगर
इथले प्रशिक्षक वर्षा त्रिपाठी, पंकज यादव तसंच अजय जाधव यांनी ओवीचं अभिनंदन केलं.
****
अमेरिकेतल्या नेब्रास्का विद्यापीठ
आणि भुवनेश्वर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी काल अहिल्यानगर
जिल्ह्यात हिवरे बाजार पाणलोट क्षेत्राला भेट देऊन प्रकल्प कार्यपद्धतीचा अभ्यास केला.
मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सचिन कुमार
नांदगुडे यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. पद्मश्री पोपटराव पवार यांची
या शास्त्रज्ञांनी भेट घेऊन नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन, पाणलोट
क्षेत्रविकास आदीबाबत
चर्चा करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात मालवाहू वाहनाला
अज्ञात वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. वाशिम - हिंगोली
मार्गावर काल सकाळी हा अपघात झाला.
****
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या
मुसळधार पावसामुळे ईसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर
पुसद, उमरखेड, महागांव तसंच नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदी काठावरील नागरिकांना सावधनातेचा इशारा
देण्यात आला आहे.
****
हवामान
राज्याच्या बहुतांश भागात
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
तर मराठवाड्यात सर्व आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment